Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

जि. प., पं. स. पदाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीविरोधात न्यायालयात धाव
श्रीरामपूर, २४ जुलै/प्रतिनिधी

निवडणूक आयोगाची कोणतीही आडकाठी नसताना विधानसभा निवडणूककाळात राजकीय कटकट वाढून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का लागू नये, याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. मात्र, त्यास दोन्ही पक्षांतील तरुण कार्यकर्त्यांचा विरोध असून, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. राष्ट्रवादीचे श्रीरामपूर पंचायत समिती सदस्य गणेश मुदगुले व काँग्रेसचे जि. प. सदस्य सत्यजित तांबे यांनी याचिकेद्वारे ठरल्यावेळी या निवडी घेण्याची मागणी केली आहे.

बंधाऱ्यांसाठीची बैठक ऐनवेळी रद्द
‘अर्थकारणा’वरून वितुष्ट!
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी
बंधाऱ्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या मंजूर कामांसाठी मिळालेला तुटपुंजा निधी व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये न झालेला मेळ यामुळे ही कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. कामाच्या नियोजनासाठी जि.प. पदाधिकारी व प्रमुख सदस्यांशी काल सायंकाळी आयोजित केलेली बैठक त्यामुळेच ऐनवेळी रद्द करण्यात आली. या वादातून कामे मंजुरीच्या अर्थकारणावरही प्रकाश पडला.

जकात हटविण्यास राहुल गांधींची अनुकूलता
श्रीरामपूर, २४ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील जकात हटविण्यास काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी अनुकूलता दर्शविल्याने गेली २५ वर्षे जकातीच्या विरोधात सुरू असलेल्या लढय़ाला यश येईल, असा विश्वास राज्य व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व नगर र्मचटस् चेंबर्सचे अध्यक्ष अनिल पोखर्णा यांनी व्यक्त केला.

निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ
मुळा व भंडारदराच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर मंदावला
अकोले, २४ जुलै/वार्ताहर
पाणलोटक्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. भंडारदऱ्याप्रमाणेच निळवंडे धरणातही आज अर्धा टीएमसीपेक्षा जास्त पाणी चोवीस तासांत आले. निळवंडय़ाचा पाणीसाठा आता दोन टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. निळवंडे धरणात या वर्षी ६२४ मीटर तलांकापर्यंत पाणी अडविण्यात येणार आहे.

निवडणुकीअभावी अडली नगरसेवकांची वर्णी
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीत जिल्ह्य़ांच्या नागरी क्षेत्रातून निवडून द्यायच्या तब्बल ६ जागा रिक्त आहेत. विविध कारणांनी जिल्हा प्रशासन यासाठीची निवडणूक लांबणीवर टाकत असून त्यामुळे नागरी क्षेत्रातील प्रश्नांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थान मिळणे अवघड झाले आहे. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातून निवडून द्यायच्या प्रतिनिधींची निवडणूक जिल्हा प्रशासनाने अलीकडेच घेतली. त्यात जिल्हा परिषदेच्या ७५ पैकी ३३ व शिर्डी नगरपंचायतीच्या १७ पैकी एकास जिल्हा नियोजन समितीत प्रतिनिधीत्व मिळाले. जिल्ह्य़ातील नगरपालिका व नगर महापालिका यांना मात्र समितीत त्यांच्यासाठीची निवडणूकच न झाल्याने स्थान मिळाले नाही.

पदरमोड करून गांडूळखताच्या पथदर्शी प्रकल्पाची उभारणी‘डीआरडीए’तील कर्मचारी
रामकिसन बुधवंत यांची कामगिरी
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी

शहरातील विविध मंदिरांत भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या हार, पाने, फुले यांचे पुढे काय होते? बाजार समितीत विक्रीस आलेल्या खराब पालेभाज्या-फळभाज्यांचे पुढे काय होते? ढिगारे कुजत पडलेले असतात किंवा नंतर उचलून कोठेतरी टाकून दिले जातात; परंतु याच जैविक कचऱ्याचे ढिगारे स्वखर्चाने उचलून नेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत (डीआरडीए) यांत्रिक सहायक म्हणून काम करणाऱ्या रामकिसन बुधवंत यांनी महिला बचतगटांसाठी गांडूळखताचा पथदर्शी प्रकल्प उभारला आहे.

