Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शिवसेना आयडॉल!
अभिजित सावंत झाला शिवसैनिक
मुंबई, २५ जुलै / प्रतिनिधी

पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंत याने आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात शिवसेनेत प्रवेश केला. तरुणांचा आवाज म्हणून अभिजित सावंत याच्यावर जबाबदारी सोपविण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी अभिजितचे पक्षात स्वागत करताना

 

स्पष्ट केले.
शिवसेनेमध्ये दररोज विविध पक्षांमधून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. परंतु कोणीही आले म्हणून त्याला पक्षात घ्यावयास शिवसेना पक्ष म्हणजे धर्मशाळा नाही. अनेक जण पक्षात येत असतात तसा अभिजित पक्षात आला असून तो हिदुस्थानचा, तरुणांचा आवाज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझा जन्म महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईत झाला असल्याने मी शिवसैनिकच आहे. युवकांसाठी काहीतरी करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला असून या पक्षाला माझ्या मनातील भावना समजेल, अशी खात्री पटल्यानेच मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे अभिजित सावंत याने या वेळी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, भगवा झेंडा देऊन अभिजित याचे पक्षात स्वागत करण्यात आले.
अभिजित सावंत याला उमेदवारी देण्याची गरज शिवसेनेला वाटली तर त्याला नक्कीच उमेदवारी देण्यात येईल, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी, अभिजितला तिकिटाची गरजच नाही कारण त्याने त्यापूर्वीच जनतेची मते मिळवली असल्याचे सांगितले. लोकसभेच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत अभिजितने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांचा प्रचार केला होता याकडे लक्ष वेधले असता स्वत: अभिजित याने सांगितले की, निरूपम हे माझे मित्र असून त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन मी त्यांचा प्रचार केला. त्यावेळी कोणत्याही पक्षाच्या प्रवेशाचा मी विचार केला नव्हता, असेही अभिजित सावंत म्हणाला.