Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

विविध

तालिबानविरोधी कारवाईसारखा जोम भारतविरोधी दहशतवाद्यांबाबतही दाखवावा - एस. एम. कृष्णा
विशेष विमानातून, २४ जुलै / पी.टी.आय.
स्वात खोऱ्यामध्ये पाकिस्तानने तालिबानींविरोधात जशी कारवाई केली तसाच जोम त्यांनी लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांविरोधात दाखवावा, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईवरी दहशतवादी हल्ल्यामागील संघटनेचा सूत्रधार असलेला लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईद याच्याविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सत्यम घोटाळा : आरोपींच्या ब्रेन मॅपिंगला उच्च न्यायालयात आव्हान
हैदराबाद, २४ जुलै / पी.टी.आय.

सत्यम कॉम्प्युटरच्या घोटाळ्याबाबत कंपनीचे संस्थापक बी. रामलिंगा राजू व यांची यांची सीबीआयमार्फत ब्रेन मॅपिंग वा लाय-डिटेक्टरसारखी वैज्ञानिक चाचणी करण्याच्या दिलेल्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका राजू यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

हल्ल्याची शक्यता नसली तरी संघ मुख्यालयाला कडक सुरक्षा
नागपूर, २४ जुलै / प्रतिनिधी

मुंबईसह राज्यात सात ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याचे संकेत गेल्या आठवडय़ात मिळल्यानंतर आता नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवण्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी याचा इन्कार केला असला तरी, कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. महालातील गजबजलेल्या वस्तीत संघाचे मुख्यालय आहे.

भूसंपादन विधेयकास ममता बॅनर्जींचा विरोध
नवी दिल्ली, २४ जुलै / पी.टी.आय.

औद्योगिकीकरणासाठी जमीन संपादन करण्याच्या प्रस्तावित विधेयकाला रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बॅनर्जी यांनी आपले आक्षेप उपस्थित केले. काल मंत्रिमंडळात २००७ च्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीसंदर्भातील विधेयकावर चर्चा करण्यात आली. या विधेयकात ७० टक्के जमीन खासगी विकासकाने मिळवायची आहे तर ३० टक्के जमीन राज्य सरकारने संपादित करून द्यायची आहे.

नेपाळमधील समस्येला सर्व पक्ष जबाबदार
संयुक्त राष्ट्रे :
नेपाळमधील सध्याच्या समस्येला तेथील सर्व पक्ष सारखेच जबाबदार आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे नेपाळमधील प्रतिनिधी करिन लॅण्डग्रेन यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सर्व पक्ष आता पुढे येऊन आपले मतभेद बाजूला ठेवून समस्येवर तोडगा शोधतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अमेरिकी लष्करास इराकमध्ये मुदतवाढ?
वॉशिंग्टन, २४ जुलै / ए.पी.

इराकमधील अमेरिकी लष्कराच्या वास्तव्याबद्दल मुदत ठरविणअयात आली असली तरी इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांनी त्याचा पुनर्विचार करता येईल, असे स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षी अमेरिका व इराक यांच्यात झालेल्या करारानुसर्ा २०११ मध्ये अमेरिकेचे इराकमधील अस्तित्व संपुष्टात आणले जाईल, असे ठरविण्यात आले होते. मात्र इराकी लष्कराला आवश्यक प्रशिक्षण व अधिक पाठिंबा हवा आहे का ते तपासण्यात येईल व त्यावेळी मुदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

दिल्ली मेट्रो दुर्घटना : गॅमन इंडियाला नोटीस
नवी दिल्ली, २४ जुलै / पी.टी.आय.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पात दुर्घटनाप्रकरणी सदर काम करणाऱ्या गॅमन इंडिया कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे. तसेच पुढील सुनावणीपूर्वी २० ऑगस्टपर्यंत कंपनीने आपले म्हणणे सादर करावे, असा आदेशही दिला आहे. १२ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी याचिका सादर केली असून त्याबाबत ही नोटिस न्यायाधीश रेवा खेत्रपाल यांनी कंपनीला दिली आहे. दुर्घटनेतील चौघा मृतांच्या नातेवाईकांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी प्रत्येक व्यक्तीमागे ५० लाख रुपये नुकसानभरपाई कुटुंबीयांना द्यावी व जखमींना प्रत्येकी २५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी याचिकेत केली आहे.

सप्टेंबरमध्ये जागतिक नृत्य महोत्सव
नवी दिल्ली, २४ जुलै / पीटीआय

‘सॅटेलाइट सिटी’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या गुरगावमध्ये सप्टेंबरमध्ये जगभरातील नृत्य कलाकार आपली आवर्जून उपस्थिती लावतील. लॅटिन अमेरिकेच्या नृत्यप्रकारावर आधारित महोत्सव येथे होत आहे. ब्राझिल, क्युबा, व्हेनेझुएला, डॉमिनिक रिपब्लिक आणि इक्वेडोर दूतावासांच्या सहकार्याने आयोजित चार दिवसीय जागतिक नृत्य महोत्सव १० सप्टेंबरपासून येथे सुरू होत आहे.

काश्मीर पेच दिवसेंदिवस गंभीर- मुशर्रफ
लंडन :
काश्मीर प्रकरणाचे ‘आंतरराष्ट्रीयीकरण’ करणारे आपण एकमेव पाकिस्तानी राज्यकर्ते असल्याचा दावा करीत माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी याबाबतचा तोडगा आपल्या दृष्टीपथात होता, असे सांगितले. दोन्ही देशांसाठी संवेदनाक्षम असलेल्या काश्मीरचा पेच दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले. लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुशर्रफ बोलत होते. काश्मीर प्रकरणी लॉर्ड नाझिर अहमद यांनी केलेले आरोप फेटाळताना मुशर्रफ म्हणाले की, पाकिस्तानच्या इतिहासात मी एकमेव राज्यकर्ता आहे की, ज्याने काश्मीर प्रकरणाचे ‘आंतरराष्ट्रीयीकरण’ केले. काश्मीरबाबतचा तोडगा तेव्हा दृष्टीपथात होता, असा दावाही त्यांनी केला.

नागकृपेमुळे ओरिसा विधानसभेचे कामकाज तहकूब
भुवनेश्वर:
ओरिसाच्या विधानसभेत गुरुवारी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या आसनाजवळच नाग दिसल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे पाचावर धारण बसलेल्या आमदारांची भीती आजही कायम होती. त्यामुळे नागकृपेमुळे आज विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्यामुळे युवा आमदारांनी सहलीची मजा लुटली. गुरुवारच्या घटनेमुळे विधानसभेत सावधगिरीची उपाययोजना म्हणून वन्यजीव अधिकारी आणि सर्पमित्रही आवर्जून उपस्थित होते. युवा आमदारांचा उत्साहही तितकाच ताजा होता. ६८ आमदारांपैकी ४० युवा आमदारांनी ओरिसा पर्यटन महामंडळाच्या बसमधून इक्कमरा बानाची सफर केली.

दोन हेलिकॉप्टर्स तातडीने उतरविली
उधमपूर :
खराब हवामानामुळे डेक्कन अ‍ॅव्हिएशन प्रायव्हेट लि. व हिमालया एअरवेज प्रायव्हेट लि. या कंपन्यांची दोन हेलिकॉप्टर्स आज कात्रा आणि चंका-थनपाल गावात उतरविण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पायलट व कर्मचारी सुरक्षित आहेत.