उपसभापतींसह राष्ट्रवादी सदस्यांनी घातला
गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार!
श्रीरामपूर, २४ जुलै/प्रतिनिधी
गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्यांचा कार्यभार अन्य पदाधिकाऱ्यांकडे सोपविला नाही म्हणून उपसभापती सुनीता गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीतून सभात्याग केला. सभापती थोरात यांनी सभात्यागाची दखल न घेतल्याने गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून त्यांनी निषेध केला. मासिक सभेत राष्ट्रवादीचे सदस्य नेहमी आक्रमक असतात. बैठकीत प्रश्नरंभी अभिनेते निळू फुले व गायिका गंगूबाई हनगल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

८६ शाळाखोल्यांच्या बांधकामांना मंजुरी
सर्व शिक्षा अभियान
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी
सर्व शिक्षा अभियानातून उपलब्ध झालेल्या सुमारे ६ कोटी ५४ लाख खर्चाच्या ८६ शाळा खोल्यांच्या बांधकामांना जिल्हा परिषद बांधकाम उपसमितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये ५८ नवीन प्रश्नथमिक क्लास शाळा व २८ रुपांतरित वसतीशाळा खोल्यांचा समावेश आहे. सर्वात जास्त निधी श्रीगोंदे तालुक्यासाठी मंजूर झाला आहे.

समर्थ प्रशालेचे ९ विद्यार्थी चमकले
नगर-पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सावेडी येथील श्रीसमर्थ विद्या मंदिर प्रशालेचा ९० टक्के निकाल लागला. नऊ विद्यार्र्थी गुणवत्तायादीत चमकले. चौथीचे २२४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवत्ताधारक विद्यार्थी असे - योगेश्वर दळवी (२७६ गुण, जिल्ह्य़ात ७वा), रमाकांत वैद्य (२७४ गुण, आठवा), मृणाल जोशी (२७० गुण, दहावा), मृण्मयी जोशी (२६८ गुण, दहावी), निकिता इथापे (२६८ गुण, अकरावी), नेहा वाळुंजकर (२६६ गुण, बारावी), अभिषेक लकडे (२६६ गुण, बारावा), चैतन्य मुळे (२६६ गुण, बारावा,) श्रेयस पाटील (२६६ गुण, बारावा). या विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी ल. दि. सोनटक्के, डी. आर. कुलकर्णी, प्र. स. ओहोळकर, किशोर देशपांडे, मेजर दिनुभाऊ कुलकर्णी, मुख्याध्यापक ब. कृ. हिलगुडे आदींनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
देशातील सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घटत चालली. चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी मतदार का बरं मतदान प्रक्रियेत भाग घेत नाही? मतदानाबाबत एवढी उदासीनता का? याचे उत्तर मिळणे अवघड आहे.घटत चाललेल्या मतदानाच्या आकडेवारीबद्दल सर्व राजकीय पक्ष चिंतेत आहेत. कमी मतदानाचा फटका कोणत्या पक्षाला बसेल, याचा नेम नाही. चांगले मतदान झाले, तर उमेदवारही चांगलेच निवडून येतील. मतदान सक्तीचे करण्याबाबत चर्चा झडत आहे.

‘मुळा’त अकरा टीएमसी पाणी
राहुरी, २४ जुलै/वार्ताहर
पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे मुळा धरणात १ हजार ४३७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून, पाणीसाठा ११ हजार दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे.
गेल्या ४८ तासांत पावणेतीन दशलक्ष घनफुटांहून अधिक पाणीसाठा धरणात झाला. धरणातील पाण्याची पातळी दोन दिवसांत १० फुटांहून अधिक वाढली. आज सायंकाळी ती १ हजार ७७८.४० फुटांवर पोहोचली. पाणलोटक्षेत्रात ४ दिवस सातत्याने मुसळधार वृष्टी झाल्याने पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ झाली. दोन दिवसांतच साठय़ात क्षमतेच्या १० टक्के वाढ झाली. आज दुपारनंतर धरणात येणारी पाण्याची आवक मंदावली असून, पावसाने विश्रांती घेतली आहे. २ हजार क्यूसेकने पाण्याची आवक मुळा नदीतून सुरू होती. १९ जूनला निचांकी ४ हजार ३२३ दशलक्ष घनफूट साठा धरणात शिल्लक होता. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ातील पावसामुळे धरणात नवीन पावणेसात दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात मात्र पावसाने काहीशी हजेरी लावली. तीही अल्पकाळ राहिली. सारेच पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

