Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९


नगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच!
पवारांची शिष्टमंडळास ग्वाही
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
नगर शहर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, अशी ग्वाही पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पुणे येथे शहरातील शिष्टमंडळाला दिली. मागच्या सलग चार निवडणुकांमधील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर आजवरच्या निवडणुकांचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवून आता नगरकरांची मानसिकताही लक्षात घेतली पाहिजे, असे सूचित करताना अल्पसंख्याक उमेदवाराचा पर्यायही खुला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले, असे समजते.

नगरच्या जागेसाठी शहर भाजप आक्रमक
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी

नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपला सोडण्यात यावी, अशी जोरदार मागणी पक्षाच्या आज येथे आयोजित बैठकीत करण्यात येऊन, तशा ठरावाच्या प्रती पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप प्रथमच आक्रमक झाल्याचे दिसून आले.भाजपचे शहराध्यक्ष अनंत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी या वेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. नगर शहर विधानसभेची जागा सध्या शिवसेनेकडे आहे.

‘सापांना दूध पाजू नका’
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी

दूध पाजल्याने ६० हजार सापांचा मृत्यू झाला आहे. साप हा जैविक नियंत्रक व पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे.त्यामुळे सापांचा जीव वाचविण्यासाठी उद्या (रविवारी) होणाऱ्या नागपंचमीचा सण साजरा करताना नागरिकांनी सापांना दूध पाजू नये, असे आवाहन सर्पमित्र प्रणिल नागुरे, चेतन अमरापूरकर आदींनी केले.

महिनाभर उशिरा, तरीही सरासरी गाठली;
वाकी वगळता पाणलोटात सर्वत्र जास्त पाऊस
अकोले, २५ जुलै/वार्ताहर
भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात महिनाभर उशिरा सक्रिय झालेल्या मान्सूनने धुवाधार वृष्टी करीत सरासरी भरून काढली. वाकीचा अपवाद वगळता पाणलोटात सर्वच ठिकाणी गतवर्षीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. धरणातही गतवर्षीच्या तुलनेत १३ टक्के जास्त पाणीसाठा झाला आहे.

ग्रँडमास्टरचे मानांकन मिळवणार- शाल्मली
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी

येत्या वर्षात ग्रँडमास्टर पदाचे मानांकन मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे महाराष्ट्रातील सर्वात लहान वयातील ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’पदाचा (विम) बहुमान मिळवणारी शाल्मली गागरे हिने आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्पेनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत शाल्मलीने २२०० मानांकन मिळवत ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ किताब मिळवला. हा किताब मिळवणारी ओरिसातील खेळाडू पद्मिनी राऊत व शाल्मली सारख्याच वयाच्या. (जन्म १९९४) शाल्मलीची जन्मतारीख ३० जानेवारी १९९४; परंतु पद्मिनीची नेमकी जन्मतारीख उपलब्ध न झाल्याने किताब मिळवणारी सर्वात लहान वयाची खेळाडू शाल्मली की पद्मिनी याबद्दल संभ्रम असल्याची माहिती शाल्मलीचे वडील डॉ. अण्णासाहेब गागरे यांनी दिली.

‘गाजराचं गाव’ निर्यातीच्या नकाशावर!
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी

दशकापूर्वी पावसाळ्यातही टँकरने पिण्याचे पाणी, परंतु आता पावसाळ्यात पावसाने हात आखडता घेतला असतानाही गावातील प्रत्येक विहिरीला ७-८ फूट पाणी असे परिवर्तन घडलेल्या शिंगवेतुकाईने या नव्या प्रवाहाशी समरूप होत शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांच्या रुपाने ‘ग्लोबल व्हिलेज’ची संकल्पना खऱ्या अर्थाने साध्य केली आहे. ‘गाजराचं गाव’ अशी पूर्वापार ओळख असलेल्या या गावातील डाळिंबेही यंदा प्रथमच नेदरलँड्सच्या बाजारात गेली. विहीर पुनर्भरण कार्यक्रमातून गावात ही किमया घडली.

प्रश्नध्यापकांना धक्काबुक्कीचा पुक्टो संघटनेकडून निषेध
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर शांततेने निदर्शने करणाऱ्या प्रश्नध्यापकांना झालेल्या धक्काबुक्कीचा जिल्हा पुक्टो या संघटनेने तीव्र निषेध केला.
या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रश्न. वी. व्ही. नागवडे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आज दिवे (ता. पुरंदर) जि. पुणे येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होता. मंत्री तेथे आले असताना पुणे जिल्ह्य़ातील प्रश्नध्यापकांच्या ‘पुटा व पुक्टो’ या संघटनेतर्फे त्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पवार यांनी प्रश्नध्यापकांचे निवेदन स्वीकारण्यास नकार देऊन उद्धटपणाची भाषा वापरली, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नध्यापकांना धक्काबुक्की केली. पोलिसांनीही प्रश्नध्यापकांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली. हा प्रकार प्रश्नध्यापकांवर अन्याय करणारा असून राज्य सरकारचा पुक्टो संघटना निषेध करत आहे.

अंदाजपत्रकावर चर्चेसाठी मनपाची दि. २९ला सभा
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी

महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील चर्चेसाठी दि. २९ला (बुधवारी) सर्वसाधारण सभा होत आहे. उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांच्यासाठीचा प्रत्येकी २५ लाखांचा विकास निधी बंद करून महापौरनिधीसाठी अडीच कोटींची तरतूद करण्याच्या स्थायीच्या शिफारशीवर या सभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.स्थायी समिती स्थापनेस झालेला विलंब, तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे अंदाजपत्रकाचे सगळे वेळापत्रकच यंदा कोलमडले. आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर तब्बल ४ महिन्यांनी स्थायी समितीने सूचवलेल्या दुरुस्त्यांसह सर्वसाधारण सभेसमोर अंदाजपत्रक येत आहे.

जि.प. कर्मचारी ५ ऑगस्टपासून संपावर
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी

ओंकारप्रणित जिल्हा परिषद कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी ५ ऑगस्टपासून संपावर जाणार असून, तशी नोटीस रीतसर राज्य सरकारला पाठविण्यात आली आहे. संपात जिल्ह्य़ातील कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के व सचिव एम. पी. कचरे यांनी दिली.सहाव्या वेतन आयोगासाठी केंद्र सरकारप्रमाणे घरभाडे, प्रवास व इतर भत्ते मिळावेत, वेतन आयोगाची केंद्राप्रमाणे थकबाकी मिळावी, पाच दिवसांचा आठवडा, कालबद्ध पदोन्नती, महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती व बाळाच्या काळजीसाठी रजा मिळावी या व इतर २९ मागण्यांसाठी संप होणार आहे.

नवीन नावनोंदणीबाबत पदवीधरांना आवाहन
श्रीरामपूर, २५ जुलै/प्रतिनिधी
नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदारांची नवीन नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. तरी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील पदवीधरांनी विहित नमुन्यातील अर्ज ३१ जुलैपर्यंत तहसील कार्यालयात भरून द्यावेत, असे आवाहन आमदार जयंत ससाणे यांनी केले. नावनोंदणीचे अर्ज विनामूल्य संपर्क कार्यालयात उपलब्ध केले असून, त्यासोबत सन २००६ पूर्वीचे पदवी प्रश्नप्त केलेले प्रमाणपत्र, तसेच शिधापत्रिका अथवा वास्तव्याचा पुरावा जोडणे आवश्यक असल्याचे ससाणे यांनी सांगितले.

पढेगाव रस्त्यासाठी रविवारी रास्ता रोको आंदोलन
कोपरगाव, २५ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून जाणाऱ्या कोपरगाव, पढेगावमार्गे वैजापूर रस्त्याची दुर्दशा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याचे काम दि. २६ जुलैपर्यंत सुरू न केल्यास त्या दिवशी सकाळी १० वाजता पढेगाव, कासली, शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, उक्कडगाव, गोधेगाव परिसरातील लोकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद केशवराव भवर यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे.रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, खडीचे गंज गेल्या सहा महिन्यांपासून पडल्याने वाहनांसह पादचारी मुलांना चालता येत नाही. कोपरगाव-वैजापूर एस. टी. बसगाडय़ा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

