Leading International Marathi News Daily
शनिवार २५ जुलै २००९
 

सेकंड होम .. गुंतवणुकीचाही आनंद
विकेण्ड होम म्हणून नव्हे तर निवृत्तीनंतरची सोय म्हणून, अतिरिक्त गुंतवणूक म्हणून किंवा माझे स्वत:चे स्वतंत्र घर असावे या विचारातून. विशेष करून उद्योजक या स्तरातील लोकांनाच त्यातल्यात्यात सेकंड होमचा हा विचार करता येऊ शकतो. मोठे कुटंब, कुटुंबातील कमाविणाऱ्यांची संख्या अधिक असणं, घरातील कुणी तरी परदेशी असणं, एक चांगली गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहणे ही सध्या सेकंड होम खरेदीसाठीची ठोस आर्थिक पाश्र्वभूमी ठरू शकते.
सध्या एका बाजूला जागतिक मंदीमुळे देशातील आर्थिक गुंतवणुकीतील व विशेष करून गृह उद्योगातीलही मंदी कशी दूर करायची याचा विचार चालू आहे. त्यातच कुणी घर देता का घर अशी लोकांची खास करून चाकरमान्यांची स्थिती असताना त्यांच्या मनाला दुसरे घर घेण्याचा विचार शिवणार तरी कसा असा प्रश्न अनेकांना पडतो. वाढत्या किंमती, जागतिक मंदी याचा

 

तडाखा बसलेला आयटी उद्योग व त्यात चांगला पैसा मिळविणारे अभियंतेही आता कमी वेतनावर काम करावे लागते की काय किंवा बेकार व्हायची पाळी तर येणार नाही ना या भीतीने ग्रासले आहेत. अमेरिकेत वा पाश्चात्य देशात जाण्यासाठी सज्ज झालेले तरुण पिढीतील गुंतवणूकदार पुरते गांजले आहेत व ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
मुंबई व ठाण्याच्या परिसरात आज मोठय़ा प्रमाणावर सेकंड होमची निर्मिती व्हायला सुरुवात झाली खरी पण २००४ सालापर्यंत त्या घरांबद्दल लोकांना पूर्वी जितके आकर्षण होते तितके आकर्षण आता राहिलेले नाही. मुळात सर्वसामान्य माणसांसाठी वा मध्यमवर्गीयांसाठी ही संकल्पना नाही; इतक्या या जागांच्या किमती वरच्या पातळीमध्ये बसविलेल्या आहेत. त्यातही जमिनीची किंमत वेगळी आणि घराची किंमत वेगळी हे समीकरण सर्वसामान्यांसाठी आहे असे वाटत नाही. कारण मुंबईपासून अवघ्या.. अंतरावर असे सांगत किमान ८ लाखापासून पुढे असलेली रुपयांमधील गणती सेकंड होमसाठी अजून रुळलेली नाही. मुंबईबाहेरून सर्वस्व सोडून आलेले वा मूळ गावाशी नाळ तुटलेले लोक मात्र मुंबई या शहरात चांगले रूळले असतील तर ते या बाबींचा विचार करू तरी शकतात. किमान आपलं स्वत:चं असं काही घरकुल असावं यासाठी तरी ते मुंबई-ठाण्यापासून काही अंतरावर असणारं घर घेऊ शकतात. पण ते विकेण्ड होम म्हणून नव्हे तर निवृत्तीनंतरची सोय म्हणून, अतिरिक्त गुंतवणूक म्हणून किंवा माझे स्वत:चे स्वतंत्र घर असावे या विचारातून. विशेष करून उद्योजक या स्तरातील लोकांनाच त्यातल्यात्यात सेकंड होमचा हा विचार करता येऊ शकतो. मोठे कुटंब, कुटुंबातील कमाविणाऱ्यांची संख्या अधिक असणं, घरातील कुणी तरी परदेशी असणं, एक चांगली गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहणे ही सध्या सेकंड होम खरेदीसाठीची ठोस आर्थिक पाश्र्वभूमी ठरू शकते.
