Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

क्रीडा

संघतारा
संगकाराने सामना अनिर्णीत राखून संघाला तारले
कोलंबो, २४ जुलै/ वृत्तसंस्था

कुमार संगाकाराने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत शतक झळकाविले आणि पराभवाच्या दरीतून संघाला तारून तिसरा सामना अनिर्णीत राखला. मालिकेतील तिसरा सामना अनिर्णीत राहिला असला तरी पहिले दोन सामने जिंकून श्रीलंकेने ही मालिका २-० खिशात अशी टाकली आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानचे फिरकीपटू फलंदाजांना नाचवतील असे साऱ्यांनाच वाटत होते.

चामिंडा वासला निरोप
कोलंबो, २४ जुलै/ वृत्तसंस्था

श्रीलंकेचा सर्वाधिक यशस्वी वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने आज कसोटी क्रिकेटचा औपचारिक निरोप घेतला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटीतून निवृत्त होणार असल्याची घोषणा वास याने काही दिवसांपूर्वीच केली होती. आज पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीचा अखेरचा दिवस होता. कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीत वास याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. या कसोटीत पाकिस्तानच्या पहिल्या डावात त्याला अवघा एक बळी मिळविता आला. दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळविता आला नाही.

गावसकर अजुनही बाऊन्सर आणि बीमर यांना घाबरतात
नवी दिल्ली, २४ जुलै, वृत्तसंस्था

अ‍ॅंडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल अशा वेगवान गोलंदाजांचा हेल्मेट नसतानाही धैर्याने सामना करणाऱ्या सुनील गावसकर याला ‘बाऊन्सर’ आणि ‘बीमर’ यांची खूप भीती वाटते, असे कोणी सांगितल्यावर भारतीय क्रिकेट प्रेमी चक्रावूनच जातील. पण थांबा.. हे बाऊन्सर, बीमर म्हणजे वेगवान गोलंदाजाचे चेंडू नसून कुत्र्यांची नावे आहेत. गावसकरचा अनेक वर्षे सहकारी असलेल्या रवी शास्त्रीने सुनीलचे हे गुपित उघड केले आहे. शास्त्री याने गावसकर याच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या ‘सुनील गावसकर: क्रिकेटस् लिट्ल मास्टर’ या पुस्तकात म्हटले आहे की, वेस्ट इंडिजच्या तोफखान्याचा निर्भयपणे सामना करणारा सुनील माझी बाऊन्सर आणि बीमर या नावाची दोन कुत्री दिसली की अक्षरश: घामाघूम होतो. या दोघांपुढे सुनीलचे काही चालत नाही.

मॅथ्यू हेडन चेन्नई येथे क्रिकेट अकादमी उघडणार
चेन्नई, २४ जुलै / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा माजी आघाडीवीर मॅथ्यू हेडन याचा येथे क्रिकेट अकादमी चालू करण्याचा विचार आहे. या संदर्भात तो उद्या तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना भेटणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना हेडन म्हणाला, की ऑस्ट्रेलियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्सच्या धर्तीवर अकादमी चालू करण्याची माझी इच्छा आहे. या कामी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांचे सहकार्य मी घेणार आहे. उद्या श्रीनिवासन यांना भेटल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. भारतात अनेक गुणवान खेळाडू असल्याचे मला आढळले आहे. या गुणवान खेळाडूंना योग्य प्रशिक्षणाअभावी आपली गुणवत्ता दाखविता येत नाही.

नांदी तिसऱ्या अ‍ॅशेस सामन्याची
पावसाच्या संततधारेने एजबस्टनची खेळपट्टी पाण्याखाली
लंडन, २४ जुलै / पीटीआय

इंग्लंड आणि गग यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी येथील एजबस्टन मैदानावर होणार असली तरी बर्मिगहॅम शहरात गेले १२ दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने मैदान जेलीप्रमाणे झाले आहे. अशा वातावरणात कसोटीसाठी खेळपट्टी तयार करणे शक्यच नसल्याचे मत ग्राऊंड्समन स्टीव्ह रोझ यांनी व्यक्त केले आहे. जवळपास दोन आठवडे ही खेळपट्टी धुवांधार पावसामुळे पाण्याखाली होती आणि येत्या रविवापर्यंत पावसाची संततधार सुरूच राहणार असल्याचा अंदाज येथील वेधशाळेने वर्तविलेला आहे. कसोटी सामना ३० जुलैपासून सुरू होणार आहे.

