Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची संख्या छत्तीस; अभिनव मराठी शाळाही बंद
पुणे, २४ जुलै / प्रतिनिधी

अभिनव विद्यालयाच्या आणखी एका विद्यार्थ्यांला लागण होऊन त्यांच्या रुग्णांची संख्या वीसपर्यंत पोहोचली असून सिम्बायोसिसमधील एका मुलीला याची लागण झाल्याने शहरात आज दोन रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक म्हणजेच ३६ झाली असून यामुळे अभिनवच्या इंग्रजीसह मराठी माध्यमाची शाळा बंद करण्याची सूचना शाळा प्रशासनाने जारी केली आहे. यामुळे आता शहरातील चार शाळा ‘स्वाइन फ्लू’ मुळे बंद करण्यात आल्या आहेत.

थेरगावच्या नाल्यावर बिल्डरचे अतिक्रमण
पिंपरी, २४ जुलै / प्रतिनिधी

थेरगावच्या दत्तनगर ते थेरगाव या साखळी रस्त्यालगत नैसर्गिक नाल्याच्या पात्रात भराव टाकून एका बिल्डरने अतिक्रमण केल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक श्रीरंग बारणे यांनी आज महापालिका प्रशसनाच्या निदर्शनास आणले. महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांना दिलेल्या निवेदनात बिल्डरने नाला कशाप्रकारे बळकावला ते पुराव्यासह उघड केले. सव्र्हे क्रमांक २७, २८ व २३ च्या सामाईक हद्दीत पंधरा मीटरचा नैसर्गिक नाला अनेक वर्षांपासून आहे. गावच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी मोठा नाला (फाड)असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. महापालिकेच्या शहर विकास आराखडय़ातही हा नाला दाखविलेला आहे.

अपक्ष आमदार पक्षाकडून लढण्यास तयार- हर्षवर्धन पाटील
पुणे, २४ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील आघाडी सरकारमध्ये असलेल्या अपक्ष आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून लढण्यास तयार असून, पक्षातील काही नेत्यांनीही त्यास तयारी दर्शविली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिली. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सध्या अपक्ष आमदारांच्या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसकडे १२ अपक्ष आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सात अपक्ष आमदार आहेत.


नववी, दहावीतील या महत्त्वाच्या गोष्टींकडे कोणी लक्ष देईल ?
दीनानाथ गोरे

इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेतील भूमिती पेपरात ६० पैकी २१ पेक्षा कमी गुण (३५ टक्क्य़ांपेक्षा कमी) मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रात ६ लाखांच्यावर असेल. महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक शाळांतून आढावा घेतला तर लक्षात येईल की, ज्या विद्यार्थ्यांना १० वी बोर्डाच्या बीजगणित-भूमिती पेपरात १२० पैकी २५ गुणही मिळालेले नाहीत, असे विद्यार्थी, अंतर्गत गुण व ग्रेस मार्काच्या सवलतींमुळे गणितात पास झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना भूमिती पेपरात ६० पैकी १० गुणही मिळालेले नाहीत, असे का होते?

भोर-वेल्हा मतदारसंघावर ‘राष्ट्रवादी’चा दावा
थोपटे यांना शह देण्याची तयारी
पुणे, २४ जुलै / खास प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाकडे असलेल्या जिल्ह्य़ातील एकमेव भोर-वेल्हा विधानसभा मतदारसंघांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दावा केला असून यासंदर्भात तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी (दि. २५) बारामती होस्टेल येथे भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार अनंतराव थोपटे सक्रिय प्रचारात नसल्याची राळ उठवून त्यांना शह देण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने कंबर कसल्याचे दिसत आहे.

