Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

धानावर लष्करी व सोयाबीनवर उंटअळीचा प्रश्नदुर्भाव
चंद्रपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

धानावर लष्करी तर सोयाबीनवर उंटअळीने हल्ला करून हजारो हेक्टरमधील पीक फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी लष्करी अळीने चंद्रपूर जिल्हय़ातील दीड ते दोन लाख हेक्टरमधील सोयाबीन पूर्णत: फस्त केले होते. वरोरा, भद्रावती, राजुरा, चंद्रपूर व कोरपना तालुक्यात लष्करी अळीचा प्रकोप झाला. देशभरातील कृषीतज्ज्ञ वरोरा, चिमूर भागात दाखल झाले, मात्र काही उपाययोजना करू शकले नाही.

ताडोबात हत्ती व निलगायीचा मृत्यू
चंद्रपूर, २४ जुलै/ प्रतिनिधी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पंधरा महिन्याच्या हत्तीचा आणि प्रकल्पाला लागून असलेल्या जंगलात निलगायीचा मृत्यू झाला. आष्टाच्या जंगलात घराच्या छतावरून पडल्यामुळे एका निलगायीचा मृत्यू झाला. छतावरून पडल्यानंतर निलगायीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. डोक्यातच रक्तस्त्राव झाल्याने निलगायीचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर यांनी सांगितले. प्रकल्पात वष्रेभरापूर्वी दाखल झालेल्या ‘लक्ष्मी’ या हत्तीणीचा गर्भपात नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी वन खात्याच्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा राऊत येथे येणार असून यानंतरच नेमके कारण कळू शकणार आहे.

उच्च माध्यमिक विद्यालये मात्र ‘कायम’ विनाअनुदानित
यवतमाळ, २४ जुलै / वार्ताहर

कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी देण्यात आलेल्या प्रश्नथमिक व माध्यमिक शाळांच्या परवानगी आदेशातील ‘कायम’ हा शब्द वगळण्यात आला असला तरी उच्च माध्यमिक शाळा मात्र ‘कायम’ विनाअनुदान तत्त्वावर राहणार आहेत. १६ जून ०९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ प्रश्नथमिक व माध्यमिक शाळांनाच अनुदान तत्त्वावर आणण्यासाठी विभागातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या प्रस्तावात उच्च माध्यमिक शाळांनाही ‘कायम’ शब्दातून वगळण्याबाबत उल्लेख नव्हता हे स्पष्ट आहे.

अनेक योजनांची कामे कागदावरच
शासनाच्या महत्त्वाच्या योजना विविध विभागामार्फत राबवल्या जातात. मजुरांना काम मिळावे व विकासही साधला जावा हा त्यामागील मुख्य उद्देश असला तरी या तालुक्यात कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक योजना कागदावरच आहेत.केंद्र शासनाची ग्रामीण रोजगार योजना असो की महाराष्ट्र शासनाची रोजगार हमी योजना, पाणलोट क्षेत्र योजना, नालाबडींग, शेततळे, शेतातील बांध, पांधण रस्ते, मातीचे बांध आदी महत्त्वाच्या विकासात्मक कार्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले असून अनेक ठिकाणची कामे निकृष्ट असून काही कामे केवळ कागदोपत्रीच आहेत.

भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचा १० कोटींचा प्रकल्प
आज उद्घाटन
भंडारा, २४ जुलै / वार्ताहर
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ, दुग्ध उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा संघ असून आता या संघामार्फत उभारलेल्या १० कोटी खर्चाच्या अद्ययावत दुग्धशाळेचे उद्घाटन उद्या २५ जुलैला होणार आहे. सहकारी तत्त्वावरील विदर्भ व मराठवाडय़ातील हा एकमेव प्रकल्प आहे. जिल्ह्य़ात सुमारे ३ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. संघाची क्षमता ८५ हजार लिटर खरेदीची आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना बाकी दूध खाजगी व्यापाऱ्यांना पडेल त्या भावात विकावे लागते.

राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी
विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसा तसा स्थानिक राजकारणात रंग भरू लागला आहे. इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी येणारे निरीक्षक, त्यानिमित्ताने होणारे मेळावे, विविध कार्यक्रम यामुळे राजकीय पक्षांमध्ये चैतन्य संचारल्याचे वातावरण आहे. पावसाची पर्वा न करता झुंबड करणारे कार्यकर्ते, नेत्यांची आवेशपूर्ण भाषणे, गटबाजीला आलेले उधाण यामुळे चहलपहल वाढली आहे. उमेदवारी कुणाला मिळेल यावर चर्चा होत आहे.

खावटीच्या धान्य वाटपास विलंब
साडे अकरा हजार लाभार्थी वंचित
धारणी, २४ जुलै / वार्ताहर
आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासी भागातील खावटीच्या धान्य वाटपास विलंब झाला आहे. यंदा ११ हजार ५०० लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळालेले नाही. १९९१ च्या कुपोषण उद्रेकानंतर केंद्र आणि राज्य शासनाने सुमारे २० पेक्षा अधिक योजना तयार केल्यात. या योजना आदिवासींच्या कसल्याही उपयोगात पडल्या नाहीत. अशा योजनांच्या विरोधात आदिवासींची ओरड वाढलेली आहे.

भंडाऱ्यात माकपचा ‘पशू बचाव’ मोर्चा
भंडारा, २४ जुलै / वार्ताहर
भारतीय कम्युनिस्ट पार्टी व पशुसंवर्धन पदवीधारक बेरोजगार संघटना जिल्हा भंडाराच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पशू बचाव’ मोर्चा काढण्यात आला.
मोच्र्याचे नेतृत्व जिल्हा परिषद भंडाराचे माजी समाज कल्याण सभापती कॉ. चंद्रशेखर टेंभुर्णे, भाकपचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके आणि पशुसंवर्धन बेरोजगार संघटना जिल्हा भंडाराचे अध्यक्ष डॉ. आसाराम शिवणकर यांनी केले.जिल्ह्य़ातील पशू आरोग्य उपकेंद्रात जनावरांवर उपचार होत नसल्यामुळे जिल्ह्य़ातील पशुधन संकटात सापडले याची जाणीव शासनाला व्हावी याकरिता हा मोर्चा होता. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात जनावरांचे उपचार न करणाऱ्या उपकेंद्रातील डॉक्टरांवर ताबडतोब कारवाई व्हावी, उपचाराच्याअभावी ज्या शेतकऱ्यांची जनावरे मरण पावलीत त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, पशुधन पदविकाधारक बेरोजगारांना जनावरांच्या उपचाराची परवानगी द्यावी, प्रत्येक दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षकांची नेमणूक करावी, गावात पशुसेवकाची नियुक्ती करावी, पशुसंवर्धन पदविकाधारक बेरोजगारांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या प्रक्रियेत प्रश्नधान्य द्यावे, या मागण्या करण्यात आल्या.

ओबीसी व छावा संग्राम परिषदेतर्फे ७५ ग्रामस्थांचा सत्कार
भंडारा, २४ जुलै / वार्ताहर
वैनगंगेतील नाव उलटून झालेला भीषण अपघातप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून चार महिलांचे प्रश्नण वाचवणाऱ्या तसेच मृतदेह शोधण्याकरिता जीवाची बाजी लावणाऱ्या सुरेवाडा आणि खमारी येथील ७५ धाडसी तसेच परोपकारी ग्रामस्थांचा ओबीसी व छावा संग्राम परिषदेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील उद्योगपती केशवराव निर्वाण होते. प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी संग्राम परिषदेचे अध्यक्ष व माजी आमदार नाना पटोले, हरिभाऊ शिंगाडे, सरपंच प्रमोद मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य अंजिराबाई चुटे, मंगेश वंजारी, श्रीकांत मानकर, नरेंद्र भोंडे, सिंगनजुडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी जलसमाधी मिळालेल्या ३४ महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले. सत्कारमूतीर्ंमध्ये सुरेवाडा येथील ३१ तर खमारी येथील ५४ जण होते. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र गावंडे यांनी केले. प्रश्नस्ताविक गणेश ठवकर यांनी केले. आभार अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मकसूद पटेल यांनी मानले.

