Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

नवनीत

एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले, ‘‘ही अचिरवती नदी पुराने भरून दुधडी भरून वाहात असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलिकडे जावयाचे असले.’’ ‘‘आणि तो या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, ‘हे पैलतीरा, इकडे या बाजूला ये.’’ ‘‘तर हे वसिष्ठा, अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय?’’

 

‘‘त्याचप्रमाणेच हे वसिष्ठा, तीन वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो, त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की : ‘‘इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत; ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत; ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहोत; प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ‘‘तर वसिष्ठा, हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूत्तर ब्रह्माबरोबर एकरुप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही.’’ एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ‘‘ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे, आणि अंकूर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. ‘मृतमांस खाणे हे वाईट आहे.’’ यावर भगवंतांनी उत्तर केले, ‘‘तू म्हणतोस की, आपण पक्ष्यांच्या मांसाची निवडक पक्वान्न् खातो आणि मृतमांसाला स्पर्श करीत नाही. तर मग तू मृतमांसाची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत; मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवख, अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृत-मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य सर्वशूद्र, कृपणता ही मृत-मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत-मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लांडीलबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे ही मृत-मांस भोजनेच आहेत. मांसभोजने नव्हेत. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. ते सर्व मृत-मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणूस मांसमत्स्यसेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला, शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडण करू लागला, वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला, तीर्थात निम्मज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला- तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

पृथ्वी वगळता आपल्या सूर्यमालेत इतरत्र कुठे ज्वालामुखी आढळतात का?
ज्वालामुखी म्हणजे निसर्गाचे रौद्र-भीषण रूप. त्यामुळे ज्वालामुखीबद्दल सर्वाना आकर्षण असते. आपल्या पृथ्वीवर जसे ज्वालामुखी आहेत, तसेच सौरमालेतल्या काही ग्रह आणि उपग्रहांवरही आहेत. शुक्र, चंद्र, मंगळ, आयो यांसारख्या खगोलीय वस्तूंवर ज्वालामुखी आढळले आहेत.
शुक्रावर असलेल्या ज्वालामुखींची संख्या शेकडय़ांमध्ये मोजावी लागेल. त्यापैकी १६८ मोठे, तर २८९ मध्यम आकाराचे आहेत. १०० कि.मी.पेक्षा जास्त व्यास असलेल्या ज्वालामुखींना ‘मोठे’ म्हटलं जाते. परंतु शुक्रावरचा एकही ज्वालामुखी जागृत नाही, असे आतापावेतो आढळले आहे. चंद्रावरचे ज्वालामुखी त्यामानाने छोटे आहेत. त्यांचे उद्रेक ३ अब्ज वर्षांपूर्वी झाले आणि त्यातून उसळलेला लाव्हा चंद्रावर दूपर्यंत पसरला होता. मंगळ ग्रहावर ज्वालामुखीचे उद्रेक अनेकदा झाले असावेत, असे वैज्ञानिकांना वाटते. तेथे २३ ज्वालामुखी असून, त्यातला ‘ऑलिम्पस मॉन्स’ हा केवळ मंगळावरचाच नव्हे तर सौरमालेतला सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. पृथ्वीवरचा सर्वात मोठा ज्वालामुखी आहे हवाई बेटांवर. पण त्यापेक्षा ऑलिम्पस मॉन्स कित्येक पटींनी मोठा आहे.
पृथ्वी वगळता सौरमालेतला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे गुरूच्या आयो या उपग्रहावर. व्हॉयेजर आणि गॅलिलिओ या अंतराळयानांनी आयोची जी छायाचित्रं घेतली आहेत त्यावरून तेथे ३५० ज्वालामुखी असावेत, असा अंदाज आहे. ट्रिटॉन म्हणजे नेपच्यूनचा उपग्रह. १९८९ मध्ये व्हॉयेजर-२ या यानानं टिपलेल्या ट्रिटॉनच्या छायाचित्रांमध्ये दोन वैशिष्टय़पूर्ण ज्वालामुखी आढळून आले होते. या ज्वालामुखींतून तप्त लाव्हा बाहेर पडत नसून बर्फ, धूळ, मिथेनची संयुगे, द्रवरूपातील नायट्रोजन बाहेर फेकली जात असावीत. शनिच्या एंसेलॅडस या उपग्रहावर अशाच प्रकारचे ‘ज्वालामुखी’ अस्तित्वात असल्याचे कॅसिनी यानाने दाखवून दिले आहे.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