लोहमार्ग ओलांडणे हा स्वत:ने स्वत:विरुद्ध केलेला गुन्हा!
रेल्वे सुरक्षा दलाची प्रवाशांसाठी प्रबोधनात्मक मोहीम

पिंपरी, २४ जुलै/प्रतिनिधी

लोहमार्ग ओलांडणे हा स्वत:च स्वत:विरुद्ध केलेला गुन्हा आहे. त्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती देत रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांचे प्रबोधन सुरू केले आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या पुणे मंडळ विभागाच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग ओलांडण्याचा गुन्हा करणाऱ्या प्रवाशांचे प्रबोधन व्हावे याकरिता जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त राजेंद्र रुपनवर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

प्लॅस्टिकच्या भस्मासुराला रोखा
आजकाल सगळीकडे प्लॅस्टिक हा शब्द ऐकू यऊ लागला आहे. सुमारे दीडशे वर्षापूर्वी माणसाने ‘प्लॅस्टिक’ या अधातूची निर्मिती केली व शंभर वर्षापूर्वी प्लॅस्टिकने माणसाच्या जीवनात प्रवेश केला. आपल्या घरात नजर टाकली तर स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत सगळीकडे प्लॅस्टिकच्या वस्तू दिसतील. जणू काही आज प्लॅस्टिक हे आपल्या जीवनाचे अविभाग्य अंग बनले आहे.

अभ्यासाशी नाते जोडा!
जून महिन्यात शाळेचे वेध साऱ्यांनाच लागतात. शाळा सुरू होते आणि सहामाही परीक्षा कधी येते ते कळतच नाही. वेळ निघून जातो आणि परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी आटापिटा करून प्रश्नपत्रिकेपुरता अभ्यास करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे परीक्षेमध्ये पास होण्यासाठी गुण मिळवणे एवढेच काम होते. ज्ञान मिळविण्याचे ध्येय मात्र दूरच राहते आणि परीक्षेची भीती कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर बसलेली असते. भविष्यात परीक्षा कोणतीही असो, त्यासाठी नियोजन केल्यास हे टळू शकते. अगदी पहिलीपासून अभ्यासाची बैठक बसवली तर भविष्यात यूपीएससी, एमपीएससीसारख्या अवघड परीक्षेमध्ये सहज चांगले यश मिळविणे सोपे होऊन जाईल, असा आत्मविश्वास हडपसर येथील ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रश्नचार्य रवींद्र वाघ यांनी व्यक्त केला.

‘कागदी मतपत्रिकेचा वापर केला गेला पाहिजे’
पुणे, २४ जुलै/प्रतिनिधी

भारतात मतदानासाठी इव्हीएम यंत्राचा वापर व कार्यपद्धतीबाबत अनेक राजकीय पक्ष, तज्ज्ञ कार्यकर्ते यांनी सुरक्षेविषयी संदिग्धता निर्माण होईल, असे मुद्दे उपस्थित केले आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदानाबरोबर कागदी मतपत्रिकेचा वापर केला गेला पाहिजे, अशीही मागणी भाजपचे डॉ. किरीट सोमय्या यांनी आज केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये कशाप्रकारे बिघाड करता येते, याचे प्रात्यक्षिक भारतीय जनता पक्षाच्या वतीने सादर करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, विश्वास गांगुर्डे व पदाधिकारी उपस्थित होते. आयटी सुरक्षतेसंबंधित अधिकारी विजय मुखी म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कोणतीच गोष्ट पूर्णपणे सुरक्षित नाही. निवडणूक आयोगाने इव्हीएम दुरुपयोगाबाबतच्या कोणत्याही वादात सहभागी न होता योग्य उपाययोजनांचा, तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे.

‘बेहेरे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट’ला राज्य शासनाची मंजुरी
पुणे, २४ जुलै/प्रतिनिधी

बेहेरे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. बेहेरेज अॅकॅडमी ऑफ एज्युकेशन सोसायटीच्या बेहेरे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मंजुरीसाठी पुणे विद्यापीठाने शासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार १४ जुलैला शासनाने कॉलेजला व्यावसायिक महाविद्यालय म्हणून मंजुरी दिली असल्याची माहिती बेहेरेज क्लासेसचे संस्थापक संचालक प्रा. चंद्रशेखर बेहेरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी क्लासेसच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रा. बेहेरे म्हणाले की, बेहेरे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.) व बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बी.सी.ए.) हे दोन वर्ग चालू शैक्षणिक वर्षांपासून सुरू केले जाणार आहेत. प्रत्येक वर्गासाठी ८० जागा असतील. सागरदीप या नवी पेठ येथील इमारतीत येत्या काही दिवसांतच कॉलेज सुरू केले जाणार आहे. कॉलेजच्या संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेचच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.

