Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

स्वतंत्र औद्योगिक नगरीविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र
मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / नाशिक
सातपूर औद्योगिक वसाहतीचे रूपांतर स्वतंत्र औद्योगिक नगरीमध्ये करण्याचा राज्य शासनाच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रखर विरोध दर्शवित तो फेटाळून लावतानाच सिडकोतील सहाव्या योजनेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव तहकूब ठेवत त्याकरिता समिती स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सातपूर औद्योगिक वसाहतीबाबत राज्य शासनाने घेतलेल्या भूमिकेला विरोध करण्यासाठी थेट मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

दारणा व नांदुरमध्यमेश्वर धरणांमधून पाणी सोडले
इगतपुरीत शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी
प्रतिनिधी / नाशिक
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या दमदार पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमधील बहुतांश शेतांमध्ये ‘पाणीच पाणी’ झाले आहे. उर्वरित भागात मात्र शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. संततधार पावसाने धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढण्यास हातभार लागला आहे. इगतपुरीतील दारणा धरण ७५ टक्क्य़ांहून अधिक भरल्याने शुक्रवारी त्यामधून १६ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.

जिल्ह्य़ातील सहा पतसंस्थांची कलम ८८ अन्वये चौकशी पूर्ण
७९ संचालक व २२ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित
प्रतिनिधी / नाशिक
डबघाईस आलेल्या सहा पतसंस्थांची कलम ८८ अन्वये झालेल्या चौकशीत ७९ संचालक व २४ कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून १० कोटी १० लाख ३४ हजार रूपये वसुलीचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत विषय पत्रिकेवरील आठ विषयांवर चर्चा होऊन कर्ज वसुलीचा आढावा घेण्यात आला.

जळगाव व नंदुरबारमध्ये पॅकेजने केले सत्ताधाऱ्यांचे वांदे
नाशिकमध्ये झालेली मंत्रीमंडळाची बैठक काही मोजक्या मंत्र्यांसाठी गांभीर्याची; तर अनेकांसाठी एक ‘पर्यटन यात्रा’च ठरली. बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्य़ाला झुकते माप मिळेल, याविषयी आधीच अंदाज व्यक्त करण्यात येत होते. परंतु माप झुकते करताना नंदुरबारसह जळगाव जिल्ह्य़ाला थेट ‘झोपविण्यात’ आल्याने या दोन जिल्ह्य़ांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मंत्र्यांची चांगलीच गोची झाली आहे.

राज ठाकरेंच्या हस्ते पारितोषिक न मिळाल्याने विद्यार्थी नाराज
प्रतिनिधी / नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पर्यावरण विभागातर्फे येथील सार्वजनिक वाचनालयाच्या माधवराव लिमये सभागृहात आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या पर्यावरणविषयक चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाकरे यांनी यावेळी कोणतेही वक्तव्य करणे टाळत उद्घाटनानंतर लगेच पुढील कार्यक्रमांसाठी प्रस्थान केल्याने त्यांच्या हस्ते पारितोषिक मिळेल या अपेक्षेने सकाळपासून थांबलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली.

भारतीय अभियंते पाश्चात्यांच्या तोडीस तोड- छगन भुजबळ
नाशिक / प्रतिनिधी

पाश्चात्य देशातील तोडीस तोड काम आपले अभियंते करू शकतात हे अनेकवेळा सिध्द झाले आहे. त्यांना संधी मिळाल्यास ते जागतिक स्तरावर काम करू शकतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित राज्य जलसंपदा विभागातंर्गत यांत्रिकी संघटनेच्या सुवर्ण महोत्सव समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

बंद कारखाने सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील - नारायण राणे
नाशिक / प्रतिनिधी

आर्थिक मंदीमुळे उद्योजक संकटात सापडले असून उद्योग वाढीसाठी शासनाकडून नेहमीच सहकार्य देण्यात येते. बंद कारखाने सुरू करण्याचेही सरकारचे प्रयत्न असून उद्योजकांच्या ६० टक्के मागण्या आठवडय़ाभरात सोडविण्यात येतील, असे आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिले. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, निवेक व नाईस या उद्योजकांच्या संघटनांतर्फे निवेक येथे बैठक झाली. त्यावेळी राणे बोलत होते.

रामदास फुटाणे यांची नाशिकमध्ये काव्य मैफल
नाशिक / प्रतिनिधी

सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे सावरकरनगरच्या जागेत विविध उपक्रमांच्या आयोजनाला सुरूवात झाली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ‘गालातील हास्य-गालावरील धारा’ या मैफलीचे आयोजन सोमवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे.मैफलीत कवी रामदास फुटाणे, फ. मु. शिंदे, सुरेश शिंदे यांच्या हास्य व गंभीर कवितांच्या मैफलीचा अपूर्व आनंद रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. आनंदवल्ली परिसरातील सावरकरनगरमधील गंगापूर पोलीस ठाण्याजवळ हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. काव्य व हास्यप्रेमींनी कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, आ. डॉ. वसंत पवार यांनी केले आहे.

