Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

राज्य

दुसऱ्या दिवशीही समुद्राच्या भरतीने ठाणेकरांना ‘धुतले’
ठाणे, २४ जुलै/प्रतिनिधी

सलग दुसऱ्या दिवशी आणि या पावसाळ्यातील सर्वात मोठय़ा भरतीने आज ठाणेकरांना हादरवून टाकले. कोपरी, चेंदणी कोळीवाडा, कळवा, खारेगाव, दिवा, कल्याण या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला. पुराचे पाणी घरात घुसल्याने अनेकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. समुद्राला आलेल्या उधाणामुळे काल कोपरी आणि कळव्यातील झोपडपट्टीवासीयांना मोठा फटका बसला होता. आजही मोठय़ा प्रमाणात लाटा उसळणार असल्याने खाडीला मोठी भरती येईल, असा इशारा देण्यात आला होता.

राष्ट्रीय आपत्कालीन पथक भिवंडीत
वायुगळतीमुळे धास्तावलेल्यांना घरी जावे वाटेना..
भिवंडी, २४ जुलै/वार्ताहर

काटई येथील मलनिस्सारण केंद्रात गुरुवारी झालेल्या क्लोरीन वायूच्या गळतीने बाधित झालेल्यांची संख्या आता १६ वर गेली आहे. पुणे येथील राष्ट्रीय आपत्कालीन निवारण पथक आणि सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या पथकांच्या सहकार्याने गॅस गळती रोखून अन्य गॅस सिलेंडर हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उपचारासाठी रात्री उशिरा महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना शासनाकडून अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर्थिक मदत दिली जाईल,

रायगडमध्ये उधाणाच्या भरतीचा एक बळी
सागरी प्रवासी वाहतूक बंद, किनारी भागातील गावांत पाणी
अलिबाग, २४ जुलै / प्रतिनिधी

आजच्या सलग दुसऱ्या दिवशीही सागरी किनारपट्टीत आलेल्या उधाणाच्या भरतीने अनेक गावांत पाणी शिरल्याने सुमारे तीन-चार तास जनजीवन विस्कळीत झाले होत़े दरम्यान गुरुवारच्या उधाणाच्या भरतीच्या वेळी म्हसळा तालुक्यांतील पाभरे गावच्या खाडीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने मासे पकडण्यासाठी गेलेले हिदायतउल्ला उस्तान काझी (६५) यांचा बुडून मृत्यू झाला आह़े अलिबागच्या सागर किनारपट्टीत आजही सागरी उधाणाचे रौद्र रूप सर्वाना अनुभवण्यास मिळाल़े

इतरांची सोय लावण्यासाठी पक्ष काढलेला नाही- राज ठाकरे
नाशिक, २४ जुलै / प्रतिनिधी

निवडणुकीत इतर पक्षांमध्ये स्थान न मिळालेल्यांची सोय लावण्यासाठी मी पक्ष काढलेला नाही, असे खडसावत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योग्य व्यक्तीचा पक्षात वेळेवर योग्य सन्मान केला जाईल, असे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज यांनी परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात आयोजित मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना अनेक विषयांवर खडे बोल सुनावतानाच रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण लवकरच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहोत, असेही सांगितले.

भिंत खचली..वाघीण पळाली..जाळ्यात गावली!
औरंगाबाद, २४ जुलै/प्रतिनिधी
सकाळी सहा वाजण्याची वेळ. ज्येष्ठ नागरिक नेहमीप्रमाणे मोठय़ा संख्येने सिद्धार्थ उद्यानात चालण्याचा व्यायाम करीत होते. अचानक एक कर्मचारी धावत आला. ‘पिंजऱ्यातून वाघ निसटला’ अशी त्याने सहकाऱ्यांना केलेली सूचना कानी पडली आणि दुसऱ्याच मिनिटाला उद्यान एकदम निर्जन झाले. शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे वाघांच्या पिंजऱ्याचे छत आणि भिंत कोसळली. त्यामुळे पिंजऱ्यातील वाघाला बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आणि ‘राणी’ आरामात बाहेर पडली. या पांढऱ्या वाघिणीचा जन्म याच संग्रहालयातला. त्यामुळे पिंजरा आणि त्यासमोरील मोकळी जागा हेच तिचे जग. याबाहेर ती कधी गेली नव्हती.

