Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

रात्री अतिक्रमण हटविण्याचा महापालिकेचा अजब निर्णय
वार्ताहर / जळगाव

शहरात सर्वत्र अतिक्रमणाचा वेढा पडला असताना रस्ते व प्रमुख चौकांची त्यापासून सुटका करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याऐवजी त्यांना दिवसासाठी अभय देत रात्रीच्या वेळी अतिक्रमण हटवावे, असा अजब आदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे. शहरातील वाहतूक समस्येसाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. तथापि महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रशासनाने या महत्वाच्या विषयाला नेहमीच दुर्लक्षित ठेवले आहे.

जळगावातील टवाळखोर तरुणांवर कारवाईची मागणी
वार्ताहर / जळगाव

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्नेहल पाटील या विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्याने माधुरी शेवाळे या घटनेची आठवण करून दिली आहे. शेवाळे प्रकरणात पोलिस प्रशासन व महाविद्यालयाने योग्य ती पावले न उचलल्याने सध्या शहरात असे प्रकार वाढीस लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर, टवाळखोर तरुणांविरोधात कायम स्वरूपी ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ग्रामीण विकासाची कामधेनू मृत्यूशय्येवर
राज्यातील ८० टक्के शेतकरी अल्प भूधारक आहेत. पारंपरिक शेती व अपुरा पत-पुरवठा अपुरे पर्जन्यमान, शेती मालाची बाजार भावातील अनियमितता, शासनाची वैचारिक गोंधळाची परिस्थिती या आणि अशा अनेक कारणांमुळे हवालदिल झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मदतीचा हात देवून स्वाभिमानाने उभे करणाऱ्या भू-विकास बँकेची आजची स्थिती दयनीय आहे. ‘बळीराजा सुखी तर देश सुखी’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी १९३५ मध्ये भू-विकास बँकेची स्थापना झाली.

उपसा सिंचन योजनेच्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा
शहादा / वार्ताहर

खान्देश पॅकेजमध्ये राज्यातील उपसा सिंचन योजनांसंदर्भात थकीत १४०० कोटी पैकी ५०० कोटीचे कर्ज माफ केल्याचा सर्वाधिक लाभ तापी काठावरील शेतकऱ्यांना होणार आहे. नंदुरबार, धुळे तसेच जळगाव जिल्ह्य़ातील सहकारी तत्वावरील आणि काही खासगी उपसा सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा प्रचंड बोझा झाला होता, मंत्रीमंडळातील बैठकीत शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविला गेल्याने शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रास पुरस्कार प्रदान
भुसावळ / वार्ताहर

येथील औष्णिक वीज केंद्राला वीजनिर्मितीचे उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल नुकताच नवी मुंबई येथे तीन लाख रूपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भुसावळ औष्णिक वीज केंद्राचे मुख्य व्यवस्थापक व्ही. एस. पाटील यांनी दीपनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.येथील वीज केंद्राने सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार पटकावला आहे, तसेच संच क्रमांक १, संच क्रमांक २ व ३ प्रदीर्घ काळ चालवून केंद्राने पुरस्कार पटकावला.

उशिराच्या पावसाने भाताऐवजी सोयाबीन
स्पॉट दारणा
भगूर / प्रकाश उबाळे
यंदा भाताचे पीक घेण्याची स्थानिक शेतकऱ्यांची कितीही इच्छा असली तरी लांबलेल्या पावसामुळे त्यांना सोयाबीनची लागवड करणे भाग पडले असून त्यामुळे परिसरात या पिकाच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर प्रथमच वाढ झाली आहे. दारणा पटय़ात प्रश्नरंभीच्या सलग दीड महिन्यात पाऊस न झाल्याने दुष्काळ पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असला तरी तोपर्यंत भात लावणीचा कालावधी उलटून गेला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मनमाडमध्ये वृद्धसेवा आश्रमाचे भूमिपूजन
मनमाड / वार्ताहर

ज्येष्ठ नागरिक समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा वृद्धापकाळ सुखासमाधाने व्यतीत व्हावा, तसेच त्यांना सेवा, समता, प्रेम, आदर मिळावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शहरात वृद्धसेवा आश्रमाची उभारणी होत आहे. या साकारणाऱ्या आश्रमचे भूमिपूजन नुकतेच येथे करण्यात आले. या वृद्धाश्रमासाठी माजी नगरसेवक प्रविण नाईक यांनी जागा दान केली आहे. वृद्धसेवा आश्रमाचा भूमिदान व भूमिपूजन सोहळा अजय कुलकर्णी व मीना कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक मालतीबाई पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षा सरला अमोलिक यांनी त्यांचा सत्कार केला तसेच प्रवीण नाईक यांनी दिलेल्या भूदानाबद्दल आभार मानले. नगराध्यक्ष गणेश धात्रक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजाभाऊ छाजेड, नगरसेवक समाजसेवक, शिक्षण संस्थेतील मान्यवर रेल्वे निवृत्त संघटित सभासद याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते. अमोलिक यांनी प्रश्नस्तविकात समाजाचे ऋण फेडणे या विचारातून वृद्धसेवा आश्रम सुरू करत आहे, असे स्पष्ट केले. साईनाथ गिडगे, उपाध्यक्ष महेश शिरसाठ, विजय नाईक, डी. डी. पाटील, नंदुभाऊ माळी, रमेश अण्णा हिरण, नगरसेवक संतोष बळीद, सादीकभाई पठाण, संदीप घुले, दिलीप तेजवाणी, साधना गायकवाड, रईस फारुकी आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मामको ट्रस्टतर्फे उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मालेगाव / वार्ताहर
मालेगाव र्मचटस् बँक संचलित मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने येत्या रविवारी सकाळी दहा वाजता येथील आय.एम.ए. सभागृहात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे मानद सचिव देविदास बागडे यांनी दिली. शहर व तालुक्यातील सर्व शाळांमधील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे तसेच दहावीत मागासवर्गीय व अपंगामध्ये प्रथम येणारे विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बैरागी, सचिव रत्नाकर कोठावदे यांनी केले आहे.