Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण अपुरे -विलासराव
लातूर, २५ जुलै/वार्ताहर

५२ टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात देऊ केले असले तरी ते तुलनेने अपुरे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी केले.विलासराव देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत इतर मागासवर्गीयांसाठी घेतलेल्या निर्णयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजाच्या वतीने आयोजित कृतज्ञता व अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दिलीपराव देशमुख, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सदस्य अब्दुल अली अझिझी, स्वागताध्यक्ष अमित देशमुख, खासदार जयवंत आवळे, आमदार बाबासाहेब शिवरकर, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, छाया चिमुरे, आदी उपस्थित होते.

आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीसपदी संजय मोरे यांची निवड
औरंगाबाद, २५ जुलै/खास प्रतिनिधी

शरीरसौष्ठवच्या इतिहासात प्रथमच भारताकडे आशियाई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीसपद आले आहे. भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस संजय मोरे यांची आशियाई संघटनेच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली. या संघटनेच्या अध्यक्षपदी बहारीनचे शेख अब्दुल्ला बिन रशीद अल खलिफा यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष डॉ. राफेल सॅन्टोझा यांच्या अध्यक्षतेखाली आशियाई संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. या निवडणुकीत २२ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा आजपासून
औरंगाबाद, २५ जुलै/खास प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून दोन दिवस ४३वी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह १४ देशांचे शंभरावर शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले आहेत. या सर्व शरीरसौष्ठवपटूंची वजने आज घेण्यात आली. सिडको नाटय़गृहात रविवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री अरुण यादव यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या दोन खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे. ती म्हणजे अमित चौधरी आणि एन. किशनसिंग यांच्याकडून.

पाथरीत शेतकऱ्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार
परभणी, २५ जुलै/वार्ताहर

पाथरी शहरातील नवा मोंढय़ात खतासाठी रांगा लावलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींच्या कक्षावर तुफान दगडफेक करून मोठे नुकसान केले. ही घटना आज दुपारी घडली. तालुक्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आज मोंढय़ामध्ये खत खरेदीसाठी गर्दी केली होती. शेतकरी रांगेत उभे असताना दुकानदारांनी खत संपला, असे सांगताच गोंधळ उडाला. यावेळी पोलसी उपनिरीक्षक पी. आर. बांद्रे यांनी शेतकऱ्यांनी लाठीहल्ला करून जमाव पांगविला.

काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांसमोर परभणीत जोरदार खडाजंगी
परभणी, २५ जुलै/वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांसमोर आमदार सुरेश देशमुख व कुंडलिक नागरे समर्थक कार्यकर्त्यांत शाब्दिक खडाजंगी झाली. नागरेसमर्थक कार्यकर्त्यांनी जिंतूर तालुक्यात आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पक्ष खड्डय़ात घातला असा गंभीर आरोप केला.

जल आयोगाच्या पथकाकडून बाभळी बंधाऱ्याची पाहणी
नांदेड, २५ जुलै/वार्ताहर

नांदेड जिल्ह्य़ातील धर्माबादजवळ गोदावरी नदीवर बांधल्या जाणाऱ्या बाभळी येथील बंधाऱ्याची आज केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या बंधाऱ्याच्या कामावरून महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यात वाद सुरू आहे. बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व आंध्र सीमेवर होत आहे. तो पूर्ण झाला तर आंध्र प्रदेशला गोदावरी नदीचे पाणी मिळणार नाही. त्यामुळे हे काम बंद करावे, असा आक्षेप आंध्र प्रदेशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी घेत आंदोलन सुरू केले आहे.

