Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

समुद्राचे पाणी शिरल्याने ३५० एकर भातशेतीचे नुकसान
उरण/वार्ताहर

समुद्राचे पाणी भातपिकात शिरून खोपटा- कोप्रश्नेली ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ३५० एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भातपिकाच्या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी आलेल्या उधाणाच्या भरतीचे पाणी बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करीत खोपटा- कोप्रश्नेली- बांधपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भातशेतीत घुसले. खार विभागाच्या संरक्षण बंधाऱ्यांना सात ते आठ ठिकाणी भगदाडे पडली. यामुळे समुद्राचे खारट पाणी थेट भातशेतीची लागवड केलेल्या पिकात शिरले.

क्रीम पोस्टवर ठराविक कर्मचाऱ्यांचा डल्ला
अतिरिक्त आयुक्त डॉ.संजय पत्तीवारही गोत्यात
जयेश सामंत
नवी मुंबई महापालिकेत उघड झालेल्या अतिक्रमण गैरव्यवहारामुळे महापालिकेच्या अब्रूची लक्तरे यापूर्वीच वेशीवर टांगली गेली असताना, आता येथील बढत्या-बदल्यांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अंदाधुंदी कारभाराचे वेगवेगळे नमुने पुढे येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगररचना, मालमत्ता कर, उपकर, अतिक्रमण, आरोग्य हे विभाग महापालिकेत मोक्याचे आणि तेवढेच कमाईचे समजले जातात. हा लोण्याचा गोळा पटकाविण्यासाठी विशिष्ट कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची चढाओढ सुरू असून काही विभागात तर अशा मोक्याच्या जागांवर तेच ते कर्मचारी अनेक वर्षापासून ठिय्या मारून बसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

शिवसेनेचा आज मेळावा; बंडखोरांना ठेवले दूर
उरण/वार्ताहर - उरण येथे उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या मार्गदर्शन मेळाव्यापासून सेनेच्या बंडखोरांना दूर ठेवण्यात आले असून, उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय या मेळाव्यातून घेण्याचे सूतोवाच पदाधिकाऱ्याकडून केले जात आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, खालापूर विभागातील सेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २५ जुलै रोजी जेएनपीटी वसाहतीतील माध्यमिक शाळेच्या सभागृहात आयोजित या मेळाव्यास शिवसेना नेते मनोहर जोशी, जिल्हाप्रमुख बबन पाटील, मावळचे खासदार गजानन बाबर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

हागणदारीमुक्त योजनेचा तारा गावात बोजवारा
पनवेल/प्रतिनिधी - कर्नाळा पक्षी अभयारण्यापासून जवळच असलेल्या तारा गावामध्ये हागणदारीमुक्त योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या योजनेंतर्गत गावात बांधण्यात आलेली एकूण सात स्वच्छतागृहे आठ महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी याप्रकरणी उदासीन भूमिका घेतल्याने ही समस्या कशी सोडवावी, या विवंचनेत ग्रामस्थ आहेत. राज्य सरकारच्या हागणदारीमुक्त योजनेंतर्गत या गावात दोन ठिकाणी मिळून सात स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली. तारा गाव हे कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीत मोडते. या ग्रामपंचायतीला चांगले उत्पन्न असल्याने या प्रसाधनगृहांची योग्य देखभाल होणे अपेक्षित आहे, परंतु सांडपाणी वाहून नेण्याची आवश्यक व्यवस्था न झाल्याने ही प्रशाधनगृहे कालांतराने न वापरण्याजोगी झाली. त्यानंतर या गावात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. या प्रसाधनगृहांच्या बांधणीमुळे गावातील नागरिकांना विशेषत: महिला आणि वयस्कर व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र ती नादुरुस्त झाल्याने या मंडळींना नाईलाजाने निसर्गाच्या सान्निध्यातच प्रश्नतर्विधी उरकावे लागत आहेत. या गावाच्या आजूबाजूला जंगल, तसेच गावाबाहेरून मुंबई-गोवा महामार्ग गेला असल्याने प्रश्नतर्विधीसाठी कोठे जावे हा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर ही गैरसोय टाळण्यासाठी ही स्वच्छतागृहे पूर्ववत करावीत, अशी अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती केली. ग्रामसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. सध्या पावसाळा असल्याने सांडपाण्याच्या वाहिनीचे काम करणे अवघड असल्याचे मत काही सदस्यांनी व्यक्त केले, परंतु पावसाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच ही समस्या अस्तित्वात असून, त्याबाबत काहीच उपाययोजना होत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली. हागणदारीमुक्त योजनेच्या अधिकाऱ्यांनी या समस्येत लक्ष घालावे अन्यथा सरकारच्या योजना केवळ कागदावरच उरतील, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.