महिला संरक्षण कायदा प्रभावीपणे राबवण्याची गरज- मीरा खडक्कार
वर्धा, २४ जुलै / प्रतिनिधी

महिला संरक्षण कायदा हा समाजात महिलांचे स्थान भक्कम करण्यासाठी महत्त्वाचे साधन असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मीरा खडक्कार यांनी केले. येथील विकास भवनात आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अनिष्ट प्रथांचा सर्वाधिक जाच महिलांनाच होतो. त्याचा सामना करण्याचे बळ महिला संरक्षण अधिनियमनाने मिळाले आहे. कौटुंबिक छळास पायबंद घालण्यासाठी समाजातूनच प्रयत्न व्हायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एन. मुंढे, मुख्य न्यायदंडाधिकारी यलट्टी, दिवाणी न्यायाधीश पी.एम. दुजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गडदे, महिला व बालविकास अधिकारी स्मिता पौनीकर यांनीही मते मांडली.महिला संरक्षण कायद्याच्या विविध तरतुदीबाबत अ‍ॅड. अर्चना वानखेडे, अ‍ॅड. स्मिता सरोदे, सी.एम. बोंडे, समुपदेशक प्रतिभा गजभिये व करुणा महेतारे यांनी माहिती दिली. स्मिता पौनीकर व रेखा सुरोसे यांनी संचालन केले.

नि:शुल्क सिल्व्हर वर्क प्रशिक्षण
खामगाव, २४ जुलै / वार्ताहर

शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी मोफत सिल्व्हर वर्क (चांदीकाम) प्रशिक्षण खामगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. ते २२ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता प्रवेश मोफत असून सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर १ हजार रुपये प्रती प्रशिक्षणार्थी विद्यावेतन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिक्षणार्थ्यांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज भरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र व प्रकल्प अधिकारी एमसीईडी बुलढाणा यांनी केले आहे.

तालुका क्रीडा निरीक्षकपदी सुनील शेंडे यांची नियुक्ती
गोंदिया, २४ जुलै/ वार्ताहर

तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयातील क्रीडा शिक्षक व एन.सी.सी. अधिकारी सुनील शेंडे यांची क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांनी तिरोडा तालुका निरीक्षकपदी नियुक्ती केली. सुनील शेंडे हे राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी असून त्यांनी मार्शल आर्ट कलेत सात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी शासकीय व फेडरेशनच्या विभागीय राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाही आयोजित केल्या आहे. ते कराटे, किक बॉक्सिंग, वुशु अ‍ॅराबिक व सिकाई मार्शल आर्टस संस्थांचे अध्यक्ष असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम करतात.

लिंगा येथे ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कळमेश्वर, २४ जुलै / वार्ताहर
कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे शालांत परीक्षेत गुणवंत ३९ विद्यार्थ्यांचा सामूहिक सत्कार सोहोळा नुकताच पार पडला. कर्मयोगी भाऊराव मोहोड यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त सत्कार सोहोळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी किशोर मोहोड होते. लिंगा गावातील शेतकरी-शेतमजुरांच्या मुले-मुली दहावी-बारावी या शालांत परीक्षेत विपरीत परिस्थितीवर मात करून उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांचा गौरव नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक उमेश चौबे यांच्या हस्ते झाला. यावेळी सुमितकुमार आतिश उपस्थित होते.याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी सुमितकुमार आतिश यांनी दादा दंडवत ही कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ३९ गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार केला. संचालन ग्रामपंचायत सदस्य सुभाष किरपाल यांनी केले, तर आभार मनोहर पाल यांनी मानले. यावेळी माजी सरपंच वामनराव भुजाडे, नामदेवराव खेडकर, नंदू भुजाडे, तेजराव फलके, दामोधर झाडे आदी गावकरी, नागरिक उपस्थित होते.

