Leading International Marathi News Daily

शनिवार, २५ जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

तालिबानविरोधी कारवाईसारखा जोम भारतविरोधी दहशतवाद्यांबाबतही दाखवावा - एस. एम. कृष्णा
विशेष विमानातून, २४ जुलै / पी.टी.आय.

स्वात खोऱ्यामध्ये पाकिस्तानने तालिबानींविरोधात जशी कारवाई केली तसाच जोम त्यांनी लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांविरोधात दाखवावा, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंबईवरी दहशतवादी हल्ल्यामागील संघटनेचा सूत्रधार असलेला लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिज सईद याच्याविरोधात पाकिस्तानने कारवाई करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त

 

केली.
इंडिया-एशियन आणि एशियन रिजनल फोरमच्या मंत्र्यांच्या बैठकीसाठी थायलंडमधील फुकेत येथे ते गेले होते. तेथून मायदेशी परत येताना खास विमानात ते पत्रकारांशी बोलत होते.
पाकिस्तानच्या भूमीवर राहून जे दहशतवादी गट भारताच्या विरोधात दहशतवादी कृत्ये करीत आहेत, अशा सर्व दहशतवादी संघटनांबाबत पाकिस्तानने स्वातमध्ये तालिबानविरोधी जशी कारवाई केली, तशी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने सईद याची मुक्तता केली यला पाकिस्तान सरकारपुढील आव्हान आहे का, असे विचारले असता कृष्णा म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने त्याबाबत याचिका दाखल केली आहे पण त्याबाबत आम्ही नीट माहिती घेऊ व प्रतीक्षा करू.