‘फूडपार्कमुळे औद्योगिक विकासाला चालना’
श्रीरामपूर, २५ जुलै/प्रतिनिधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औद्योगिक वसाहतीत फूडपार्क करण्याची घोषणा केल्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा दावा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी केला. मुख्यमंत्री चव्हाण उद्योगमंत्री असताना त्यांच्या हस्ते रामराव आदिक सामायिक सुविधा केंद्राचे उदघाटन झाले. त्याप्रसंगी त्यांनी पाणीयोजना, रस्ते, वीज, निवासी क्षेत्राच्या मागण्या मान्य केल्या. तसेच ८० एकर क्षेत्रात फूड पार्क उभारण्याची घोषणा केली होती. फूड पार्कमुळे नवीन उद्योग शहरात येतील, तसेच माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांचे स्वप्न साकार होईल, असे त्यांनी सांगितले.

‘पाडळी दर्या बस सुरू न झाल्यास आंदोलन’
निघोज, २५ जुलै/वार्ताहर

पारनेर एसटी आगाराने पाडळी दर्या येथील बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बस पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या महेबूब इनामदार यांनी दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पारनेर आगाराने रस्त्याचे काम सुरू असल्याचे कारण देत ५ ते ६ गाडय़ा बंद केल्या. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होऊन आठ दिवस झाले. तरीही बसगाडय़ा सुरू झाल्या नाहीत. बसअभावी पारनेर, शिरूर येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. निघोज, वडझिरे, देवीभोयरे, कान्हूरपठार येथील विद्यार्थ्यांचीही अडचण झाली आहे. व्यापारी, तसेच शेतकऱ्यांनाही माल बाजारपेठेपर्यंत नेणे जिकिरीचे झाले आहे. संबंधितांच्या शिष्टमंडळाने आगारप्रमुखांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या, तरीही बसगाडय़ा पूर्ववत झाल्या नाहीत.याप्रश्नी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल झावरे, युवकचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.

जय आनंद महावीर युवक मंडळाच्या अध्यक्षपदी मुनोत
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश मुनोत यांची फेरनिवड करण्यात आली. मंडळाच्या वार्षिक बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी अशी - सचिव अमित गांधी, उपाध्यक्ष मनोज गुंदेचा, गणेश गुंदेचा, विनोद भंडारी, संतोष कासवा, कार्याध्यक्ष बाळू मुनोत, अभय लोढा, अजित गांधी, बाबालाल गांधी, खजिनदार अभय पितळे, सहखजिनदार सुरेश गांधी, सहसचिव मनोज बोरा, उत्सव समिती सदस्य सत्येन मुथा, प्रमोद डागा, योगेश मुनोत, मनीष गुगळे, सचिन कोठारी, ललित बनभेरू, लाभेश कासवा, संजय ओस्तवाल, सदस्य गौरव फिरोदिया, अमित पोखरणा, नीलेश पोखरणा, धरमचंद भंडारी, राहुल मुनोत, दिनेश भंडारी, बाळू चंगेडे, आनंद मुथा, मनोज चव्हाण, कुंतीलाल रांका, महेश गुगळे, प्रकाश गांधी, विजय मुथा, संतोष गांधी, अभय बोरा, धरम चोरडिया, अशोक उपाध्ये, नीलेश गांधी, रोशन गांधी, प्रवीण भंडारी, सुनील नाळके, दीपक कातकडे, प्रसिद्धीप्रमुख हेमंत मुथा.

‘आनंद गॅस एजन्सीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
ग्राहकांची लूट करणाऱ्या वैदूवाडी (पाईपलाईन रस्ता) येथील भारत पेट्रोलियमच्या आनंद गॅस एजन्सीला पाठिशी घालणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन त्यांच्या कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यापूर्वीही आनंद गॅस एजन्सीबद्दलच्या तक्रारी कळविण्यात आल्या होत्या. व्हीडीओ चित्रणही सादर केले. एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र, काहीही कारवाई करण्यात आली नाही. ग्राहकांची लूट सुरूच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.एजन्सीची चौकशी व्हावी; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष नीलेश म्हसे, शहर संघटक विकास बेरड, निखीलकुमार, अजय थोरात, योगेश दिवाने आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नगरला ९ ऑगस्टपर्यंत मनोरंजन नगरी
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
पाईपलाईन रस्त्यावरील यशोदानगर येथे मनोरंजन नगरी उभारण्यात आली आहे. दि. ९ ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी ती खुली राहणार आहे.मनोरंजन नगरीत टोरा टोरा, ब्रेक डान्स, ड्रॅगन राईड, कोलंबस, हँगिंग, ग्लाईडर, फ्रीज, स्विंच चेअर, जिराफ राईड, होर्स एम.जी.आर., जिराफ ट्रेन, डोअर्स आदी २५ ते ३० खेळ आहेत. या शिवाय विविध उत्पादनांचे ५० ते ६० स्टॉल लावण्यात आले आहेत.रॅम्बो इंटर नॅशनलच्या वतीने विविध प्रकारचे प्रकल्प देशभरात चालविले जातात. त्याचाच मनोरंजन नगरी एक भाग आहे. त्याचा फायदा नागरिक, ग्राहकांनी करून घ्यावा असे आवाहन मनोरंजन नगरीचे व्यवस्थापक जॉन मॅथ्यू यांनी केले.

दलितवस्ती पाणी पुरवठय़ासाठी समिती
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
दलितवस्ती पाणीपुरवठा योजना अंमलबजावणी महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत दलित वस्त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक, महिला दलित प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, युवक, अशासकीय प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. नगरच्या समितीत पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम (सचिव), शैला कदम, प्रशांत बन्सी नन्नवरे, नित्यानंद प्रेमानंद कांबळे, शामवेल उत्तमराव भिंगारदिवे यांचा समावेश आहे. यात दलितवस्ती असलेल्या प्रभाग २३, २४, २५, २९, ५१, ५६, ६१, ६२च्या नगरसेवकांचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

सूरदास विद्यालयातर्फे आज गायन-वादनाचा कार्यक्रम
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
सूरदास संगीत विद्यालयाच्या वतीने उद्या (रविवारी) गुरुपौर्णिमा उत्सव-२००९ तथा पंडित विष्णू दिगंबर पलूसकर आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे जयंती सोहळ्यानिमित्त गायन-वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्रधानाचार्य रघुनाथ केसकर यांनी दिली. सायंकाळी साडेपाच ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. म. ना. बोपर्डीकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रश्नंताधिकारी महेश पाटील उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात डॉ. अश्विनी वळसंगकर, डॉ. संध्या जोशी (सोलापूर), पंडित भालचंद्र टिळक (मुंबई), संगीत अलंकार डॉ. हेरंबराज पाठक (अक्कलकोट), दादासाहेब पाटील (मोडनिंब) हे आपली कला सादर करणार आहेत.

तक्षशिला विद्यालयातर्फे डीएसपी कार्यालयात वृक्षारोपण
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
तक्षशिला विद्यालयातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उपअधीक्षक सुहास राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयाच्या १००व्या दिवशी आनंदोत्सव आयोजित करण्यात आला होता. नगर-जामखेड रस्त्यावर सुमारे १० कोटी खर्च करून ही आधुनिक शाळा उभारण्यात आली आहे.प्रश्नचार्य रश्मी सिंग यांनी स्वागत केले. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपअधीक्षक राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी १०० झाडे लावण्यात आली. या प्रसंगी नागेश पाठक, पोलीस निरीक्षक निकम, भगवाने, मन्सूर सय्यद, जमाल शेख आदी उपस्थित होते.

रेल्वेत बेशुद्धावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा मृत्यू
नगर, २५ जुलै/प्रतिनिधी
रेल्वेत बेशुद्धावस्थेत आढळलेल्या बेवारस पुरुषाचा उपचार चालू असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. काल रात्री ४५ वर्षाची ही व्यक्ती एका रेल्वेगाडीत आढळली. या व्यक्तीच्या छातीवर व पोटावर जळाल्याच्या खुणा आहेत.

राधाबाई इंगळे यांचे निधन
नगर,२५ जुलै/ प्रतिनिधी
नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील राधाबाई तात्याभाऊ इंगळे यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुले, मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. उपसरपंच मधुकर इंगळे यांच्या त्या मातुश्री होत.