दोन शेजाऱ्यांचे एकाच दिवशी निधन
चांदूर रेल्वे, २४ जुलै / वार्ताहर

दोन्ही शेजारी दैनंदिनीप्रमाणे कामकाज करत असतानाच रात्री एक हृदयविकाराने जगाचा निरोप घेतो तर त्यांच्याच शेजारी अंत्यसंस्कारावरून परतल्यावर तोही जगाचा निरोप घेतो. ही घटना येथे गुरुवारी घडली. या घटनेने चांदूर रेल्वेत शोककळा पसरली आहे.येथील पात्रीकर कॉलनीतील सुरेश वाघ (४५)हे कृषी विभागात होते. नेहमीप्रमाणे कामकाज आटोपून रात्रीला झोपी गेले. पहाटे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या शेजारी राहत असलेले जयेश वाघेला (३१) हे शेजाऱ्यांच्या अचानक जाण्यामुळे विचलित झाले. त्यांच्या अंत्ययात्रेवरून परत आल्यावर जयेश वाघेला यांना त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत जायचे होते, याच दरम्यान त्यांच्या छातीतही अचानक कळ आल्याने त्यांनी सहकाऱ्याला कार्यालयात परत पाठवले. शेजाऱ्यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अगदी तरुण वयातच थोडय़ाच अवधीत त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्याचा मुलगा आहे. सुरेश वाघ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी रोहिदास राऊत, सचिवपदी फहिमखान
गडचिरोली, २४ जुलै/ वार्ताहर

प्रेस क्लब गडचिरोलीच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २००९- १० वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी रोहिदास राऊत, सचिवपदी फहिमखान, उपाध्यक्षपदी विलास मेटे, सहसचिवपदी मारोती मेश्राम, कोषाध्यक्षपदी विलास दशमुखे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून अभिनय खोपडे, अनिल धामोडे, शेमदेव चापले, सुरेश सरोदे, नंदकिशोर काथवटे, सुरेश नगराळे, अविनाश भांडेकर, अरविंद खोब्रागडे, सुरेश पद्मशाली, लिमेश जंगम, हेमंत डोर्लीकर, महेश तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. प्रेस क्लब लायब्ररीचे अध्यक्ष म्हणून सुरेश नगराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी सुरेश सरोदे, उपाध्यक्षपदी शेमदेव चापले, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर काथवटे, सहसचिवपदी महेश तिवारी, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रेस क्लब लायब्ररीच्या नवीन कार्यकारिणीत सदस्य म्हणून रोहिदास राऊत, सुरेश पद्मशाली अभिनय खोपडे, फहिमखान, अनिल धामोडे, विलास दशमुखे, अविनाश भांडेकर, अरविंद खोब्रागडे, लिमेश जंगम, हेमंत डोर्लीकर, विलास मेटे, मारोती मेश्राम यांचा समावेश करण्यात आला आहे.

संत नामदेव महाराज पुण्यतिथी सोहोळा
गोंदिया, २४ जुलै/ वार्ताहर

संत नामदेव महाराज यांच्या ६५९ व्या पुण्यतिथी सोहोळा येथील वैष्णव शिंपी समाजाच्यावतीने शहरात भव्य मिरवणूक यात्रा काढून उत्साहात साजरा करण्यात आला. वैष्णव शिंपी समाजाचे आराध्य दैवत असलेले संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीच्यानिमित्त येथील वैष्णव शिंपी समाजाच्यावतीने नामदेव महाराजांच्या पालखीची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन संपली. याप्रसंगी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वैष्णव शिंपी समाजाचे अध्यक्ष विनोद गोटे, कैलाश क्षीरसागर, मनोहर बेलगे, मुकेश चन्ने, किशोर बिडवाईकर, पवन गोटे, श्याम बेलगे, राजू फरकुंडे, नितीन डवरे, भास्कर डबरे व समाज बांधवांनी सहकार्य केले.