पत्रकारितेच्या ‘एम.ए. (एम.सी.जे.)’ परीक्षेत श्रद्धा पतके प्रथम
पुणे, २४ जुलै/प्रतिनिधी

पुणे विद्यापीठातर्फे मे २००९ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारितेच्या एम.ए. (एम.सी.जे.) परीक्षेत मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य विद्यालयाच्या वृत्तविद्या व जनसंज्ञापन विभागाच्या श्रद्धा पतके या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला असून, किशोर कुलकर्णी व चित्रा गावडे हे विद्यार्थी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांचे मानकरी ठरले आहेत. महाविद्यालयाचा निकाल ६१.१९ टक्के लागला असून, १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयाची पांचाली बॅनर्जी आणि केआरटी महाविद्यालयाचा प्रवीण कर्वे यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला आहे.

केसरीवाडय़ातील गणेश मंदिरात उद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
श्रीधर फडके यांचा सोमवारी गीतरामायणाचा कार्यक्रम
पुणे, २४ जुलै/प्रतिनिधी

लोकसंग्रह आणि जनजागृतीचा वसा घेऊन लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवाला केसरीवाडय़ात सुरुवात केली. सर्वाचे श्रद्धास्थान असलेल्या या गणपतीचे देखणे मंदिर केसरीवाडय़ात उभारण्यात आले आहे. २६ जुलै रोजी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, महापौर राजलक्ष्मी भोसले उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने ज्येष्ठ गायक- संगीतकार श्रीधर फडके यांचा गीतरामायणाचा कार्यक्रम २७ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पाटबंधारे कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने
पिंपरी २४ जुलै / प्रतिनिधी

पावसामुळे शौचालयातील मैला मिश्रीत पाणी घरात शिरल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रहिवाशांना पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी आल्हाट यांनी शिवीगाळ करून अवमानीत केल्याने, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कष्टकरी पंचायतीच्या वतीने दापोडी येथील कार्यालयासमोर आज तीव्र निदर्शने करण्यात आली. कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रल्हाद कांबळे, वंदनाताई सोनवणे, धनाजी कांबळे, चंद्रकांत कांबळे, रवींद्र चव्हाण, मारुती नांगरे, सुनंदा कांबळे, छाया कांबळे, रेखा चव्हाण, अलका नांगरे, दत्तात्रय कांबळे आदी निदर्शनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता दीपक सौंदनकर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करुन आल्हाट यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल; दोन महिलांचा समावेश
संजय पारखे आत्महत्या प्रकरण
पिंपरी, २४ जुलै / प्रतिनिधी

पिंपरीतील तरुण संजय पारखे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली आज चौघा सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये दोघा महिलांचा समावेश आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे निरीक्षक नंदकुमार िपजण यांनी दिलेल्या माहितीनुसार ,मोहन वडमारे, कस्ती मोहन वडमारे, गिरी जावळे व अंजना भोगाडे या सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजयची पत्नी सुरेखा संजय पारखे (वय २८) हिने फिर्याद दिली आहे.
मोहन वडमारे याच्याकडून पन्नास हजार रुपये, कस्ती हिच्याकडून पंधरा हजार रुपये, गिरी याच्याकडून पंचवीस हजार रुपये, अंजना हिच्याकडून तीस हजार रुपये कर्ज तीन वर्षांपूर्वी घेतले होते. एका महिन्यात भरणा न केल्याने आरोपींनी पारखे यांना घर खाली करण्याची धमकी दिली होती.

