Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

चिनी, जपानी की नेपाळी?
पूर्वाचलाबाबत संपूर्ण भारतात होत असलेली ही उपेक्षा आजची नाही. स्वातंत्र्यापूर्वीपासूनची ही परंपरा आहे. पण याचे दूरगामी परिणाम किती भयंकर आहेत याचा विचार सर्वसामान्यांपासून नेत्यांपर्यंत कोणीच करताना दिसत नाही. सिंगापूरमध्ये पाणी या विषयावर झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील मिझोरामचे मुख्यमंत्री लालथानहौला यांनी आपल्यावरील वांशिक अन्यायाचा पाढा वाचला.
‘मी सुद्धा वंशभेदाचा बळी ठरलो आहे. आणि ते सुद्धा भारतात!’’
हे उद्गार सगळ्या उपस्थितांना चकित करणारेच होते..
आसेतुहिमाचल, असे भारताचे वर्णन केले जाते. देशाच्या चतु:सीमा सांगताना काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोलकाता अशी नावे सांगितली जातात. आपली ढोबळ कल्पना अशी असते की आसेतुहिमाचल उच्चारले की संपूर्ण भारताचे मानचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण असे खरेच होते का? आंतरभारतीचा विचार करताना भारताचे सगळेच भूभाग आपल्या अंत:चक्षूंसमोर उभे राहतात का? केरळसह दक्षिणेतील राज्ये, काश्मीरसह पंजाब, हिमाचल, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान, गुजरात, पूर्वेला ओरिसा, बिहार आणि प. बंगाल तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड ही राज्ये आपल्याला सहजी आठवतात.

समांतर सिनेमा चित्रगृहातून हद्दपार झाला!
टेलिव्हिजनने सिनेमाची ‘मास मीडियम’ ही एकाधिकारशाही संपविली, ही ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धातील वस्तुस्थिती होती. सिनेमाकडे एक ‘कला’ म्हणून पाहणाऱ्या व त्या ‘कले’चा वारसा सामान्य माणसात रुजविणाऱ्या फिल्म सोसायटी चळवळीला घरघर लागली. टेलिव्हिजनने तिसरा बळी घेतला तो म्हणजे समांतर सिनेमाचा. हा सिनेमा चित्रपटगृहातून हद्दपार झाला. सिनेमा हे केवळ दोन घटका मनोरंजनाचे माध्यम आहे अशी ठाम समजूत असलेला प्रेक्षक फक्त उरला. टेलिव्हिजनच्या ‘क्रेझ’मुळे एक अत्यंत चुकीची समजून रुजविली गेली. ती म्हणजे मनोरंजन सर्वतोपरी! टेलिव्हिजन चॅनल्स हा मंत्र कसोशीने आजही जपत आहेत. याचे परिणाम समाजातल्या इतर क्षेत्रावरही व्हायला लागले. काही वृत्तपत्रेसुद्धा मनोरंजनाकडे वळली. सिनेमा साप्ताहिकांचा वाचक घटला. सिनेमा मनोरंजनाकडे इतका वळला की सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे ही फिल्म सोसायटी चळवळीने रुजवलेली संकल्पना मागे पडली. आज सिनेमाच्या जाहिरातीत दिग्दर्शकाचे नाव ठळकपणे नसते. त्याच्या नावाची कोणी दखलच घेत नाही.

अत्यवस्थ खाडीच्या मरणकळा..
ठाण्याची खाडी पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे. इतिहासात डोकावून पाहायचे तर अगदी ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत ठाण्याच्या खाडीत माशांची भरपूर पैदास होती. परंतु खाडीकडे झालेले दुर्लक्ष, त्यावर अक्षरश: रोजच्या रोज होणारे अतिक्रमण, त्यातून पर्यावरणाचा ढासळलेला तोल यामुळे आजच्या घडीला खाडी मृतवत झाली आहे. गेल्या तीन दिवसांत ठाणे शहरातील चेंदणी कोळीवाडय़ापासून कळव्यापर्यंतच्या अनेक भागात खाडीचे पाणी घुसले. हा भाग अर्थातच खाडीलगतचा. घराघरांमध्ये पाणी घुसले आहे, तोवर लाटांची उंची, निसर्गाचा प्रकोप अशा अनेक मुद्यांची चिकित्सा होईल. पाणी ओसरले की मूळ मुद्याचा पुन्हा सर्व यंत्रणांना सोयिस्कर विसर पडणार. वस्तुत: यात मुद्दा एखाददुसऱ्या दिवशी खाडीलगतच्या घरांमध्ये पाणी घुसण्याचा नाही. प्रश्न खाडी जगवण्याचा आहे. ठाण्याची खाडी आजमितीस अत्यवस्थ आहे. खरेतर रोजच्या रोज मरणकळा अनुभवते आहे. काही पर्यावरणप्रेमी संस्थांचा अपवाद वगळता कुठल्याही सरकारी यंत्रणेला या अत्यवस्थ खाडीची फिकीर असल्याचे जाणवत नाही. खाडी जगली तर आपण जगणार, हा पर्यावरण समतोलाचा मंत्रही जणू विस्मृतीत गेला आहे.