नरेंद्र मोदी पुन्हा अडचणीत
अहमदाबाद, २४ जुलै/पी.टी.आय.

गुजरातमध्ये २००२मध्ये झालेल्या दंगल प्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अन्य ६२ जणांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) झालेल्या चौकशीला आव्हान देणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्याने नरेंद्र मोदी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. भाजपचे माजी आमदार कालू मालिवाड यांनी ही याचिका दाखल केली होती. कालू हे सुद्धा ‘त्या’ ६२ लोकांपैकी एक आहेत.

भरधाव ट्रकखाली मेंढपाळासह ६० मेंढय़ांचा चिरडून मृत्यू
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील हृदयद्रावक घटना
गडचिरोली, २४ जुलै / वार्ताहर

गडचिरोलीच्या दिशेने येत असलेल्या मेंढय़ांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडल्याने एक मेंढपाळ आणि ६० मेंढय़ा घटनास्थळीच ठार तर ४ मेंढय़ा जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली ते चामोर्शी मार्गावर घडली. चामोर्शी तालुक्यातील रामाळा येथील तीन मेंढपाळ सुमारे ७० मेंढय़ांचा कळप घेऊन गडचिरोलीच्या दिशेने येत होते. गोविंदपूर ते दर्शनी या गावांदरम्यान एका वळणावर चामोर्शीकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने मेंढय़ांच्या कळपावरूनच वाहन चालवले. या घटनेत एक मेंढपाळ व ६० मेंढय़ा घटनास्थळीच ठार झाल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचे पडघम
सावंतवाडी, २४ जुलै/ वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जिल्ह्यात काँग्रेसची पुनश्च बांधणी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही नसल्याचे वक्तव्य करून राणे यांनी राष्ट्रवादीच्या गोटात भूसुरुंगाची पेरणी केल्याचे मानले जाते. सावंतवाडी, मालवण व कणकवली हे तीनच विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार इच्छुक आहेत.

महिला राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत रायगडास सुवर्णपदक
खोपोली, २४ जुलै/ वार्ताहर

अकरावी सबज्युनिअर, ज्युनिअर व महिला राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा नुकतीच औरंगाबाद येथे पार पडली. त्यात रायगड जिल्हा रस्सीखेच मुलींच्या ४०० किलो वजनगटाच्या संघात एचओसी इंटरनॅशनल स्कूलमधील शीतल कचरे व पल्लवी भोईर या दोन मुलींनी रायगड जिल्ह्यात सुवर्णपदक मिळवून दिले. या सुवर्णपदकामुळे शीतल व पल्लवीची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू मयूर तातरे आणि मोरे यांचे मार्गदर्शन लाभले, तर रायगड जिल्हा रस्सीखेच संघ व्यवस्थापिका म्हणून अनुपमा ओक यांनी उत्तम रीतीने जबाबदारी पार पाडली.

खासदार संजय धोत्रे यांना उच्च न्यायालयाची नोटीस
नागपूर, २४ जुलै/ प्रतिनिधी

गेल्या मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात आली असून, या याचिकेवर खंडपीठाने धोत्रे यांच्या नावे नोटीस काढली आहे.याचिकाकर्ते गजानन समाधान लांडे हे शेतकरी असून बाळापूर तालुक्यातील शेलाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सध्या सदस्य आहेत. अकोला मतदारसंघातील एक मतदार म्हणून त्यांनी ही याचिका केली आहे.

उल्हासनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही
ठाणे, २४ जुलै/प्रतिनिधी

उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या मागे असलेली गुडमॅन कोहेज ही तीन मजली इमारत आज संध्याकाळी कोसळली. सुदैवाने इमारत पूर्ण कोसळण्याआधीच रिकामी केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर इमारतीत १६ कुटुंबे रहात होती. इमारत धोकादायक झाल्याने रिकामी करण्याची सूचना रहिवाशांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी घर रिकामे केले नव्हते. दुपारनंतर इमारतीचा काही भाग कोसळू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास ही इमारत पूर्णपणे कोसळली.