परस्पर शाळेचे उद्घाटन करणाऱ्या मनसेच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका
देहूगाव, २४ जुलै / वार्ताहर

किवळे येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे परस्पर उद्घाटन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहा पदाधिकाऱ्यांना आज अटक करण्यात आली. त्यांना वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची तात्पुरत्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेअकरा वाजता अॅड. सुनील शंकर वाल्हेकर (वय ४०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), जनार्दन सखाराम खोपकर (वय ४५), सुरेंद्र मधुकर कुलकर्णी (वय ४२, रा. निगडी), शाम किसन काळभोर(वय ४१), संदीप दशरथ ढेरंगे (वय २९, रा. पिंपरी), मीना पंढरीनाथ गटकळ (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी), विनोद इराण्णा भंडारी (वय २६, रा. विकासनगर, किवळे), कैलास दगडू कटमोर (वय २३, रा. मामुर्डी, देहूरोड), सागर कृष्णा लांगे (वय २४, रा. देहूरोड मेन बाजार, देहूरोड), संजय नथू घनवट (वय २५) यांना अटक करण्यात आली.

दिशा सोशल फाऊंडेशनतर्फे आज अमोल कोल्हे यांच्याशी ‘संवाद’
पिंपरी, २४ जुलै/प्रतिनिधी

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर तुफान लोकप्रिय ठरलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेत शिवछत्रपतींची भूमिका साकारणारे डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम उद्या चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. येथील दिशा सोशल फाऊंडेशनतर्फे हा कार्यक्रम होत आहे. प्रख्यात निवेदक सुधीर गाडगीळ हे डॉ.कोल्हे यांच्याशी आपल्या शैलीत संवाद साधतील. शिवछत्रपतींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, चित्रीकरणादरम्यानच्या घडामोडी, मालिकेला मिळालेला उत्स्फू र्त प्रतिसाद आदी विषयांवर हा संवाद असेल. या सोहळ्याचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खासदार शिवाजी आढळराव, गजानन बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वाना मुक्त प्रवेश आहे. याच कार्यक्रमात फाऊंडेशनच्या वतीने आयोजित लोकसभा निवडणूक निकाल अंदाज स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवनिर्वाचित खासदारांच्या हस्ते करण्यात येईल. नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.

खंडणी प्रकरणातील खंडागळेचा संघटनेशी संबंध नाही
पिंपरी, २४ जुलै / प्रतिनिधी

मनसेच्या कार्यकर्त्यां म्हणून शाळा चालकांकडून ३० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या जोत्स्ना खंडागळे हिला दीड महिन्यांपूर्वीच निलंबित केले होते, तिचा संघटनेशी काडीचाही संबंध नाही असे म्हणत पिंपरी-चिंचवड मनसेने आता हात झटकले आहेत. संघटनेचे शहर अध्यक्ष मनोज साळुंखे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रात खंडागळे या कार्यकर्त्यां होत्या; परंतु दीड महिन्यांपूर्वी तत्कालीन महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्वेताताई परुळेकर यांनी त्यांना अशोभनीय वर्तनाबद्दल पक्षातून निलंबित केले होते,असे साळुंखे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जोत्स्ना खंडागळे हिला आज दुपारी पोलिसांनी न्यायालयात आणले तेव्हा न्यायाधीश संगीता जाधव यांनी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

थेरगावात शाळकरी मुलीचा खड्डय़ातील पाण्यात बुडून मृत्यू
पिंपरी, २४ जुलै / प्रतिनिधी

थेरगावातील गणेशनगर भागात आज सकाळी साडेचारच्या सुमारास एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचा इमारतीच्या पायासाठी खोदण्यात येणाऱ्या खड्डय़ामधील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
िहजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना विठ्ठल कुदळे (वय १४, रा. गणेशनगर, थेरगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. आज सकाळी घराशेजारी एका इमारतीच्या पायाच्या खड्डय़ामधील पाण्यात तरंगत असल्याचे चुलते उत्तम कुदळे यांना आढळले. तिला तातडीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला दहा वर्षांपासून फिट येत असल्याचे सांगितले. तसेच तिच्या डोक्यावरदेखील परिणाम झाला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

