Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

वेळूचा ट्रक उलटल्याने महिला ठार, तासभर वाहतूक ठप्प
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

वेगात असलेला ट्रक अनियंत्रित झाल्याने तो उलटला. त्यात रस्त्याने जाणाऱ्या शेतमजूर महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नालगावजवळ घडला.
सीताबाई रामाजी रोहणकर (४५) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून ती कडोली येथील रहिवासी आहे. या घटनेने कडोली गावात शोककळा पसरली आहे.

आझाद हिंद एक्स्प्रेसवर मलकापूरजवळ दरोडा
*डब्यात सशस्त्र लुटारूंचा हैदोस * ३७ हजाराहून अधिक ऐवज लुटला
नागपूर, २४ जुलै/ प्रतिनिधी
गेल्या आठवडय़ात काटोलजवळ स्वर्णजयंती एक्स्प्रेसमध्ये पडलेल्या दरोडय़ातील आरोपी अद्याप सापडले नसतानाच शुक्रवारी पहाटे पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसच्या सामान्य श्रेणीच्या डब्यात सशस्त्र लुटारूंनी हैदोस घालून प्रवाशांकडून ३७ हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लुटला. मलकापूरजवळ ही घटना घडली. वारंवार पडणाऱ्या दरोडय़ांमुळे रेल्वे प्रवाशात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तूर डाळीचे भाव उतरले
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यापासून गगनाला भिडलेले तूर डाळीचे भाव खाली उतरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. १०० रुपये प्रतिकिलो विकल्या जाणारी डाळ आता ७० ते ७२ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. तूर डाळीचा उपयोग नियमितपणे जेवणात केला जातो.

‘नाईट एअरमेल सव्‍‌र्हिस’ पुन्हा सुरू होणार!
* सोमवारी येणार पहिले बोईंग * टपाल जलदगतीने मिळणार
पीयूष पाटील, नागपूर, २४ जुलै
नागपूरचे भूषण असलेल्या भारतीय टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट विभागाची प्रतिष्ठित ‘नाईट एअरमेल सव्‍‌र्हिस’ येत्या २७ जुलैपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. टपाल खात्यातील अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सेवेसाठी भारतीय टपाल खात्याला एअर इंडियाकडून तीन विमाने मिळाली आहेत.

खाजगी बस चालकांची मनमानी
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

दुचाकी वाहनांप्रमाणेच खाजगी प्रवासीबसच्या पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला असून त्यातून शहरातील वाहतुकीला कोणतीही शिस्त नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशी घेण्यासाठी वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहतात. खाजगी वाहतूकदार प्रवासी मिळवण्यासाठी शहरातील गजबजलेल्या चौकांवर कब्जा करून बसल्याने नागरिकांना पाय टाकणे धोकादायक ठरते आहे.

सिंचनाच्या सोयी व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन
विजय अजमिरे

घरातून राजकारण व समाजकारण या पाश्र्वभूमीवर झालेले संस्कार व अचानक पितृछत्र हरवल्यानंतर पंचायत समिती सदस्य असताना पक्षाने दिलेली मतदारसंघाची उमेदवारी व आर्वीकर मतदारांनी दिलेल्या विक्रमी मतांच्या योगदानाने अमर काळे राजकारणात आले. २००४ च्या निवडणुकीत पक्षांतर्गत विरोध होऊन जनसंपर्क, विकास कामे व नम्रता या त्रिसूत्रीवर दुसऱ्यांदा निवडून येऊन महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान मिळवला.

नागपूरचा तबलावादक गिनीज बुकात
प्रशांत गायकवाडची जिद्द पूर्ण झाली
नागपूर, २४ जुलै/ प्रतिनिधी
सलग ३२४ तास तबला वादनाचा विक्रम करणारे तरुण तबलावादक प्रशांत गायकवाड यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले असून हा विक्रम त्यांनी त्यांचे गुरू दिवं. पंडित किशन महाराज यांना अर्पण केला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही तबला शिकण्याची जिद्द बाळगली आणि विश्वविक्रम करण्यात यशस्वी झालो, असे प्रशांत गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हल्ला होण्याची शक्यता नसली तरी संघ मुख्यालयाला कडक सुरक्षा
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

मुंबईसह राज्यात सात ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याचे संकेत गेल्या आठवडय़ात मिळल्यानंतर आता नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवण्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी याचा इन्कार केला असला तरी, कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

चल गं सखे वारुळाला.. नागोबाला पुजायाला!
* उद्या नागपंचमी; गारुडी मात्र दिसेनासे
* ग्रामीण भागात नागपूजेची प्रथा कायम
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

श्रावण महिन्यातील सणवारांची मालिका रविवारी येणाऱ्या नागपंचमीपासून जोमात सुरू होत आहे. साप घेऊन फिरणारे गारूडी आता दिसेनासे झाले असले तरी ग्रामीण भागातील नागपंचमीच्या सणाचे महत्त्व कमी झालेले नाही. शहरातही नागपूजनाची परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जात असली तरी पूर्वीएवढा उत्साह दिसून येत नाही. नागपंचमीच्या निमित्ताने सापांचा होणारा छळ थांबवण्यासाठी भारताच्या तत्कालीन पर्यावरण मंत्री मेनका गांधी यांनी पुढाकार घेऊन साप बाळगण्यावर कायद्याने बंदी घातली होती.

‘हिटलरच्या देशात’चे जर्मनीत प्रकाशन
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

डॉ. विनय वाईकर यांनी अनुवादित केलेल्या ‘हिटलरच्या देशात’ या पुस्तकाचे जर्मनीतील हॅपनहॅम येथे नुकतेच प्रकाशन झाले. जवळपास ४० वर्षे जर्मनीत वास्तव्यास असलेल्या सुजाता ओगले यांनी जर्मन भाषेत लिहिलेल्या या मूळ कथासंग्रहाचा ‘हिटलरच्या देशात’ हा मराठी अनुवाद आहे. एका मराठी स्त्रीने पाहिलेला जर्मन देश हे पुस्तकातील कथांचे सूत्र आहे.

स्वातंत्रसैनिकाच्या सन्मानासाठी ८६ व्या वर्षीही देशपांडे यांचा लढा
विवेक दिवाकर

ऐन उमेदीचा काळ गोवा मुक्तीसाठी घालविल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांसाठी देण्यात येणारे निवृत्ती वेतन राज्य शासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे मिळत नसल्याने वध्र्यातील (सध्या वास्तव्य नागपुरात) दिवाकर देशपांडे हे हताश झाले आहेत. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन मंजूर होऊन १५ वर्षे झाली. त्यांच्याबरोबर काम केलेल्या बहुतेक सर्वाना केंद्र तसेच राज्य शासनातर्फे पेन्शन मिळत आहे.

हमीभाव जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

खरीप हंगामातील ८० टक्क्यांपेक्षाअधिक पेरणी पूर्ण झाली असली तरी, केंद्राने अद्याप हमी भाव जाहीर केले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे हंगाम सुरू होण्यापूर्वी हमी भाव जाहीर करण्याची घोषणा यापूर्वीच केंद्र सरकारने केली आहे, हे येथे उल्लेखनीय. देशातंर्गत अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन दरवर्षी सर्वच राज्यात पिकांचे नियोजन केले जाते, तशा सूचनाही केंद्र सरकारने राज्य शासनाला दिल्या आहेत.

पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करा -दीक्षित
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

वाढती वैष्विक उष्णता हा जगाच्या काळजीचा विषय बनला आहे. पृथ्वीचा विनाश टाळायचा असेल तर, जगभरातील नागरिकांनी सामूहिकपणे वृक्षारोपण व त्याच्या संवर्धनाला प्रश्नथमिकता द्यावयास हवी. कारण पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी केले. ‘पीस फॉर प्रश्नेग्रेस’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्व संप्रदायांतर्फे वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा -गडकरी
महापालिकेच्या ‘लोकसंवाद’ वार्षिकांकाचे प्रकाशन
नागपूर, २४ जुलै/ प्रतिनिधी
नगरसेवक आणि प्रशासनाने जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी शहरात चांगली व विकासात्मक कामे करण्याची गरज आहे. चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. नागपूर महापालिकेतर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘नागरिक जीवन-लोकसंवाद’ या मासिकाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ वार्षिकांकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रश्न मार्गी न लागल्यास ४ ऑगस्टपासून संप
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लावा, अन्यथा ४ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या समन्वय समितीचे निमंत्रक र.ग. कर्णिक यांनी दिला. सरकारी, निमसरकारी कर्मचारी, राजपत्रित अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची सभा नुकतीच बचत भवनात आयोजित करण्यात आली होती.

