Leading International Marathi News Daily
रविवार, २६ जुलै २००९

कॅच द रेन
पाण्याविना तडफडणारे देश भारतासारख्या देशाला आज अक्षरश: ‘नतद्रष्ट’ समजत आहेत. कारण आपल्याकडे धो-धो पाऊस असलेल्या प्रांतांमध्येही पाणीसंचयनाची व्यवस्था करण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. रेनवॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षां-संचयन या शब्दाबद्दलच अजून अनेकांना परकेपणा वाटतो. ही संकल्पना समजून घेऊन पर्जन्यजलाची साठवण करून ते वापरण्याची संस्कृती सर्वत्र रुजविली तर पुरेसे पाणी नक्कीच उपलब्ध होऊ शकेल..
पाऊस येताच शब्दही धो-धो बरसू लागतात आणि बघता बघता त्यांच्या कविता होतात! अंतरंगातील बियांना कोंब फुटतात आणि ताज्या, मऊशार गवतावर रानफुलं डोलू लागतात!! .. एखाद्या ललित लेखात किंवा ब्लॉगवर शोभतील अशी ही वाक्ये! पावसाळ्यात कवितांचे आणि अशा शाब्दिक फुलोऱ्यांचे उदंड पीक येते. कारण संवेदनशील मनांना पाऊस भावतो.
 

मग अशा अतिसंवेदनक्षम मनांना नव्या सृजनाची पालवी न फुटली तरच नवल. पण मग प्रश्न पडतो की, इतक्या जिवलग पावसाला कायम मनात आणि शब्दांत साठवणारे आपण, प्रत्यक्ष त्याचा वर्षांव मात्र वाया का घालवतो?
पावसाचे गोडवे गाणारी, गौरव करणारी आपली संस्कृती, ही संपदा जोपासण्याइतकी विकसित का नाही झाली? पावसाचा नैसर्गिक शुद्ध पाण्याचा स्रोत आपण गटारगंगेत का वाहू देतो? पाण्याचं संवर्धन, संचयन या संकल्पना आपल्या समाजात का सहजी रुजू शकत नाहीत?
गेल्या पंधरवडय़ात उशिरा का होईना, पण पावसाने राज्यभरात आगमन केले. एकीकडे आपण पहिल्या पावसात खोळंबलेल्या ट्रॅफिकमुळे आणि गडबडलेल्या रेल्वेमुळे हैराण झालो होतो आणि दुसरीकडे राज्यभर सर्वाना पाणीटंचाईने ग्रासलेले होते. पाण्याची समस्या इतकी बिकट झाल्यानंतर राज्य शासनाने आधी विचार केला कृत्रिम पाऊस पाडण्याचा आणि मग समुद्राचे पाणी गोडे करण्याचा! ज्याचा दर आहे किमान ५८ रुपये प्रती किलोलिटर. हा खर्च अवाढव्यच आहे. आणि हा मार्ग अवलंबिणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागण्यासारखे आहे.
असे म्हटले जाते की, तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, इतका पाणीप्रश्न आज जगभरात उग्र झालेला आहे. त्याने सर्वाना ग्रासले आहे. आणि पाण्याविना तडफडणारे देश भारतासारख्या देशाला आज अक्षरश: ‘नतद्रष्ट’ समजत आहेत. कारण आपल्याकडे धो-धो पाऊस असलेल्या प्रांतांमध्येही पाणीसंचयनाची व्यवस्था करण्यात आपण असमर्थ ठरलेलो आहोत.
पाणीटंचाईच्या प्रश्नावर सर्व पर्यायी योजना आखणे हे सरकारचे काम आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही, अशी अनास्थेची भावना अजूनही लोकांमध्ये आहे. खेडोपाडी प्रवासाला जाणाऱ्या शहरी माणसाला हंडय़ावर हंडे घेऊन पायपीट करत पाणी भरणाऱ्या महिला हे फक्त ‘ग्रामीण वास्तव’ वाटते, कारण त्याच्या शहरातील पालिका यंत्रणेने त्यांच्यावर ही वेळ येऊ दिलेली नसते. मात्र, यंदा ऐन जून महिन्यातच ३० टक्के पाणीकपात अनुभवलेल्या मुंबईकरांना आणि पाण्याचा ठणठणाट म्हणजे काय, हे प्रत्यक्ष सोसलेल्या पुणेकरांना पाणीटंचाईची तीव्रता प्रथमच जाणवली आणि पालिकेच्या वर्षांसंचयन व विनियोग कक्षाचा फोन खणखणू लागला. एरवी या विभागाचे नावही अनेकांना परिचित नव्हते.
रेनवॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षांजल संचयन या शब्दांबद्दल अजूनही अनेकांना परकेपणा वाटतो. खरे तर या संकल्पना भारतासाठी बिलकुल नव्या नाहीत. रेनवॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना अभिनव आहे, असा काहींचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात सिंधू संस्कृतीत त्याची मुळे सापडतात. एलिफंटा व कान्हेरी येथील गुंफांमध्ये वर्षांजल संचयनाच्या सोयी आढळून आल्या आहेत. पृथ्वीराज चौहान तिसरा याच्या सैन्यातील जाट जवान थरच्या वाळवंटातील ठाटावाडा गावात राहू लागले. तेथे वर्षभरात फक्त २५ सेंमी पाऊस पडत असे. विहीर खणायची म्हटली तरी २०० फूट खोल जावे लागे. तेव्हा त्या गावात मोठाले तलाव आणि टाक्या यांत पावसाचे पाणी साठवून लोकांना ते मिळण्याची व्यवस्था केली गेली, असे संदर्भ आढळले आहेत. मुस्लिम नवाब फत्तेहखान याने राजस्थानात १४५० च्या दरम्यान फत्तेपूर वसविले तेव्हा मोठाल्या विहिरी, तलाव बांधून पावसाचे पाणी साठवण्याची सोय केली होती, असाही ऐतिहासिक संदर्भ सापडतो. शिवकालीन किल्ल्यांवरही पावसाचे पाणी साठवण्याची सोय होती. म्हणून तर रेनवॉटर हार्वेस्टिंग संदर्भातील सरकारी योजनेचे नाव ‘शिवकालीन पाणी साठवण योजना’ असेच आहे.
अलीकडच्या काळात देशभरात अनेक पर्यावरणप्रेमींनी रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबविले आहेत. मॅगेसेसे पुरस्कारविजेते राजेंद्रसिंग यांना तर ‘रेनकॅचर’ अशी बिरुदावलीच मिळाली आहे. महाराष्ट्रातही अनेक पथदर्शक प्रकल्पांत रेनवॉटर हार्वेस्टिंग केलेले पाहायला मिळते.
असे असताना सर्वसामान्य शहरी नागरिकांमध्ये मात्र या संकल्पनेविषयी अद्यापि अनभिज्ञता व निष्क्रियता का, असा प्रश्न पडतो. जोपर्यंत पालिकेकडून सहज, वाजवी दरात पाणी मिळतेय तोवर स्वत: पाणी मिळवण्याची धडपड करण्याची मानसिकता शहरी माणसांत दिसत नाही. त्यातही एखाद्या व्यक्तीला त्याबद्दल कळकळ वाटली तरी शहरी सहकारी सोसायटय़ांमधील सहकारभाव इतका पातळ झाला आहे, की यासंदर्भातील प्रस्ताव सोसायटीच्या सभेत पारीत करून घेणे ही सोपी बाब नसते.
अलीकडे पाणीटंचाईची तीव्रता अनुभवलेल्या शहरवासीयांना पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वर्षांसंचयन व विनियोग कक्षाकडे विचारणांचा ओघ वाढला आहे. या विभागाच्या आस्थेवाईक अधिकारी सुप्रभा मराठे यांना सध्या ‘रेनवॉटर हार्वेिस्टग’साठी शहरभरातून सतत फोन येत आहेत. मात्र, गेली पाच वर्षे आपण सातत्याने यासंबंधात केलेल्या प्रचाराचे प्रयत्न अपुरे ठरल्याची खंत त्यांना वाटते. ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चे काम पोटतिडकीने करणाऱ्या असिस्टंट इंजिनीअर सुप्रभा मराठे यांच्याशी या विषयावर बातचीत केली. त्यांच्याकडून मुंबई महानगरपालिका हा विषय कसा हाताळते, याबद्दलची मूलभूत माहिती समजली.
सर्व नगरपालिकांनी वर्षां संचयन विनियोग पद्धतीचा अवलंब करावा, असा आग्रह धरणारा जी. आर. महाराष्ट्र शासनाने २००२ मध्ये काढला. त्यानुसार पहिली पावले उचलली बृहन्मुंबई महानगरपालिकेने. २००२ च्या अखेरीस हा कक्ष मुंबई महानगरपालिकेत सुरू झाला. आता राज्यभरातील इतर पालिकांतही हा विभाग आहे. ग्रामपंचायत पातळीवरही असे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबईत हा कक्ष सुरू झाल्यानंतर वर्षांसंचयनासंदर्भात पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. शहराला पाण्याची गरज किती, सध्याच्या तलाव व्यवस्थेतून ती भागविण्याची क्षमता किती, पाण्याची किती तूट येतेय, आणि ती कशी भरून काढता येईल, याच्या आढाव्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली- ती म्हणजे मुंबईतील वर्षांजल संधारणाचा हेतू आणि उर्वरित महाराष्ट्रातील हेतू मुळात वेगळा आहे. मुंबईबाहेर जिथे जिथे पाणीसमस्या आहे, तिथे भरपूर विहिरी वा कूपनलिका आहेत. पण त्या उन्हाळ्यात आटतात. तिथे भूजलपातळी खाली गेली आहे. वापरण्यायोग्य भूजल कमी झाले आहे. त्यामुळे तेथे रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उद्देश आहे- पाण्याची पुनर्भरणी.. भूजलपातळी वाढावी म्हणून वर्षांजलसंधारण.