अकरावी प्रवेशाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया, २४ जुलै / वार्ताहर

यावर्षी जिल्ह्य़ात १०व्या वर्गाचा परीक्षेचा निकाल चांगला लागल्यामुळे अनेक १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ११वी वर्गात प्रवेशाची समस्या उद्भवली असून ७० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेइतके प्रवेश झाल्याने प्रवेशासाठी भटकंती करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या या अडचणीची दखल घेऊन गोंदिया जिल्हा एनएसयूआयचे उपाध्यक्ष विशाल उमरे यांनी पुढाकार घेऊन प्रवेशापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना नवीन तुकडीची मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा शिक्षणाधिकारी ममता झा यांना निवेदनाद्वारे दिली आहे. शिक्षण विभागाने त्वरित या संदर्भात कार्यवाही न केल्यास एनएसयूआयतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनापासून दिला असून याची जबाबदारी शासनाची राहील, असे म्हटले आहे. निवेदन देणाऱ्या एनएसयूआय शिष्टमंडळात गौरव वंजारी, राहुल पांडे, निशिकांत मोटघरे, कमलेश अंबादे, विनय नागपुरे, विक्की खोब्रागडे, लालू सिंग, अनंत बोम्बार्डे यांचा समावेश आहे.

ग्रामगीता जीवन विकास परीक्षांसाठी अर्ज मागविले
वर्धा, २४ जुलै / प्रतिनिधी

गुरुदेव शिक्षक मंच व ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्यावतीने विविध परीक्षांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. संस्थेतर्फे प्रवेश, परिचय, प्रवीण, ग्रामनाथ, ग्रामगीतारत्न व ग्रामगीताचार्य अशा सहा परीक्षा घेतल्या जातात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुसार युवक व सामाजिक कार्यकर्ते तयार करण्याचा या परीक्षांमागचा हेतू असतो. ‘ग्रामगीताचार्य’ या पदवीची परीक्षा वगळता उर्वरित सर्व परीक्षा जिल्हास्तरावर होणार आहे. यासाठी ग्रामगीताचार्य गंगाधरराव जगताप (९७६५२३५५४२) मानस मंदिर, वर्धा यांच्याशी संपर्क करावा.

डॉ. राणी बंग गुरुवारी अकोल्यात
अकोला, २४ जुलै / प्रतिनिधी

निमा असोसिएशनच्यावतीने ३० जुलैपासून आयोजित करण्यात आलेल्या जीवन शिक्षण शिबिराला उपस्थित राहण्यासाठी डॉ. राणी बंग अकोल्यात येत आहेत. ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान खंडेलवाल भवनात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १४ ते २२ वयोगटातील मुलींना शरीररचनेविषयी शास्त्रोक्त माहिती देणे, तसेच लैंगिक शिक्षणाविषयीचे गैरसमज दूर करणे, हा या शिबिराचा उद्देश आहे. डॉ. राणी बंग यांचे हे शिबीर १० ते ५ या वेळात आयोजित करण्यात आले आहे. निमा असोसिएशनच्या सचिव डॉ. माया कराळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अल्का तामणे, डॉ. संध्या जोशी, डॉ. हर्षवर्धन मालोकार आदींनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन किशोरवयीन मुलींना केले आहे.

नक्षलवाद्यांकडून पोलीस खबऱ्याची हत्या
गडचिरोली, २४ जुलै / वार्ताहर

एटापल्ली तालुक्यातील कल्लेम येथील रैनू गोमा आत्राम (४०) याची नक्षलवाद्यांनी काल दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हत्या केली. रैनू आत्राम हा पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर मीना यांच्या नेतृत्वात शोध अभियान सुरू आहे.

एलआयसी एजंट असोसिएशनची कार्यकारिणी
भंडारा, २४ जुलै/ वार्ताहर

एल.आय.सी. एजंट असोसिएशन भंडाराची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येऊन असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील समरीत यांची निवड करण्यात आली. सचिव मनोज बोरकर व कोषाध्यक्ष अरविंद बडवाईक यांचा समावेश आहे.

ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू
साकोली, २४ जुलै / वार्ताहर

शेतात चिखलणी करताना ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. नीलज येथील नारद इटाराम गहाणे (५०) हा शेतकरी सकाळी १० वाजता शेतात ट्रॅक्टरने(एमएच३५ए ९२८१) चिखलणी करीत होता. ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला.