Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

आम्ही फक्त स्कायवॉकवरून चालायचे की काय?
ठाणे, प्रतिनिधी- ठाणे महापालिकेच्या प्रस्तावित फेरीवाला धोरणामुळे शहरातील उरलेसुरले रस्ते आणि पदपथही फेरीवाल्यांना आंदण दिले जाणार असल्यामुळे ठाणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आता ठाणेकरांनी केवळ स्कायवॉकवरूनच जायचे काय, असा सवालही दक्ष नागरिकांनी उपस्थित केला आहे; तर भाजपनेही हे धोरण चुकीचे असून शहर बकाल होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने मात्र हा युतीचा निवडणूक स्टंट असल्याची टीका केली आहे.
ठाण्यात लवकरच फेरीवाला राज येणार असल्याचे वृत्त आज प्रसिद्ध होताच शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अगोदरच शहरातील रस्ते पार्किंगसाठी पालिकेने आंदण दिले आहेत. अनेक रस्त्यांवर गॅरेज, दुकाने थाटली गेली आहेत, तर फुटपाथ आणि रहदारीचे रस्ते फेरीवाल्यांनी केव्हाच कब्जात घेतले आहेत.

धोकादायक इमारतींतील रहिवासी अद्यापि मृत्यूच्या छायेत!
अजून नाही सरल्या आशा..
सोपान बोंगाणे
मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींप्रमाणेच ठाण्यातील अशा एक हजारावर जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळत पडला आहे. त्यांचा विकास म्हणजे जादा एफएसआय हवा आणि तो मंजूर करण्याबाबत सरकार चालढकल करीत असल्याने या धोकादायक इमारतींत राहणारी हजारो कुटुंबे अद्याप जीव मुठीत घेऊनच राहत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न झाले असले, तरी रहिवाशांना अद्याप कोणताच दिलासा मिळालेला नाही. शहरातील झोपडपट्टय़ांच्या जागेवर एकीकडे गगनचुंबी टॉवर्स उभे राहत असताना, घामाचे पैसे टाकून एकेकाळी हक्काची घरे विकत घेतलेल्या या कुटुंबांना मात्र इमारत कोसळून पडल्यास साधी झोपडीही मिळण्याची शक्यता नाही.

एसटीच्या वातानुकूलित प्रवासाला दरुगधीची किनार!
ठाणे/प्रतिनिधी

राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाच्या अनागोंदी व बेजबाबदार कारभारामुळे ठाण्यातील वंदना आणि ठाणे रेल्वे स्टेशनजवळील एसटी स्थानकांची दुरवस्था झाली असून, तेथील अनेक प्रकारच्या गैरसोयींमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ठाणे व पुणे येथून रोज प्रत्येकी २० वातानुकूलित आरामगाडय़ा सध्या सोडल्या जात असल्याने प्रवासी सुखावले असताना स्थानकांतील अपुऱ्या सोयी आणि दुर्गंधीपूर्ण गलिच्छ वातावरणामुळे प्रवाशांत नाराजी पसरली आहे.

‘जनताच देणार मला कामाची पावती’
डोंबिवली/प्रतिनिधी

रघुवीरनगर प्रभागाचे मी गेले १२ ते १३ वर्षापासून नेतृत्व करत आहे. येथील जनतेने मला पुन्हा या प्रभागातून निवडणूक लढवावी म्हणून प्रश्नेत्साहित केले आहे. जनतेचा हा रेटाच मला माझ्या विजयाची खात्री देत आहे, असे पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांनी सांगितले. शहरात काम करताना कधीही राजकारणाकडे राजकारण म्हणून न पाहता समाजसेवेच्या नजरेतून काम केले आहे.

भावेंच्या नावाची महापौरांना अ‍ॅलर्जी
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिकेतील पदाधिकाऱ्यांना ‘भावे’ नावाच्या माणसांची प्रचंड अ‍ॅलर्जी असल्याचे उघड झाले आहे. महापौर रमेश जाधव यांनी भावे सभागृहाच्या नूतनीकरणाचा विषय ३० जूनच्या महासभेत पटलावर घेण्यास नकार दर्शवून भावेंच्या नावाला पालिकेची अ‍ॅलर्जी असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. आधारवाडी रस्त्याला अतिक्रमणामध्ये नगरपालिका काळातील पदाधिकारी भावे बाई यांचा बंगला तुटणार होता.