साधारणपणे उच्च उत्पन्नगटातील लोकांनीच सेकंड होम घ्यावे, असा विचारप्रवाह एकेकाळी होता. साधारणपणे १५-२० वर्षांंपासून मुंबई-पुण्यात सेकंड होमची विशेष करून छोटेखानी बंगल्याची कल्पना रुजू लागली. मुंबईतील लोक पुण्याच्या थंड हवेसाठी पुण्यात फ्लॅट बुक करू लागले. सेवानिवृत्तीनंतरची सोय म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन होता. त्यानंतर मुंबईच्या जवळपासच्या ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांकडे विकासकांची नजर वळली. मुंबईची वस्ती जशीजशी वाढू लागली तशी मुंबई शहरातील उच्च उत्पन्न व मध्यमवर्गीयांची सेकंड होमची गरजही वाढू लागली. गुंतवणूक म्हणून आणि मूळ गावाहून मुंबईत आल्याने कालांतराने तेथील संबंध तुटल्याने स्वत:चे ‘घरकुल असावे छान’ अशा विचारातूनही मराठी व बिगरमराठी भाषिकांनी सेकंड होमकडे लक्ष वळविले. त्यातच मूळ विकासकांपेक्षा विकसित केलेल्या सेकंड होमला मार्केटिंगच्या नव्या तंत्राचीही जोड मिळाली. हळूहळू त्यांचा पगडाच या व्यवसायावर बसला. यातही नेमकेपण होते ते कायदेशीरपणा त्या घर व मालमत्तेला यावा, ते घर निसर्गरम्य वातावरणात कसे आहे ते लोकांना पटविणे आणि तेथे गेल्यानंतर घरसफाई करीत बसण्यापेक्षा थेट रुळल्याप्रमाणे राहता येईल याची सुविधा पुरवण्याकडे या क्षेत्रातील व्यावसायिकांचा कल वाढला.
वास्तविक सेकंड होमची कल्पना परदेशातून आली असल्याने सर्वप्रथम साधेसुधे असणारे ते घर आता शाही सुविधायुक्त कसे आहे, ते दाखविण्याकडे या क्षेत्रातील व्यावसायिकांना महत्त्वाचे वाटू लागले आहे. याचे कारण ही घरे विकत घेणे ही बाब सर्वसामान्य मध्यमवर्गीयाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. अनिवासी भारतीय, उच्च उत्पन्न गटातील लोक आणि उद्योजक यांचे प्राबल्य आता वाढले आहे. किंमतीच्यादृष्टीने त्यांना ते परवडते, गुंतवणुकीसाठी त्यांना ते मोलाचे वाटते कारण तितका पैसा त्यांच्याकडे असतो. त्यामुळे साहजिकच त्यांचा विचार व त्यांचा खिसा पाहूनच आता सेकंड होमच्या किंमती चढू लागल्या आहेत. किमान पाच ते सात लाख रुपये इतकी गुंतवणूक प्राथमिक स्तरावर दाखविली जाते. वस्तुत: घर बांधल्यानंतर ती दहा लाखाच्यावर जाणारी मालमत्ता धारण करणे ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी नाही. दुसरी बाब ही सेकंड होम्स आता एकत्रित वसाहतपूर्ण अशा वातावरणात असल्याने त्यांचे पुढील खर्च हे मध्यमवर्गाच्या आवाक्यातील नाहीत. ती घरे ज्या ठिकाणी असतात ती जागा तेथील ग्रामीण भागातील लोकवस्तींपासून तशी दूर असल्याने स्वत:चे वाहन असणे ही गरजेची बाब होते. प्रत्येकवेळी भाडय़ाची मोटार नेणे परवडणारे नसते. अर्थात सर्वसामान्य माणसांसाठी सेकंड होम ही कल्पनातीत बाब झाली आहे, हे सत्य आहे.
पाश्चिमात्य देशातील जीवनशैलीप्रमाणे तयार झालेल्या विकेण्ड होमची संकल्पना भारतात आता रुजू लागली आहे. केवळ मुंबई वा महाराष्ट्रात नव्हे तर दिल्ली, नॉयडाचा परिसर, कर्नाटकात बंगलोर शहराचा परिसर, आंध्र प्रदेशात हैदराबाद व परिसर, तामीळनाडूत चेन्नई, कोलकाता शहराबाहेरचा परिसर येथे मोठय़ा प्रमाणात सेकंड होमची निर्मिती होत आहे व लोक त्यासाठी पुढे होत आहेत. अर्थात मुंबइ-ठाणे परिसरापेक्षा त्यांच्या किंमती मध्यमवर्गीयांच्या खूप आवाक्यात आहेत. केरळ व गोवा राज्यात तर छोटेखानी घरे वा बंगले उभारण्यात पूर्वीपासूनच तेथील स्थानिक व अन्य ठिकाणी गेलेल्यांनी वाटा उचलला आहे.