मुलीची छेड काढल्याने डांबून ठेवून मारहाण
कोपरगाव, २४ जुलै/वार्ताहर

मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून मुलास डांबून ठेवून मारहाण करण्याचा प्रकार तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घडला. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडल्यानंतर पाचजणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. जेऊर कुंभारी येथील गौतम सोपान खरात याने मुलीची छेड काढली म्हणून त्यास घरात डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी धर्मा मुरलीधर जाधव, रोहिदास खंडू जाधव, विठ्ठल रंगनाथ आव्हाड, नितीन एकनाथ इंगळे, किरण एकनाथ वक्ते यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साहेबराव जाधव अधिक तपास करीत आहेत.

एसटी चालकाला प्रवाशांकडून मारहाण
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी

एस.टी. बस थांबविण्यास उशीर केला म्हणून चालकास लोखंडी पट्टीने मारहाण करण्याची घटना नगर दौंड रस्त्यावर बाबुर्डी बेंद शिवारात आज दुपारी घडली. नगर तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला.कुंडलिक हरिभाऊ झुंजार (एसटीचालक, श्रीगोंदे आगार) यांनी फिर्याद दिली आहे. नगरहून ते श्रीगोंदा एसटी घेऊन जात होते. बाबुर्दीबेंद शिवारात उतरण्यासाठी ज्ञानेश्वर चोथे (पूर्ण नाव माहिती नाही) व एका अनोळखी प्रवाशाने घंटी वाजविली. परंतु चालकाने लगेच गाडी थांबविली नाही. त्याचा राग येऊन चोथे व अनोळखी व्यक्तीने एसटी चालक झुंजार यांना केबिनमध्ये घुसून लोखंडी पट्टीने मारहाण करून जखमी केले. नंतर ते दोघे निघून गेले. पोलिसांना चोथेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सहायक उपनिरीक्षक भोस करीत आहेत.

कर्जतमधील रस्त्याची ‘वाट’ लागल्याने नागरिकांची ‘गांधीगिरी’
कर्जत, २४ जुलै / वार्ताहर

कर्जत ते भिगवन, कर्जत ते जामखेड, कर्जत-करमाळा व श्रीगोंदे या प्रमुख रस्त्यांसह तालुक्यातील बहुतांशी रस्त्यांची ‘वाट’ लागली आहे. थोडय़ाशा पावसाने रस्ते चिखलमय होतात. तर काही भागाचा संपर्क तुटतो, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी याचा अनुभव घेतला. ‘लोकसत्ता’ने या बाबत वेळोवेळी लक्ष वेधले. काही प्रश्न सुटले, तर बहुतांशी भिजत पडले आहेत. प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांनी खड्डय़ांना हार घालून गांधीगिरी केली. कर्जत-नगर रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागाकडे मैलकामगार आहेत. मात्र ते ‘आराम’ करीत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

महानगर बँकेच्या तळवडे शाखेचे आज उद्घाटन
पारनेर, २४ जुलै/वार्ताहर

महानगर सहकारी बँकेच्या २७ व्या तळवडे (पिंपरी-चिंचवड) शाखेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शनिवारी) होणार असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष सि. बा. अडसूळ यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके असतील. पिंपरी चिंचवडच्या महापौर अपर्णाताई डोके, आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मणराव जगताप, नगरसेवक शांताराम भालेकर, प्रशांत शितोळे, विजयाताई जाधव, भाई ढोरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.बँकेच्या सर्व शाखा, चार ए.टी.एम. सेंटर, एक विस्तार कक्ष व मुख्य कार्यालय ‘केअर बँकिंग’ प्रकल्पांतर्गत संगणकीय प्रणालीने जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येतील. खातेदार आता संपूर्ण बँकेचा खातेदार झाला आहे. असे कर्मचारी संचालक कि. शं. भोसले यांनी सांगितले. बँकेच्या डॉक (मुंबई) येथील विस्तार कक्षाचे शाखेत रूपांतर करण्याची, तसेच घणसोली (नवी मुंबई), नवी सांगवी (पुणे), खाटघर (नवी मुंबई), नाशिक रोड (नाशिक) येथे शाखा उघडण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी दिली.