‘शब्द माझे फोल आता, तूच मौना बोल आता’
डोंबिवली/प्रतिनिधी - मराठी गझल गायनाची अवघी पाऊण तासाची मैफल पण ती किती रंगावी, की पावसानेही काही क्षण थांबून या सुरावटींचा स्वाद घ्यावा, विजेनेही व्यत्यय न आणता ही मैफल पुढे चालू राहावी म्हणून हळूच प्रयत्न करावा, मैफलीच्या रंगांमध्ये काव्यात्मक रंगीबेरंगी ओतण्याचे काम निवेदकाने तितक्याच ताकदीने करावे, बघता बघता उपस्थित रसिकांनाही या मैफलीचे वर्णन करणे अशक्य झाल्याने, तसेच कौतुकाला शब्द न राहिल्याने रसिकांना अंतर्मनाने ‘शब्द ‘आमचे’ फोल आता, तूच मौना बोल आता’ असे सांगावे लागले.

सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू
ठाणे/प्रतिनिधी - दरवर्षी यूपीएससी परीक्षेत विद्यार्थी चमकणाऱ्या ठाण्यातील सी.डी.देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत येत्या वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. कोणतेही शुल्क न आकारता मार्गदर्शन करणारी ही राज्यातील अग्रगण्य संस्था असून ठाणे महापालिकेतर्फे ही प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे.

महादेव कोळी कर्मचाऱ्यांचा मेळावा
ठाणे/प्रतिनिधी - एअर इंडियामधील अनुसूचित जमातीतील महादेव कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. महाराष्ट्र कोळी समाज संघ अध्यक्ष, शिवसेना उपनेते अनंत तरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यास एअर इंडियाच्या मेडिकल विभागाच्या कार्यकारी संचालक डॉ. लता नाखवा, जनरल सेक्रेटरी बनकर, प्रभाकर कोळी, कोळी समाज संघ सचिव मदन भोई, तसेच एअर इंडियामधील महादेव कोळी समाजाचे कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या महादेव कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात असल्याबद्दल मेळाव्यात नाराजी व्यक्त करण्यात आली. महादेव कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियाच्या माध्यमातून सवलती मिळाव्यात, जर त्या सवलती मिळाल्या नाहीत व अन्याय असाच सुरू राहिला, तर महाराष्ट्र कोळी समाजाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनंत तरे यांनी दिला. या कार्यक्रमात एअर इंडियातून निवृत्त होणाऱ्या प्रभाकर कोळी यांचा सत्कार करण्यात आला.

वासिंदमध्ये कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उद्घाटन
शहापूर/वार्ताहर
वासिंद व परिसरातील उच्चशिक्षणाची उणीव लक्षात घेऊन शिक्षण विभागाने वासिंदच्या समाज हितकारिणी संस्थेला महाविद्यालय चालविण्याची परवानगी दिली आहे. नुकतेच संस्थेच्या उत्कर्ष कॉलेज ऑफ आर्टस् आणि कॉमर्स कॉलेजचे उद्घाटन आमदार व सिनेट सदस्य महादू बरोरा यांच्या हस्ते झाले.कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य दशरथ तिवरे, किसन भांडे, प्रकाश पाटील, काळुराम धनगर, पारसिक बँकेचे संचालक पां.सा. पाटील, टीडीसी बँकेचे संचालक आर.सी. पाटील, मनसेचे डी.के. म्हात्रे आदी उपस्थित होते. वासिंद परिसरातील शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बिगर राजकीय व उच्चशिक्षित तरुणांनी हे महाविद्यालय सुरू केले आहे.उद्घाटन सोहळ्याचे प्रश्नस्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गोंधळी यांनी केले. सूत्रसंचालन अनिल मानिवडे व अनिल दळवी यांनी केले. संस्थेचे संचालक भास्कर भोईर, अरुण भालेकर, विश्वास परटोले, दीपक सुतार आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेतली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बदलापूर: अंबरनाथ तालुका भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरातील विभागनिहाय प्रथम आलेल्या दहावी, तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंना वह्यावाटप आणि अकरावी ऑनलाइन प्रवेशासंदर्भात सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमात सहाय्य केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक भाविसे तालुका संघटक डॉ. बालाजी किणीकर, शहर संघटक राजेश कौठाळे, उपशहरप्रमुख राजू जाधव यांचे लांडगे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी सुमारे ४०० विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यात आल्या, तर ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून ऑनलाइन प्रवेशात मदत करणाऱ्या १७ जणांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचेही यावेळी भाषण झाले. माजी नगराध्यक्ष गुलाब करंजुले, शिक्षण मंडळ सभापती विजय पवार, उपनगराध्यक्षा अंजली राऊत आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कीर्तन कुलातर्फे प्रशिक्षण
डोंबिवली: अखिल भारतीय कीर्तन कुलातर्फे कीर्तन व तबला वादन प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व स्तरातील नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. संपर्क - २४९८१०२.