Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

प्रादेशिक

भावे पुरस्कार स्वीकारताना मनापासून आनंद - वसुंधराबाई
मुंबई, २५ जुलै प्रतिनिधी

मेनकाच्या बेहेऱ्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या पुरस्कारानंतरचा हा दुसरा भावे स्मृती पुरस्कार स्वीकारताना मला मनापासून आनंद होतो आहे, त्यातही हा पुरस्कार भाव्यांच्या आणि माझ्या गावच्या मंडळींनी दिलेला असल्याने तो आनंद द्विगुणित झाला आहे, असे उदगार ज्येष्ठ लेखिका वसुंधराबाई पटवर्धन यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना काढले. स्व. पु. भा. भावे जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने भावे समिती, डोंबिवली, डोंबिवलीकर मासिक, कोकण मराठी साहित्य परिषद, डोंबिवली शाखा, काव्य रसिक मंडळ, डोंबिवली, के. वि. पेंढरकर महाविद्यालय आणि डोंबिवली ग्रंथ संग्रहालय यांच्या वतीने संयुक्तरीत्या हा पुरस्कार काल वसुंधराबाईंना देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

शिवसेना आता हायटेक युगात!
मुंबई, २५ जुलै / खास प्रतिनिधी

तुमच्या विभागातील कोणत्या ठिकाणी खड्डे पडले आहेत? कचऱ्याचे ढीग पालिकेकडून हलवले जात नाहीत? तुम्हाला काही अज्ञात व्यक्तींकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय? वृद्धापकाळामुळे तुम्हाला काही मदत हवी आहे का? या साऱ्या प्रश्नांची सोडवणूक कमीत कमी वेळेत करण्याची जबाबदारी आता एका राजकीय पक्षाने घेतली आहे. आपल्या दूरध्वनीवरून २४२२२२२२ हा क्रमांक फिरवा. पलीकडून जय महाराष्ट्र, अशा स्वागतानंतर तुमच्या तक्रारीची विचारणा होईल.

भारतीय बँकांची २५ टक्के दराने वृध्दी होणे महत्त्वाचे -चंदा कोचर
मुंबई, २५ जुलै/व्यापार प्रतिनिधी

भारतीय बँका खासगी क्षेत्रात असाव्यात की सार्वजनिक क्षेत्रात हा मुद्दा गौण असून भारतीय बँकिंग उद्योगाची वार्षिक सरासरी २५ टक्के दराने वाढ होणे निकडीचे आहे, असे सडेतोड मत आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी व्यक्त केले. इंडियन एक्स्प्रेस समूहाच्या आर्थिक विषयाला वाहिलेल्या ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाने आयोजित केलेल्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्काराच्या निमित्ताने ‘जागतिक वित्तीय अरिष्टाचे धडे’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.

जागतिक अरिष्टाचे भारतावर परिणाम होणे अपरिहार्य-प्रणव मुखर्जी
मुंबई, २५ जुलै/ व्यापार प्रतिनिधी

रोखीच्या स्थितीबाबत फाजील आत्मविश्वास, पारदर्शकतेचा अभाव, असंबद्ध प्रलोभनांची मालिका आणि जोखीम व दायित्व एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर लोटण्याची दुष्ट शृंखला हे जागतिक वित्तीय अरिष्टाने आपल्याला घालून दिलेले चार महत्त्वाचे धडे आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. बँकिंग क्षेत्रातील कस आणि निपुणतेचा गौरव करण्यासाठी हॉटेल ताज महल येथे आयोजण्यात आलेल्या ‘एफई बेस्ट बँक्स’ पुरस्कार सोहळ्यातील प्रमुख अतिथी या नात्याने प्रणव मुखर्जी बोलत होते.