नागपूर ते मुंबई ‘नॉन स्टॉप’ ऑगस्टपासून
‘दूरांत’ साडेअकरा तासात पल्ला गाठणार
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी
जेमतेम साडेअकरा तासात नागपूर ते मुंबई हे अंतर पार करणारी ‘दूरांत’ ही विनाथांबा एक्स्प्रेस येत्या ऑगस्ट महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार असल्याने या गाडीबाबतची सर्वाची उत्सुकता लवकरच पूर्ण होणार आहे.रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘दूरांत’ या नॉन स्टॉप एक्स्प्रेस गाडय़ांची घोषणा केली होती.

डॉ. विकास आमटे यशदाच्या कार्यकारी समितीवर
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

राज्य प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे तसेच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता लोकाभिमुख राहावी म्हणून प्रयत्न करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या संस्थेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे सचिव व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती ३ वर्षासाठी राहील. इतर सदस्यांमध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रश्न. यु.डी. सावंत, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि पुणे विद्यापीठातील प्रश्न. सी.एम. चितळे यांचा समावेश आहे.

इंडियन एपिलेप्सी असोसिएशनचा रविवारी पदग्रहण समारंभ
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी
इंडियन एपिलेप्सी असोसिएशन, विदर्भ शाखेचा पदग्रहण समारंभ २६ जुलैला सकाळी ९.३० वाजता धंतोलीतील हॉटेल विटस् येथे आयोजित करण्यात आला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नितीन चांडक, सचिव डॉ. सचिन जोशी व अन्य पदाधिकारी पदाची शपथ घेतील.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे व पुणे येथील मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर कोठारी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ. पूर्णिमा करंदीकर, सहसचिव दिनेश पोतदार, कोषाध्यक्ष धनंजय कुळकर्णी हे सुद्धा सूत्रे स्वीकारतील. या कार्यक्रमानंतर वैज्ञानिक सत्र आयोजित करण्यात आले असून त्यात डॉ. सुधीर कोठारी, डॉ. शैलेश केळकर, डॉ. पवन आदित्य, डॉ. अमूल महाजन, समाजसेविका संध्या दुर्गे, व्ही.एन. पाटील विचार मांडतील. संचालन डॉ. नीलेश अग्रवाल आणि डॉ. दिनेश काबरा करतील.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त पालकांनी व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मावळत्या अध्यक्षा दिप्ती शाह, सचिव डॉ. पूर्णिमा करंदीकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची जिल्हास्तरीय कार्यशाळा
नागपूर, २४ जुलै/प्रतिनिधी
एनसीएसटीसी नेटवर्क नवी दिल्लीच्यावतीने आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच महालमधील भारत महिला विद्यालयात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापिका आशा वनकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य समन्वयक अविनाश सेनाड यांनी एनसीएसटीसी नेटवर्कची माहिती दिली. जयश्री पिंपुटकर यांनी विद्यार्थ्यांकडून प्रकल्प करवून घेऊन ते सादर करण्याचे महत्व, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील माहिती याचा ऊहापोह केला. ‘आपली वसुंधरा शोध, बोध व जतन’ या विषयावर शालेय स्तरावर छोटे प्रकल्प कोणते करता येतील याविषयी डॉ. साधना देशपांडे यांनी, तर प्रकल्प निवडण्याची आणि लिहिण्याची पद्धत कशी असावी, याबद्दल सुहास उदापुरकर यांनी माहिती दिली. २००८च्या प्रकल्प सादरीकरणात राष्ट्रीयस्तरावर गोल्ड मेडल मिळवणाऱ्या भारत महिला विद्यालयाच्या चमूने प्रकल्प सादरीकरण केले. या कार्यशाळेत ५५ शिक्षक सहभागी झाले होते. कार्यशाळेचे संचालन आश्लेषा दवंडे यांनी केले. जयश्री पिंपुटकर यांनी आभार मानले.