एडवर्ड जिम कॉर्बेट यांचा जन्म २५ जुलै १८७५ रोजी भारतात एका आयरिश कुटुंबात झाला. निसर्गरम्य अशा नैनितालमध्ये त्याचे शिक्षण झाले. एका आदिवासीने त्यांना निसर्गाची गोडी लावली. सन १९२५च्या सुमारास गढवाल परिसरात नरभक्षक वाघांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची नेमणूक केली. ही कामगिरी त्यांनी चोख बजावली. वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी तसेच जंगलतोडीमुळे नष्ट होणाऱ्या वनांसाठी त्यांनी खास कायदे करण्यास ब्रिटिश सरकारला भाग पाडले. त्यांच्यामुळे रामगंगा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर झाला. वन्यप्राण्यांशी झालेल्या समोरासमोरील अनुभवांवर ‘मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ’ या ग्रंथाच्या प्रतींनी खपाचा उच्चांक गाठला. याशिवाय त्यांची ‘मार्च इंडिया’, ‘दी टेम्पल टायगर’ ही पुस्तके गाजली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कैसर- ए -हिंद’, ‘स्टार ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हे किताब दिले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते भारतातच राहिले. इतकेच नव्हे तर आपली सारी संपत्ती भारत सरकारच्या स्वाधीन करून उर्वरित आयुष्य कुमाऊँ जनतेच्या सेवेसाठी व्यतीत केले. भारत सरकारनेही त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करून कुमाऊँ परिसरातील राष्ट्रीय उद्यानाला (रामगंगा खोऱ्यातील परिसर) जिम कॉर्बेट यांचे नाव दिले. नैनिताल परिसरातील त्यांचे ‘गर्नी हाऊस’ हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
संजय शा. वझरेकर

दिव्याचा दहावा वाढदिवस होता. दादाने घर सजवले. आईने तिच्या आवडीचे पदार्थ पार्टीसाठी बनविले. ताईने सुंदर फ्रॉक आणला. बाबांनी भलाथोरला केक आणला. कॉलनीतले, वर्गातले कितीतरी मित्रमैत्रिणी आले. दुपारपासून धम्माल चालली होती. प्रत्येकजण येऊन दिव्याला शुभेच्छा देऊन भेट देत होता. तिची लाडकी नीलू आत्या, देवीमावशी आल्या. सुभाषकाका, अनिलकाका आले. दिव्या खूप खूश होती. दिवस कसा संपला कळले नाही. रात्र झाली. निरोप घेऊन एक एकजण निघून गेली. भेटींच्या ढिगात बसून दिव्या एक-एक भेट उघडत होती. एका सुंदर सोनेरी डब्यात एक कंदील होता. तो हातात घेऊन दिव्याने इकडून तिकडून न्याहाळला. हा शोभेचा कंदील आहे का प्रकाशही देतो असा विचार तिच्या मनात आला. तिने कंदिलावर असलेले बटन फिरवले. त्याबरोबर एक बुटका राक्षस टुणकन उडी मारून तिच्या हातावर बसला आणि म्हणाला, मी हुप्पूगुप्पू. तुझ्या तीन इच्छा पूर्ण होतील. दिव्या चकित झाली. ती काही बोलायच्या आत गोंडय़ाची टोपी हलवत राक्षस अदृश्य झाला. दिव्याच्या मनात एकच विचार होता. आज किती मज्जा आली. रोजच माझा वाढदिवस असता तर? तेवढय़ात बुटका राक्षस पुन्हा कंदिलाबाहेर येऊन म्हणाला, पहिली इच्छा. आणि मग काय रोज आपला दिव्याचा वाढदिवस साजरा व्हायला लागला. दिव्या खूश, मित्रमैत्रिणी खूश. रोजच गंमत, खूप खूप धम्माल. गंमत कसली? पाचव्या दिवशी दिव्याच्या लक्षात आले ती १५ वर्षांची झाली होती. संकल्पा तिची फास्ट फ्रेंड. तिने येऊन दिव्यालाच विचारले, दिव्या कुठे आहे? तू तिची ताई का? दिव्याला रडूच फुटले. कुठलेच कपडे येईनात. कुणी ओळखेना. हा हा म्हणता दिव्या चक्क म्हातारीही झाली. मग मात्र कंदील घेऊन रडत दिव्या किंचाळली. मला वाढदिवस नको. मला पूर्वीएवढी दिव्या व्हायचंय. दिव्या पूर्वीएवढी छोटी छान मुलगी झाली. बुटका हुप्पूगुप्पू राक्षस समोर हजर झाला. म्हणाला, आता फक्त तिसरा वर शिल्लक उरलाय. हुप्पूगुप्पू कंदिलात कायमचा परत जाऊ दे. दिव्या म्हणाली. शाळेची तयारी करून शाळेला जाताना दिव्याने वाटेत कंदील टाकून दिला. एखादी गोष्ट आवडली म्हणून तिचा अतिरेक करू नये. प्रत्येक गोष्टीत संयम हवा.
आजचा संकल्प- मी संयमाने वागेन. ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com