बार्कलेज बँकेची एमआयडीसीत शाखा
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी

बार्कलेज बँक पीएलसी या ब्रिटिश बँकेसाठी भारत ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. बँकेतर्फे नगरच्या एमआयडीसीतील कंपन्यांना अर्थसाहाय्य करण्यात येईल, असे प्रतिपादन बँकेचे अंतरित व्यवस्थापकीय संचालक राम गोपाल यांनी केले. बार्कलेज बँकेची शाखा एमआयडीसी येथे आज सुरू झाली. तिचे उद्घाटन संचालक गोपाल व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मणी सुब्रमण्यम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गोपाल बोलत होते. कंपन्यांबरोबरच किरकोळ व व्यापार क्षेत्रातील दूरदर्शी ग्राहकांनाही बँका सेवा देणार आहे, असे सांगून गोपाळ म्हणाले की, बँकेच्या मुंबई, नवी दिल्ली, जुनागढ, कांचीपूरम आणि नीलमंगला (बंगलोर) येथे शाखा आहेत. नगरसह तेरा ठिकाणी एमटीएम केंद्रे उघडण्यात आली आहेत. बँकेने गेल्या वर्षी ‘बार्कलेज फायनान्स’ ही वित्तीय सेवाही सुरू केली. बँकेने गेल्या दोन वर्षात २४० दशलक्ष ब्रिटिश पौंड गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मणी सुब्रमण्यम उपस्थित होते.

अल्पसंख्याकांवर हल्ले करणाऱ्या गुंडांना अटक न झाल्यास उपोषण
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी

शहरातील अल्पसंख्याक समाजावर वारंवार हल्ले करणाऱ्या आरोपींना अटक झाली नाही, तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा गुरुदास श्रीगुरु सिंग सभेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.इंदरसिंग धुप्पड, गुलशन धुप्पड, अनिल सबलोक, हरजितसिंग वधवा, राजेंद्र कंमोड, जसपाल पंजाबी, मनीष ओबेरॉय आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांना याबाबतचे निवेदन दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांनाही याची माहिती देण्यात आली. शहरातील शीख, पंजाबी, सिंधी यांना गुंडांनी लक्ष्य केले आहे. दमदाटी, खंडणी वसुली, अपहरण असे प्रकार वारंवार होत असून, पोलीस कडक कारवाई करीत नसल्याने गुंडांचे धाडस वाढले आहे. जग्गी अपहरण प्रकरण पोलिसांसमक्ष घडले आहे. पोलिसांना चकवा देत आरोपी त्यांच्यासमोरून खंडणी घेऊन पळून गेले. या आरोपींना ३ ऑगस्टपर्यंत अटक झाली नाही तर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

कॅन्टोन्मेंट चटईक्षेत्रवाढीसाठी खंडपीठात याचिका दाखल
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी
भिंगार कॅन्टोन्मेंट भागात इमारत बांधकामासाठीचे चटईक्षेत्र वाढविण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून, ती सुनावणीस आली आहे.भिंगारची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भिंगारच्या चारही बाजूला लष्कराची असल्याने गावाच्या वाढीला मर्यादा पडल्या आहेत. सध्या भिंगारचे चटईक्षेत्र एक आहे. ते रोड व्हावे यासाठी पवार यांनी याचिका दाखल केली आहे.ही याचिका न्यायमूर्ती हरदास यांच्यासमोर सुनावणीस आली आहे. छावणी मंडळाने चटईक्षेत्राच्या वाढीसाठीचा ठराव केंद्र सरकारला पाठ दिला आहे. या ठरावाची प्रत याचिकेसोबत जोडण्यात आली आहे. पवार यांच्यातर्फे वकील व्ही. एस. बेद्रे काम पाहत आहेत.

बाळकृष्ण दिडवानिया यांचे वृद्धापकाळाने निधन
नगर, २४ जुलै/प्रतिनिधी
येथील राजस्थानी टाँक क्षत्रिय समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण जगन्नाथ दिडवानिया यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

रुख्मिणीबाई कुलकर्णी यांचे निधन
नगर,२४ जुलै/ प्रतिनिधी

सावेडीतील रहिवासी श्रीमती रुख्मिणीबाई नानासाहेब कुलकर्णी (सरनाईक) यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. बांधकाम व्यावसायिक अशोक सरनाईक यांच्या त्या आई होत.