दोसर वैश्य शैक्षणिक मंडळाची कार्यकारिणी पदारूढ
नागपूर, २४ जुलै/ प्रतिनिधी
दोसर वैश्य शैक्षणिक मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ दोसर वैश्य भवन येथे पार पडला. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रभाकर गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यकारिणीत उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत गुप्ता, हरिनारायण गुप्ता, हरिराम गुप्ता, सचिव अश्विनी गुप्ता, सहसचिव जगदीश गुप्ता, रविशंकर गुप्ता, कोषाध्यक्ष- महेश गुप्ता यांचा समावेश आहे. अ‍ॅड. प्रकाश गुप्ता यांनी संचालन केले, तर अश्विनी गुप्ता यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी
जरिपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित महात्मा गांधी सिंधू हायस्कूल आणि ओकारलाल सिंधू हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष ओंकारलाल, सिंधू हायस्कूलच्या प्रश्नचार्य वीणा बजाज यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सोसायटीचे सचिव दीपक बजाज, उपप्रश्नचार्य ज्योती दुहिलानी, पर्यवेक्षक नारायणी, कोंगे, वालदे उपस्थित होते. दीपक बजाज यांचे भाषण झाले. संचालन एस. राखडे यांनी केले तर, नंदलाल संतवानी यांनी आभार मानले. लालचंद गेहानी, गंगवानी, शिवहरे, नागेश पाटील, सुरेश ज्ञानचंदानी आदींचे सहकार्य लाभले.

शुक्रवारी तिरुपती-बिलासपूर विशेष गाडी
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी
नागपूरमार्गे तिरुपती-बिलासपूर विशेष गाडी रविवारी सोडण्यात येणार आहे. या मार्गावरील प्रवाशांची गर्दी बघता ही सोय करण्यात आली आहे. विशेष गाडी तिरुपतीहून शनिवारी रात्री १० वाजता निघेल. बल्लारपूरला सकाळी ११.३० वाजता येईल व सकाळी ११.४० वाजता निघेल. सेवाग्रामला दुपारी १.४५ वाजता येईल व १.४७ वाजता निघेल. ही गाडी नागपूरला रविवारी दुपारी ३.२० वाजता येईल व ३.३० वाजता निघेल. आणि बिलासपूरला रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला १६ डबे राहणार आहेत. त्यामध्ये एक एसी टू टायर, ४ स्लिपर क्लास, ५ एसएलआर, सहा अनारक्षित डब्यांचा समावेश आहे.

कळमेश्वर मार्ग सोमवारी बंद
नागपूर, २४ जुलै/ प्रतिनिधी
कळमेश्वर मार्गावरील रेल्व फटकाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याने सोमवारी रात्री रेल्वे क्रासिंगवरून रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक २८९ वर दुरुतीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याकरिता २७ जुलैला रात्री १० वाजतापासून २८ जुलैला सकाळी ६ वाजतापर्यंत या मार्गावरून वाहतूक होणार नाही.

महिलेची आत्महत्या
नागपूर , २४ जुलै / प्रतिनिधी
गंजीपेठ, गांधी चौक येथे राहणाऱ्या निधी मयुर कळंबे (२०) यांनी विषारी द्रव्य प्रश्नशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. निधी कळंबे यांनी २२ जुलैला सकाळी ८ वाजता सकाळी विषारी द्रव्य प्रश्नशन केले. त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी ३.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

८४८ वाहनचालकांवर कारवाई
नागपूर , २४ जुलै / प्रतिनिधी
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८४८ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख १५ हजार २०० रुपये दंड वसूल केला. या कारवाईत ३ तीन आसनी ऑटो, ८ दुचाकी वाहने, ३ चारचाकी वाहने, अशी एकूण १४ वाहने ताब्यात घेण्यात आली. मद्यप्रश्नशन करून वाहन चालवणाऱ्या ७३ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही राबवण्यात येणार असून वाहन चालकांनी वाहन चालवताना संबंधित सर्व कागदपत्रे सोबत बाळगण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

प्रमोद ठाकरे विशेष कार्यकारी अधिकारी
नागपूर, २४ जुलै/प्रतिनिधी

सामान्य प्रशासन विभागाने प्रमोद ठाकरे यांची २४ फेब्रुवारी २०१४ पर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शासन निर्णयात निर्देशिलेले अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.