Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

सरलेल्या खडतर वर्षांत सरकारी बँकांची भूमिकाच कसदार ठरली - अर्थमंत्री
के. व्ही. कामत यांना ‘एफई बेस्ट बँक्स’ जीवनगौरव पुरस्कार
मुंबई, २५ जुलै/ व्यापार प्रतिनिधी

सरलेले आर्थिक वर्ष हे जागतिक अर्थकारणासाठी अत्यंत खडतर वर्ष होते. पण अशा कसोटीच्या प्रसंगीच माणसाचा किंवा संस्थेचा कस लागत असतो आणि या खडतर काळात कार्यात्मक गुणवत्ता दाखवून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच कसोटीवर खऱ्या उतरल्या, असे कौतुकोद्गार काढत केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज येथे एकंदर बँकिंग क्षेत्राचा सामाजिक उद्दिष्ट गाठण्यात सरकारला असलेल्या योगदानाचा गौरव केला. बँकिंग क्षेत्रातील कस आणि निपुणतेचा गौरव करण्यासाठी हॉटेल ताज महल येथे आयोजण्यात आलेल्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कार सोहळ्यातील प्रमुख अतिथी या नात्याने प्रणव मुखर्जी बोलत होते. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ आणि ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ यांनी एकत्रितपणे ‘जागतिक वित्तीय अरिष्टाचे वस्तुपाठ’ या विषयावर आधारीत महत्त्वपूर्ण सर्वेक्षण केले.

शिवसेना आयडॉल!
अभिजित सावंत झाला शिवसैनिक
मुंबई, २५ जुलै / प्रतिनिधी

पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंत याने आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात शिवसेनेत प्रवेश केला. तरुणांचा आवाज म्हणून अभिजित सावंत याच्यावर जबाबदारी सोपविण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी अभिजितचे पक्षात स्वागत करताना स्पष्ट केले. शिवसेनेमध्ये दररोज विविध पक्षांमधून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. परंतु कोणीही आले म्हणून त्याला पक्षात घ्यावयास शिवसेना पक्ष म्हणजे धर्मशाळा नाही. अनेक जण पक्षात येत असतात तसा अभिजित पक्षात आला असून तो हिदुस्थानचा, तरुणांचा आवाज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझा जन्म महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईत झाला असल्याने मी शिवसैनिकच आहे. युवकांसाठी काहीतरी करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला असून या पक्षाला माझ्या मनातील भावना समजेल, अशी खात्री पटल्यानेच मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे अभिजित सावंत याने या वेळी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, भगवा झेंडा देऊन अभिजित याचे पक्षात स्वागत करण्यात आले.

‘खिचडी’च्या राजकारणात पाच हजार कुटुंबांची होणार
उपासमार!
संदीप आचार्य, मुंबई, २५ जुलै

इतिहास, गणित आदी विषयांच्या पुस्तकांतील चुका, शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्याचा निर्णय, शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांचे नाव व छायाचित्र इतिहासाच्या पुस्तकातून गायब करण्याची किमया असो की शाळांच्या परवानगीचे मुद्दे असोत राज्य शासनाचे शालेय शिक्षण मंत्रालय सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसते. हे सर्व कमी ठरावे असा आदेश आता काढण्यात आला आहे. या आदेशामुळे यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मधल्या सुटीत खिचडी देण्याचे काम बडय़ा कंत्राटदारांना मिळणार असून ६५० हून अधिक महिला औद्योगिक सहकारी संस्था व त्यांच्यावर अवलंबून असणारी सुमारे पाच हजार कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. शालेय पोषण आहार योजना ही केंद्र शासनाने १९९५ साली सुरू केली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना दरमहा तीन किलो तांदूळ देण्यात येत असे.