युतीची यादी १० दिवसात जाहीर करणार-मुंडे
मुंबई, २५ जुलै/खास प्रतिनिधी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या उमेदवारांची यादी येत्या आठ-दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले. युतीच्या सुनामीपुढे आघाडीचा टिकाव लागणार नाही, असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला.
आघाडी सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्याला कर्जबाजारी करून ठेवले असून युतीचे शासन आल्यास पाच हजार मेगाव्ॉट विजेची निर्मिती करण्यात येईल, असे मुंडे म्हणाले.

प्राध्यापकांनी कामावर रुजू होण्याचे ‘मुक्ता’चे आवाहन
मुंबई, २५ जुलै/ खास प्रतिनिधी

राज्यातील प्राध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा राज्य शासनाने केल्यानंतरही प्राध्यापकांच्या विविध संघटनांनी अन्य मागण्यांसाठी संप सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्राध्यापकांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन ‘मुक्ता’ संघटनेने केले आहे.सहाव्या वेतन आयोगात शासनेने देऊ केलेले भत्ते हे केंद्रप्रमाणे नाहीत हे अयोग्य आहे.

नलिनी पंडित अत्यवस्थ
मुंबई, २५ जुलै/प्रतिनिधी

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन नेत्यांच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकणारे ग्रंथ लिहिणाऱ्या थोर विदुषी नलिनी पंडित या सध्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नलिनी पंडित या गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या असाध्य रोगाशी झुंज देत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांना मलेरियामुळे शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्या कोमामध्ये गेल्या. जातीवाद व वर्गवाद तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास या दोन मार्क्‍सवादी विश्लेषण पद्धतीतून लिहिलेल्या नलिनी पंडित यांच्या पुस्तकांमुळे महाराष्ट्रातील बुद्धिवंतांमध्ये त्यांचा दबदबा निर्माण झाला. शुश्रुषा रुग्णालयातील डॉक्टर पंडित यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
मुंबई, २५ जुलै / प्रतिनिधी

डोंगरी येथील पालिका बाजारात असलेली ‘नूरानी मंजिल’ ही मोडकळीस आलेली इमारत पाडण्याचे काम सुरू असताना भिंतीचा काही भाग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणाच्या आरोपावरून पोलिसांनी कंत्राटदार, पर्यवेक्षकासह तिघांना अटक केली आहे. रबूल हुसेन मुजम्मिल हुसेन (२५) आणि अन्वर रुस्तम हुसेन (२८) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नूरानी मंजिल’ ही इमारत खूप जुनी असल्याने मोडकळीस आली होती. त्यामुळे ती रिकामी करून पाडण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी सायंकाळीही हे काम सुरू असताना काही भाग कोसळला आणि रबूल व अन्वर हे दोघे ढिगाऱ्याखाली सापडले.

‘सच का सामना’ला कारणे दाखवा नोटीस!
मुंबई, २५ जुलै/पी.टी.आय.

‘सच का सामना’ हा सध्या ‘टीआरपी’ रेटींगमध्ये आघाडीवर असलेला रिअलिटी शो अडचणीत आला आहे. राज्यसभा सदस्यांनी या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणावर घेतलेल्या आक्षेपांची दखल घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निर्माते आणि संबंधित वाहिनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. संबंधित वाहिनीला कार्यक्रम प्रसारणाच्या तसेच नियमांच्या कायद्यांचा भंग केल्याप्रकरणी नोटीस जारी करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार कमाल अख्तर यांनी कार्यक्रमात विचारलेल्या गेलेल्या एका प्रश्नावर नाराजी व्यक्त केली होती. मंत्रालयाने संबंधित वाहिनीला पाठविलेल्या नोटीशीची मुदत २७ जुलै रोजी संपणार आहे. याबाबत कार्यक्रमाचे निर्माते सिद्धार्थ बसू यांनी मत व्यक्त करण्यास नकार दिला. दरम्यान या मालिकेच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायाधीश संजीव खन्ना यांनी सुनावणी २९ जुलैपर्यंत पुढे ढकलल्याचे जाहीर केले.