सावरगावात आज यात्रा सोहळा
तुळजापूर, २५ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील सावरगाव खेडय़ात आज नागपंचमीच्या दिनी येथील ग्रामदेवता नागनाथ मंदिरात यात्रा उत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. यात्रा सोहळ्यावर अवर्षणाचे सावट पसरल्याचेही प्रत्ययास येते. सोलापूर-बार्शी गावाच्या हद्दीवर वसलेले सावरगाव येथील नागनाथ मंदिर हे ग्रामदैवत म्हणून सर्वश्रुत आहे. ग्रामीण परिसरात भरणाऱ्या यात्रेसाठी व्यापारीवर्ग मोठय़ा संख्येने येत असल्याने सावरगाव येथील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. तसेच महामंडळाने यात्रेसाठी जादा बसगाडय़ांची सोय केली आहे.

काळे झेंडे दाखविणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा आदेश
परभणी, २५ जुलै/वार्ताहर

मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना परभणी येथे काळे झेंडे दाखविणाऱ्या पक्षाच्या नगरसेवक व सदस्यांवर निलंबनाची कारवाई तातडीने करावी, असे आदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड्. गणेश पाटील यांनी जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. पक्षाचे आदेश प्राप्त झाले असून चौकशीनंतरच निलंबनाची कारवाई होईल, असे जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांनी स्पष्ट केले.
परभणी नगरपालिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री समर्थक नगरसेवकांनी स्वतंत्र गट निर्माण करून राष्ट्रवादीच्या मदतीने जयश्री खोबे या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिक ठाकरे हे दोघे १२ जुलैला एका कार्यक्रमानिमित्त परभणीत आले असता काँग्रेसच्या नगरसेवक व सदस्यांनी त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले व मुस्लिम विरोधी मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचे फलकही फडकवले. याची प्रदेश काँग्रेसने गंभीर दखल घेत ही बाब निंदनीय असून सकृतदर्शनी पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे नगर परिषद सदस्य व क्रियाशील सदस्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात यावे व कारणे दाखवा नोटिसा बजावून सूचना द्याव्यात व अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत

प्रसिद्ध प्रवचनकार सोपानकाका इसादकर यांचे निधन
गंगाखेड, २५ जुलै/वार्ताहर

मराठवाडय़ासह राज्यात आपल्या प्रवचनाने लाखो शिष्य तयार केलेले प्रसिद्ध प्रवचनकार सोपानकाका इसादकर यांचे आज अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. उद्या (दि. २६) त्यांच्यावर विठ्ठल-रुक्माई मंदिर, गंगाखेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. संत मोतीराम महाराज तसेच मारोतराव महाराज दस्तापूरकर यांचा आयुष्यभर सांप्रदायिक परिवाराचा वारसा चालवीत संप्रदाय सांभाळीत नवनवीन युवकांना सांप्रदायात आणले. मराठवाडय़ासह राज्याच्या विविध भागांत त्यांचा विशेष शिष्यवर्ग आहे.अनेक राजकीय नेते त्यांचे भक्त आहेत.

माहेश्वरी सभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लातूर, २५ जुलै/वार्ताहर

लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने माहेश्वरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मंगळवारी येथील श्री नवयुवक मारवाडी वाचनालयात सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष डॉ. हरिप्रसाद सोमाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर इन्नानी, सचिव श्यामसुंदर भार्गव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांताप्रसाद राठी आदी उपस्थित होते.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
परळी वैजनाथ, २५ जुलै/वार्ताहर

परळी तालुक्यातील मलकापूर येथील शिवारात एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून आरोपींना त्वरित अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित संघटनांनी दिला आहे. परळीपासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मलकापूर शिवारातील शेतावर काम करणाऱ्या मुलीवर येथील नराधमांनी शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून तिला आखाडय़ावर नेऊन बलात्कार केला व पोलिसांत फिर्याद दिल्यास मुलीसह तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

‘नांदेड विभागात मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार’
औरंगाबाद, २५ जुलै/खास प्रतिनिधी