तिसऱ्या सामन्यालाही ब्रेट ली मुकणार
लंडन, २४ जुलै/ वृत्तसंस्था

अ‍ॅशेस मालिकेत पराभवाच्या ओझ्याखाली असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आज एक ‘बॅड न्यूज’ मिळाली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी ब्रेट लीचा समावेश होईल यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ चिंतेत दिसत नव्हता. पण ली दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्याचे कळल्याने ऑस्ट्रेलियाचा गोटात आज चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लीने दुखापतीवर पूर्णपणे उपचार घतलेले असले तरी तो त्यामधून पूर्णपणे सावरलेला नसल्याने त्याला गुरूवारपासून होणाऱ्या तिसऱ्या सामन्याला मुकावे लागणार असल्याचे आज ऑस्ट्रेलियाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

भारताच्या विजयात रहाणे अजिंक्य आणि विराट कोहली चमकले
क्वीन्सलॅंड, जुलै/ पीटीआय

सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी साकारलेल्या २०५ भागीदारीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळविला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पीटर फुल्टनच्या १२२ धावांच्या जोरावर ५० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात २२८ धावा केल्या.भारतातर्फे प्रदीप सांगवानने ४० धावांत न्यूझीलंडचे पाच विकेट्स घेतले. २२९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर एम. विजय (२) आणि कर्णधार एस. बद्रीनाथ (०) हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर रहाणेने दडपणाखाली आक्रमक फलंदाजी करताना ९५ धावा केल्या. तो किवी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत असताना विराट कोहलीने एकेरी - दुहेरी धाव काढत त्याला चांगली साथ दिली. शतक पूर्ण करण्यासाठी पाच धावांची गरज असताना निक ब्रेडला मोठा फटका मारण्याच्या नादात रहाणे यष्टीचीत झाला. त्यानंतर खेळपट्टीवर पाय जमवलेल्या कोहलीने सुरेख फलंदाजी करीत ११५ धावा करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे पंच शिबिर धुळ्यात
मुंबई, २४ जुलै / क्री. प्र.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने धुळे येथे ४ व ५ ऑगस्टला पंच शिबिराचे तर ८ व ९ ऑगस्टला अहमदनगर येथे वर्षां शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. पंच शिबिर धुळे जिल्हा कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली पानट स्मृती हॉल, न्यू माईन क्लबसमोर, जेल रोड, धुळे येथे होणार असून, २४ जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक पंच सदर शिबिरात उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. पंचांनी आपल्या उपस्थितीची कल्पना धुळे जिल्हा कबड्डी संघटनेस द्यायची असून त्यासाठी मुजफ्फर अली सय्यद (९९७०६१८४८८) यांच्याशी संपर्क साधावा.
शिवाय राज्य संघटनेच्या कार्यात सुसूत्रता, जिल्हा संघटना कार्यक्षम करणे, पंचांची श्रेणी आदींवर चर्चा करण्यासाठी अहमदनगरला वर्षां शिबिर घेण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, टिळक रोड, अहमदनगर येथे हे शिबिर होईल.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका; कार्यक्रमाला मंजुरी
मुंबई, २४ जुलै / क्री. प्र.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या ७ एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या कार्यक्रमाला उभय देशांच्या क्रिकेट बोर्डानी मान्यता दिली आहे. या कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलिया संघ भारतात २१ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत दाखल होईल. ऑस्ट्रेलियन संघ २२ ऑक्टोबरला दिल्लीहून जयपूरला पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी रवाना होईल. जयपूरचा सामना २५ ऑक्टोबरला होणार आहे. २८ ऑक्टोबरला दुसरा एकदिवसीय सामना होईल. तिसरी लढत नवी दिल्लीत ३१ ऑक्टोबरला तर चौथी मोहालीला २ नोव्हेंबर रोजी होईल. पाचवा सामना हैदराबादला ५ नोव्हेंबरला सहावा सामना गुवाहाटी येथे ८ नोव्हेंबरला व ७ वा मुंबईत ११ नोव्हेंबरला होईल. गुवाहाटी येथील सामना दिवसा होईल. अन्य सहाही लढती दिवस-रात्र लढती असतील. १२ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियन संघ मायदेशी परतेल.

फेडररला जुळ्या मुली
नवी दिल्ली, २४ जुलै/ वृत्तसंस्था

टेनिस विश्वातील ‘बाप’ असलेला दुसरा मानांकित रॉजर फेडरर आज दोन जुळ्या मुलींचा पिता झाला आहे. आज त्याच्यी पत्नी मिर्का हीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. ही गोड बातमी फेडररने आज त्याच्या संकेत स्थळावर दिली आहे. पंधरावेळा ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या फेडररने त्यांची नावे सुद्धा ठरवली आहे. पहिल्या मुलीला त्याने चार्लिन रिवा तर दुसऱ्या मुलीला त्याने माल्या रोस हे नाव द्यायचे ठरविले आहे. यावेळी फेडरर म्हणाला की, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि अत्यंद आनंदाचा क्षण आहे. माझी पत्नी मिर्का आणि दोन्ही मुलींचीही तब्येत चांगली आहे.