विकेण्ड होम नव्या जमान्यातील ही गरज आहे ही बाब सध्या मुंबईतील लोकांना तरी पटणारी नाही. कारण रोजच्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून आठवडय़ाच्या अखेरीस दोन दिवस बाहेर जायचे म्हटले तरी ते दिवस आठवावे लागतात. मुंबईतून फक्त काही मिनिटांच्या अंतरावर अशा जाहिराती जाऊन आता दोन -तीन तासाच्या अंतरावर अशी स्थिती मुंबईच्या वाहतुकीमुळे आली आहे. तसेच मुंबईत आठवडाभर काम केल्यानंतर रोजचा प्रवास केल्यानंतर पुन्हा दोन दिवस मुंबईबाहेर जाण्यासाठी दोन-तीन तास प्रवासात घालवावे असे अनेकांना परवडणारे नाही.त्यापेक्षा घरी राहणे व आराम करणे पसंत केले जाते. दुसरी बाब दर आठवडय़ाला ही बाब अनुसरणे आर्थिक नव्हे तर शारिरीक आणि करिअरच्यादृष्टीनेही परवडत नाही. यामुळे विकेण्ड हा शब्द मुंबईत तरी घरी आराम करावा यासाठी स्वीकारला जातो.
मुंबईबाहेरची ही सेकंड होम वा विकेण्ड होमची जागा सर्व ऋतू लक्षात घेतले तर पावसाळ्यात आल्हाददायी असते. अतिपावसाळा झाला तर नकोशी वाटते आणि उन्हाळ्यात तर काही ठिकाणे विसरणेच बरे असे वाटते. हिवा़ळ्याचा मोसम त्यात आल्हाददायी ठरतो हेच काय ते खरे! अशा ठिकाणी तयार करण्यात आलेली ही घरे खरोखरच निसर्गाच्या सान्निध्यात आहेत का? की मुंबईत निसर्ग नाही त्यापेक्षा तेथे चांगले ? याचाही विचार केला गेला पाहिजे. वास्तविक सेंकड होमचा वापर कसा करावा, का करावा याचा विचार करून गुंतवणूक केली गेली तर ती फायदेशीर ठरू शकेल. अन्य प्रकारच्या काही गुंतवणुकींशी तुलना करता जमिनीतील गुंतवणूक ही आजही काही बाबतीत सरस मानली जाते. फ्लॅट वा जागेतील वा अशा प्रकारच्या घरांसाठी केलेली ही गुंतवणूक कशी फायदेशीर करता येईल याचा विचार सखोलपणे केला तर मुंबईत स्वत:चे घर असणाऱ्या साधारण मध्यमवर्गीयांनाही सेकंड होम गुंतवणूक म्हणून आजही परवडू शकेल. अर्थात त्यासाठी स्वतंत्रपणे जागा पाहून, चार लोकांमध्ये त्याबाबत चौकशी करून आणि तेथील स्थानिक, संबंधित सरकारी अधिकारी यांच्याकडे पूर्णपणे चौकशी करून सेकंड होम बांधले तर त्याची एकंदर किंमतही विकसित बंगल्यांच्या प्रकल्पापेक्षा स्वस्त पडू शकेल. अर्थात त्यासाठीची दगदग नको असेल, व्यवहारातील चोखपणा, कायदेशीरपणा राखून कोणी व्यवस्थितरीत्या सेकंड होमच्या वाटाघाटी करून देणार असेल तर या क्षेत्रातील व्यावसायिक कमी नाहीत. पण तेथे सारे मनासारखे घर मिळेलच, तेथील पर्यावरण सर्व ऋतूत आवडेल असेच असेल याची खात्री मात्र तुची तुम्हीच करून घ्यावी हे उत्तम. विकेण्ड होमचा उपभोग घेण्याच्या काळात तो घेतला गेला पाहिजे व तसे सारे काही जमून आले पाहिजे वा जमवून घेतले पाहिजे तर मुंबईकरांनाही ही गुंतवणूक फायदेशीर व आनंददायी करता येईल हे नक्की.
रवींद्र बिवलकर
ravindra.biwalkar@expressindia.com