मुंबईचा कंटूर नकाशा चार वर्षांनंतरही अपूर्णच!
अभिजित घोरपडे, मुंबई, २५ जुलै

मुंबईत आलेल्या ‘न भूतो’ महापुराला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात विविध उपायांद्वारे मुंबई पुराच्या दृष्टीने सुरक्षित होणे अपेक्षित होते. पण हे आव्हान पेलण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरले आहे आणि मुंबईचा पुराचा धोका खरंच कमी झाला आहे का? याबाबत मिठी नदीची परिक्रमा, काही उपायांची प्रत्यक्ष पाहणी, चितळे समितीचा अहवाल व तज्ज्ञांशी चर्चा करून मांडलेली वस्तुस्थिती. मुंबईतील ‘२६ जुलै’च्या प्रलयानंतर सत्यशोधनासाठी नेमलेल्या चितळे समितीने या शहराचा कंटूर नकाशा तातडीने तयार करण्याची शिफारस केली होती. मात्र, हे महत्त्वपूर्ण काम चार वर्षांनंतरही अपूर्णच आहे. त्यामुळे पूरनियंत्रणाचे नियोजन कसे करणार, असा सवाल खुद्द चितळे समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. मुंबईत २६-२७ जुलै २००५ ला आलेल्या अभूतपूर्व पुराच्या घटनेला चार वर्षे होत आहेत. त्याचे सत्यशोधन करण्यासाठी डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने सुमारे सहा-सात महिने र्सवकष अभ्यास करून ३१ मार्च २००६ रोजी वीस शिफारशी असलेला अहवाल शासनाला सादर केला.

निष्क्रिय आमदारांना घरी बसविणार- उद्धव
मुंबई, २५ जुलै / प्रतिनिधी

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षातर्फे तिकीट देताना निष्क्रिय आमदारांना घरी बसविण्यात येईल आणि जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. राज्यात शिवसेना-भाजप युती ही दोन दशकांहून अधिक काळ अबाधित असून युतीमध्ये जागावाटपाबाबतची चर्चा फार काळ करावी लागणार नाही. मात्र मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने युतीच्या मतदारसंघांमध्ये काही ठिकाणी अदलाबदल करावे लागतील, असे उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. युतीची सत्ता आल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असेल ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठरवतील, असे एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संघटनात्मक बदलही आवश्यक तेथे केलेच जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना छळणाऱ्या बिल्डरांविरुद्ध शिवसेनेचा लढा सुरूच राहील. बिल्डर शिवसेनेचा असला तरीही त्याला दयामाया दाखविण्यात येणार नाही, ही आपली भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करताना ‘लोकसत्ता’चा उल्लेखही केला.

माजी काँग्रेस आमदार भाजपच्या गळाला
मुंबई, २५ जुलै/खास प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार नाना पटोले यांनी आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. प्रदेश भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पटोले यांची प्रदेश सचिवपदी तात्काळ नियुक्ती जाहीर केली तर काँग्रेस व राष्ट्रवादीमधील आणखीही काही बडे नेते लवकरच भाजपत डेरेदाखल होणार असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कार्यालयातील या प्रवेशानंतर नाना पटोले यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. विदर्भातील प्रश्न तसेच धान उत्पादकांच्या समस्यांपासून ओबीसींच्या प्रश्नांवर सरकारने काहीच केले नसल्याचे पटोले यांनी सांगितले. या सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळाली तर राज्यच अंधारात बुडेल असेही ते म्हणाले. यावेळी एक कोटी ८१ लाख रुपयांच्या कर्जात बुडालेल्या राज्य शासनाकडून सुरू असलेली पॅकेजची खैरात म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी येत्या ९ ऑगस्टरोजी भाजपतर्फे राज्यव्यापी ‘जेलभरो आंदोलन’ करण्यात येणार असल्याचे घोषित केले. हे आघाडी सरकार म्हणजे फसवणूक सरकार असून शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, दलित अशा सर्वच घटकांची फसवणूक करणाऱ्या घोषणा देण्याचे काम सध्या हे सरकार करत आहे. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे व शायना एनसी आदी उपस्थित होते.

 

प्रत्येक शुक्रवारी