राज्यात शासनाने माध्यमिक शिक्षण स्तरावर सैनिकी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने नांदेड विभागातही मुलींची सैनिकी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. ही सैनिका शाळा राज्यातील मान्यताप्राप्त सक्षम अशा शैक्षणिक संस्थेस मंजूर करण्याच्या दृष्टीने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे इच्छुक मान्यताप्राप्त संस्थेने पाच हजार रुपयांचे चलन व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थेकडे किमान २५ लाख रुपये एवढा निधी असणे आवश्यक आहे. तसेच ही संस्थाय मुंबई सार्वजनिक विश्वस्त आणि संस्था नोंदणी अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. इच्छुक शैक्षणिक संस्थेच्या विरुद्ध कोणतीही चौकशी अथवा न्यायालयीन प्रकरण चालू नसावे. एकही प्रकरण प्रलंबित नसल्याचे हमीपत्र सादर करावे, अशा अटीही घालण्यात आलेल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालय इमारतीचे आज लोकार्पण
लातूर, २५ जुलै/वार्ताहर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय, लातूरच्या नवीन २०० खाटांच्या इमारतीचे व एमआरआय यंत्राचे आज उद्घाटन व लोकार्पण होत आहे. रविवार, २६ जुलैला सायंकाळी ७ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख उद्घाटक, तर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीपराव देशमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित राहात आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री सुरेश शेट्टी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत. या नव्या इमारतीत २०० खाटांचे रुग्णालय, शस्त्रक्रियागृह, १२० विद्यार्थ्यांसाठी लेक्चर व जिम्नॅशिअम हॉल, एम.आर.आय.यंत्र, टेबल टेनिस कोर्ट अशा सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक डॉ. डब्ल्यू बी. ताकडे, अधिष्ठाता डॉ. ए. बी. सोलापुरे, सचिव भूषण गगराणी यांनी केले आहे.

आरोग्य विमा योजनेवर आज परिसंवाद
नांदेड, २५ जुलै/वार्ताहर

रयत आरोग्य मंडळ संचलित रयत रुग्णालयाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त उद्या (दि. २६) आरोग्य विमा योजना (वैद्यकीय सेवा खर्चास पर्याय) या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकरराव चव्हाण सभागृहात सकाळी १० वा. होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित राहणार आहेत. मनपाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे प्रमुख अतिथी असतील. परिसंवादात डॉ. अनंत फडके (पुणे), डॉ. शशिकांत अहंकारी (अणदूर) व अरुणा देशपांडे (पुणे) हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पंडित व राठोड यांना बंजारा समाज भूषण पुरस्कार
बीड, २५ जुलै/वार्ताहर

गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित यांना बंजारा समाज मित्र तर विभागीय समाजकल्याण अधिकारी रा. उ. राठोड यांना बंजारा समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी होणार असल्याची माहिती बंजारा क्रमचारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष पी. टी. चव्हाण यांनी दिली. बीड जिल्ह्य़ातील गेवराई येथे मागील दहा वर्षांपासून कर्मचारी सेवा संस्था व जयंती उत्सव समितीच्या वतीने बंजारा समाजाचा निर्धार मेळावा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलैला घेण्यात येतो. या वर्षी या मेळाव्यात बंजारा समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यात आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणारे आमदार अमरसिंह पंडित यांना बंजारा समाज मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर औरंगाबाद विभागाचे समाजकल्याण अधिकारी रा. उ. राठोड यांना बंजारा समाज भूषण पुरस्कार दिला जाणार आहे.

चार विद्यार्थी गुणवत्तायादीत
बीड, २५ जुलै/वार्ताहर

चौथी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा नगर भागातील विवेक वर्धिनी विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्तायादीत झळकले. परळी येथील विवेक वर्धिनी विद्यालयातील मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. यात गणेश धनंजय देशपांडे २८२ गुण मिळवून जिल्ह्य़ात चौथा, समृद्धी महादेव मुंडे (२७८ गुण- जिल्ह्य़ात पाचवी), अपेक्षा प्रमोद भालेराव (२७४ गुण- जिल्ह्य़ात सातवी), आकाश प्रकाश चव्हाण (२६८ गुण- जिल्ह्य़ात दहावा) आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.