Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सरलेल्या खडतर वर्षांत सरकारी बँकांची भूमिकाच कसदार ठरली - अर्थमंत्री
के. व्ही. कामत यांना ‘एफई बेस्ट बँक्स’ जीवनगौरव पुरस्कार
मुंबई, २५ जुलै/ व्यापार प्रतिनिधी

सरलेले आर्थिक वर्ष हे जागतिक अर्थकारणासाठी अत्यंत खडतर वर्ष होते. पण अशा कसोटीच्या प्रसंगीच माणसाचा किंवा संस्थेचा कस लागत असतो आणि या खडतर काळात कार्यात्मक गुणवत्ता दाखवून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच कसोटीवर खऱ्या उतरल्या, असे कौतुकोद्गार काढत केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज येथे एकंदर बँकिंग क्षेत्राचा सामाजिक उद्दिष्ट गाठण्यात

 

सरकारला असलेल्या योगदानाचा गौरव केला.
बँकिंग क्षेत्रातील कस आणि निपुणतेचा गौरव करण्यासाठी हॉटेल ताज महल येथे आयोजण्यात आलेल्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कार सोहळ्यातील प्रमुख अतिथी या नात्याने प्रणव मुखर्जी बोलत होते. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ आणि ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ यांनी एकत्रितपणे ‘जागतिक वित्तीय अरिष्टाचे वस्तुपाठ’ या विषयावर आधारीत महत्त्वपूर्ण सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण म्हणजे भारताच्या वित्तीय क्षेत्राची नाडीपरीक्षाच असून ती तब्येतीत असल्याचा निर्वाळाच त्याने दिला आहे, असे मुखर्जी यांनी पुढे बोलताना प्रतिपादन केले. केंद्रात अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुखर्जी यांचा मुंबईतील हा पहिलाच कार्यक्रम होता. देशभरातील राष्ट्रीयीकृत, खासगी आणि विदेशी वाणिज्य बँकांचे बहुतांश प्रमुख, अनेक बडे उद्योजक व व्यावसायिक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील या समारंभाला उपस्थित होते.
प्रारंभी ‘इंडियन एक्स्प्रेस’चे समूह संपादक शेखर गुप्ता यांनी प्रास्ताविक करताना, सर्वसमावेशक प्रगतीसाठी आवश्यक असलेले सामाजिक चलनवलन आणि तंत्रज्ञानात्मक नाविन्यतेला चालना देणारी बँकांची भूमिकाच सर्वश्रेष्ठ ठरली असा देशोदेशीचा दाखला आहे, असे प्रतिपादन केले. भारताच्या आर्थिक प्रगतीत आजवर उचित योगदान देत वृद्धीपथ गाठणाऱ्या आणि संपूर्ण जगभरात आपल्या कर्तबगारीचा कित्ता स्थापित करणाऱ्या भारताच्या बँकिंग क्षेत्राची घोडदौड कौतुकास्पदच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुरस्कारार्थ्यांची सूची
जीवन गौरव पुरस्कार- के. व्ही. कामत (आयसीआयसीआय बँक)
एफई बेस्ट बँकर ऑफ द इयर - ओ. पी. भट (स्टेट बँक ऑफ इंडिया)
बेस्ट इनोव्हेटिव्ह बँकर ऑफ द इयर- आदित्य पुरी (एचडीएफसी बँक)
सर्वोत्तम राष्ट्रीयीकृत बँका- इंडियन बँक (प्रथम), बँक ऑफ इंडिया (द्वितीय)
सर्वोत्तम नवीन खासगी बँका- अ‍ॅक्सिस बँक (प्रथम), एचडीएफसी बँक (द्वितीय)
सर्वोत्तम जुन्या खासगी बँका- साऊथ इंडियन बँक (प्रथम), तामिळनाडू मर्केटाइल बँक (द्वितीय)
सर्वोत्तम विदेशी बँका- बँक ऑफ अमेरिका (प्रथम), सिटी बँक (द्वितीय)
सर्वेक्षणातील पाच निकषांवर स्वतंत्रपणे सर्वश्रेष्ठ ठरलेल्या बँका- एचडीएफसी बँक (सामथ्र्य आणि सशक्तता), डॉइशे बँक (वृद्धी दर), स्टँडर्ड चार्टर्ड बँक (नफाक्षमता), बँक ऑफ अमेरिका (कार्यात्मकता), युनियन बँक (पत गुणवत्ता).