संगीत दिग्दर्शक बाळ देशपांडे यांचा आज गौरव
नाशिक / प्रतिनिधी

अखिल भारतीय पातळीवर सहावे बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशन २०१० मध्ये नाशिक येथे होणार आहे. त्यानिमित्ताने दरमहा सर्व शाखीय समाजात विविध उपक्रम घेण्याचा निर्णय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतला आहे. त्या अनुषंगाने दुसरा कार्यक्रम शनिवारी २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परशुराम साईखेडकर नाटय़मंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमात उद्योजक राम भोगले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून व संगीत दिग्दर्शक बाळ देशपांडे यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.बाळ देशपांडे यांचा सत्कार स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते होणार आहे, तर राम भोगले यांचे ‘ब्राम्हण समाज व उद्योजकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सर्व शाखीय ब्राम्हण समाजाने मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी तर स्वागताध्यक्ष काकामहाराज ढेकणे, सतीश शुक्ल, धनंजय बेळे यांनी केले आहे.

राजलक्ष्मी बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
नाशिक / प्रतिनिधी

येथील राजलक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. बँकेच्या आर्थिक उलाढालीचा आहेर यांनी आढावा घेतला. ३१ मार्च २००९ अखेर भागभांडवल व स्वनिधी ३५३.४७ लाख, सभासद संख्या ६,७९४, ठेवी ३६०१.१८ लाख, कर्ज वाटप २३०२.७७ लाख तसेच नफा २३ लाख ७२ हजार रूपये आहे. चालू आर्थिक वर्षात बँक ५० कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. बँकेतर्फे वीज बील, टेलिफोन बील भरणा केंद्र, फ्रँकींग सुविधाही करण्यात येणार आहे. नियमित कर्जखात्यांसाठी चार टक्के व्याजदराच्या रकमेत सूट, ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना, शैक्षणिक कर्ज, सोने तारण, ऋणमुक्ती योजना, सभासदांची वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी, नवीन दोन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेकडे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले.बँकेच्या विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक भाबड यांनी केले. ३१ मार्चचा अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन बँकींग तज्ज्ञ संचालक शिवदास डागा यांनी केले. बँकेच्या नफा वाटणीचे विश्लेषण बँकेचे संचालक अर्जुन कठपाल यांनी केले. तसेच यावेळी सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. शासकीय लेखापरीक्षकांचा अहवाल ज्येष्ठ संचालक नंदलाल काळे यांनी सादर केला. सूत्रसंचालन कल्याणी खोत यांनी केले. आभार कार्यकारी संचालक बाळासाहेब पगार यांनी मानले.

चारचाकी खासगी वाहनांना एकरकमी कर योजना
नाशिक / प्रतिनिधी

चार चाकी खासगी वाहनांना ३१ जून २००९ पर्यंत सरसकट वाहनांच्या किंमतीच्या सात टक्के असा एकरकमी मोटार वाहन कर भरावा लागत होता. यात १ जुलैपासून सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनांची किंमत १० लाखापर्यंत असल्यास वाहनाच्या किंमतीच्या सात टक्के एकरकमी कर, वाहनांची किंमत १० लाखापेक्षा अधिक परंतु २० लाखापेक्षा अधिक नसेल तर वाहनांच्या किंमतीच्या आठ टक्के एकरकमी कर. वाहनांची किंमत २० लाखापेक्षा अधिक असेल तर वाहनाच्या किंमतीच्या नऊ टक्के एक रकमी कर याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे प्रश्नदेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

प्रशिक्षणाबाबत आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत कळवण येथे १ ऑगस्ट ते १५ नोव्हेंबर या कालावधीत भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये आवश्यक असलेले सामान्य ज्ञान, अंकगणित, बौद्धिक चाचणी, सामान्य इंग्रजी मुलाखत तंत्र आदी विषयांचे प्रशिक्षणासह प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन दिले जाते. उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा, तो शिक्षण घेत नसावा. कमीत कमी १० वी उत्तीर्ण, उच्च शैक्षणिक पात्रता व टंकलेखन, संगणक परीक्षा पास असल्यास प्रश्नधान्य देण्यात येईल. वय १८ ते ३० च्या दरम्यान असावे. इच्छुकांनी २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, शिवाजीनगर, कळवण येथे शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीस हजर रहावे असे आवाहन रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी जी. डी. कोळी यांनी केले आहे.