मुंबईत परिस्थिती वेगळी आहे. मुंबईत विहिरी वा कूपनलिका लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहेत. मुंबईत सध्या सुमारे साडेबारा हजार विहिरी व कूपनलिका आहेत. या महानगराची पाण्याची मागणी आहे प्रतिदिन ३४०० दशलक्ष लिटर्स आणि पुरवठा आहे साधारणत: प्रतिदिन २९०० दशलक्ष लिटर्स. २०२१ मध्ये मुंबईची लोकसंख्या साधारणत: १५.६० दशलक्ष होईल, तेव्हा पाण्याची मागणी असेल प्रतिदिन ५४०० दशलक्ष लिटर्स. शहराची पाण्याची गरज वाढू लागते तेव्हा नवी धरणे बांधणे, भूजलाचा वापर करणे-म्हणजेच आणखी कूपनलिका खोदणे, समुद्राचे पाणी गोडे करून वापरणे आणि पावसाचे पाणी साठवून वापरणे- असे विविध पर्याय योजावे लागतात.
या सर्व पर्यायांत सर्वात सहज-सोपा आणि कमी खर्चिक उपाय पावसाचे पाणी साठवणे हाच असतो. २००२ पासून मुंबई महानगरपालिकेने १००० स्क्वे. मीटर आणि त्याहून अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडावरील इमारतींसाठी वर्षां संचयन योजना सक्तीची केली आहे. २००८ पर्यंत ४४४ नवीन इमारतींमध्ये ही योजना सुरू झाली आहे. २००७ पासून ३०० स्क्वे. मीटर व अधिक क्षेत्रफळाच्या नव्या इमारतींमध्येही ही योजना सक्तीची केली गेली आहे.
तत्पूर्वीच्या इमारतींना अशी पर्यायी, पूरक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेचे शुद्ध, स्वच्छ पिण्याचे पाणीच नैसर्गिक विधीसाठीही वापरले जाते. ही चैन यापुढे फार काळ परवडणार नाही, याची जाणीव यंदाच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना झाली आहे. निदान फ्लश टँकसाठी तरी पर्यायी पाणीव्यवस्था करावी लागण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पात इमारतीच्या छतावर वा गच्चीवर होणारा पर्जन्यवर्षांव पाईपच्या साह्याने एका टाकीत जमा केला जातो. या टाकीतले पाणी मग पंपाच्या साह्याने इमारतीतील सर्व घरांच्या स्वच्छतागृहांना पुरविले जाऊ शकते. जिथे पाऊस व्यवस्थित पडतो, त्या भागांमध्ये चार महिने तरी ही सोय पुरेशी होते. शिवाय अतिरिक्त शिल्लक पाणी इमारतीच्या कूपनलिकेकडे वळवता येते. मुंबई महापालिकेच्या संकेतांनुसार हे वर्षांजल पिण्यासाठी वापरले जात नाही.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत प्रदूषणास कारणीभूत ठरणारे रासायनिक घटक पाण्यात आढळतात. दोन-तीन वर्षांवांनंतर हे दूषितपण कमी होते. काही देशांत अ‍ॅसिड रेनची शक्यता असते. तेथे वर्षांजलाचे शुद्धीकरण करून मगच ते वापरले जाते. काही देशांनी त्यासाठी खास सौरऊर्जा प्रकल्पही उभारले आहेत.
मराठे मॅडम सांगतात की, वर्षांसंचयनाच्या प्रचाराचा प्रयत्न आम्ही सतत करीत आहोत. प्रत्येक वॉर्डात जलमेळे होतात. मुंबईतील सर्व- म्हणजे २४ वॉर्डात स्लाइड शोज्, मॉडेल प्रेझेंटेशनही केले जाते. मुंबईतील महापालिकेच्या दहा रुग्णालयांमध्ये जलमेळेही भरविले गेले आहेत. मरोळ अग्निशमन केंद्रातील वाहनांना पूर्वी अंधेरी वा घाटकोपरला पाणी भरायला जावे लागत असे. आता पावसाच्या पाण्याने त्यांचे काम सुकर केले आहे. पालिकेच्या काही उद्यानांतही हा प्रकल्प राबविला जात आहे. अनेक औद्योगिक केंद्रांनी हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पाण्याचा कमर्शियल दर जास्त आहे. त्यामुळे बचतीचा मार्ग म्हणून ते वर्षांजलाकडे वळतात.
रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू कसा करायचा? तर सर्वप्रथम त्याची संपूर्ण माहिती वाचायची. mcgm.gov.in या वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध आहे. मग आपण राहतो त्या इमारतीचा ले-आऊट प्लॅन, टेरेस प्लॅन, सध्याच्या पाण्याच्या टाकीची क्षमता, ड्रेनेज व्यवस्थेची माहिती, इमारतीत कूपनलिका असल्यास त्या कूपनलिकेचा प्राथमिक अहवाल आणि बोअरवेलच्या पाण्याचे केमिकल अ‍ॅनालिसिस ही सर्व माहिती तसेच त्यासोबत सोसायटीची मान्यता या प्रकल्पास आहे, अशा अर्थाचे पत्र या सर्व कागदपत्रांसह पालिकेच्या वर्षां संचयन व विनियोग कक्षाशी संपर्क साधायचा. मग त्या विभागाचे अधिकारी स्वत: येऊन सल्ला देतात. प्रत्येक इमारतीला त्यासाठी किती खर्च येईल, हे तेथील सद्य:व्यवस्थेवर अवलंबून असते. समजा, चार मजली इमारत आहे, तिथे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहात लागणारे पाणी यांची कनेक्शन्स स्वतंत्र आहेत, अशी आदर्श स्थिती असेल तर १०-१५ हजारांतही हा प्रकल्प सुरू होऊ शकतो. शहरी इमारतीत एलिव्हेशन आणि अन्य सोयीसुविधांसाठी जो खर्च केला जातो, त्या तुलनेत हा प्रकल्प स्वस्तात साकारला जाऊ शकतो आणि त्यामुळे होणारी पाण्याची बचत तर अमूल्यच आहे.
अलीकडे काही श्रीमंती सोसायटय़ांमध्ये खासगी सल्लागार व कंत्राटदार नेमून कॉर्पोरेट हाऊसचा शुद्धीकरण प्रकल्प बसवून रेनवॉटर हार्वेस्टिंग केले जाते. हा प्रकार अर्थातच खर्चिक असतो. कालांतराने तो प्रकल्प चालेनासा होतो तेव्हा हे सल्लागार व कंत्राटदार फिरकतही नाहीत, असाही काहींचा अनुभव आहे. प्रचंड खर्च करूनही प्रकल्प चालत नाही म्हणून हताश झालेले नागरिक मग नाइलाजाने पालिकेच्या वर्षां संचयन कक्षाकडे येतात.
वर्षांजल वापरायची संस्कृती सर्वत्र रुजली तर पोटापुरते पाणी नक्कीच उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळेच आग्रह हा आहे की, वर्षांजल संचयन करून निदान स्वच्छतागृहांची गरज भागवण्याची सोय लोकांनी स्वयंस्फूर्तीने करावी. जगातील अनेक देशांतील नागरिकांनी स्वेच्छेने असे प्रकल्प राबवले आहेत. अमेरिका, इंग्लंड या देशांत ही पद्धत रुळली आहे. अमेरिकेतील काही राज्यांनी हा मार्ग सक्तीचा केला आहे. चीन, ब्राझील, बम्र्युडा या देशांतही हा स्रोत सर्रास वापरला जातो.
निवासी घरकुलांना जोपर्यंत वाजवी दरात, पुरेसा पाणीपुरवठा होतोय तोवर पाण्याच्या अतिरिक्त स्रोताकडे लोकांचे लक्ष वळत नाही. तहान लागली की विहीर खणा, ही म्हण इथे लौकिकार्थानेही खरी ठरते. विहिरी आटल्या व कूपनलिकेलाही पाणी लागत नाही म्हणून कासावीस होणाऱ्यांनी तातडीने वर्षांसंचयन करणे आवश्यक आहे. शहरातील माणसाने तर याबाबतीत अधिकच सक्रीय होणे जरुरीचे आहे. सहकारी सोसायटय़ांमध्ये एखादी नवी कल्पना राबवायची तर सहकार्याची पातळी दुष्काळातल्या विहिरीइतकी आटलेली असते. आता इमारतीच्या टाकीतील पाण्याची पातळी खालावल्यानंतर तरी सहकाराची कास धरून पावसाच्या पाण्याची गंगा सोसायटीत आणण्यासाठी प्रत्येकाने पावले उचलणे गरजेचे आहे.
शुभदा चौकर