‘कामगारांना २५ वर्षांनंतर केले कायम’
पिंपरी, २४ जुलै/प्रतिनिधी

लोणावळा औद्योगिक वसाहतीमधील ‘सटेलाईट टूल्स अॅण्ड अॅन्सिल्लोरिश’ या कंपनीतील कामगारांना गेल्या २५ वर्षांनंतर ओळखपत्र व कायमस्वरूपी नियुक्तीपत्राचे वाटप कंपनीचे मालक गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कंपनीतील कामगारांनी नुकतेच हिंद कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. गेल्या २५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे प्रथम या कामगारांना ओळखपत्र आणि कायम करण्यात यावे, अशी मागणी केली होती. व्यवस्थापनाने पहिल्याच बैठकीमध्ये या कामगारांना कायम करण्याचे पत्र देण्याचे मान्य केले. कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामगारांना ओळखपत्र व कायम नियुक्तीपत्राचे वाटप नुकतेच पार पडल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत सुपेकर यांनी दिली.

डॉ. नितीन देसाई यांचा डॉ. कलाम यांच्या हस्ते सत्कार
हडपसर, २४ जुलै/वार्ताहर

पुणे येथील एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे सचिव डॉ. नितीन देसाई यांचा पाटणा येथे ‘व्हीजन-२०२०’ या संस्थेच्या मिटिंगमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. डॉ. देसाई यांनी अल्पावधित अत्यंत प्रगत पद्धतीने व अत्याधुनिक इन्स्ट्रमेंट्स वापरून एक लाख ९८० हजार शस्त्रक्रिया केल्या तसेच खेडय़ापाडय़ातील गरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांनी डोळ्यांची शस्त्रक्रिया केली. याशिवाय आदिवासी भागातील नंदूरबार येथील नागरिकांवर नऊ हजार शस्त्रक्रिया केल्या.

मुळशी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धोंडिबा कुंभार
पुणे, २४ जुलै / प्रतिनिधी

मुळशी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सकाळचे ज्येष्ठ पत्रकार धोंडिबा कुंभार तर कार्याध्यक्षपदी किशोर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच मुळशीतील पत्रकार संघटनेची धर्मादाय आयुक्तांकडे महा ८४७/२००९ क्रमांकानुसार नोंदणी करण्यात आली. संघाची नव्याने नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष-धोंडिबा कुंभार (सकाळ), उपाध्यक्ष- दत्तात्रेय उभे (अपेक्षा मासिक), कार्याध्यक्ष-किशोर देशमुख (पुढारी), सचिव-रमेश ससार(सकाळ), खजिनदार-सागर शितोळे (पुण्यनगरी).

‘स्थलांतर नको, पुनर्वसन हवे’
पिंपरी, २४ जुलै / प्रतिनिधी

शरदनगर व दुर्गानगर येथील झोपडपट्टीधारकांचे सेक्टर क्रमांक १२ येथे स्थलांतर न करता आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी काल झोपडपट्टीधारकांनी प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भाजपचे नगरसेवक भीमा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. शरदनगर व दुर्गानगर या झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करावे आणि हे पुनर्वसन प्राधिकरणामार्फतच करण्यात यावे, अथवा महानगरपालिकेच्या वतीने सध्या आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे. सन २००१ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांच्या मार्फत ‘तत्काळ जमीन ’ योजनेचे काय झाले, याची तपशीलवार माहिती देण्यात यावी. सदर योजना कार्यान्वित का झाली नाही याची कारणे द्यावी. शरदनगर येथे शौचालये बांधावीत, आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने प्राधिकरणाला देण्यात आले. या शिष्टमंडळात अरुण तुरुकमारे, सुरेश पिटेकर, बाबु जाधव, बाबुराव जाधव, कैलास गायकवाड, झुबेर शेख, महावीर गालफाडे, हंबीरराव सुकळे, गोरख धांडे, सिताराम सुकळे, विलास धांडे, तायाप्पा लोखंडे, सुभाष गायकवाड, हिरामण जाधव आदी उपस्थित होते.