Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

सिडको वसाहतींमध्ये ‘फील गुड’ फॅक्टर सिडको
जयेश सामंत

नवी मुंबईत सिडकोने उभारलेल्या वसाहतींमध्ये पुन्हा एकदा फील गुड फॅक्टरचे वारे वाहू लागले आहेत. या वसाहतींमधील पाण्याच्या तसेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या महापालिकेने बदलून द्याव्यात, अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी होती. सिडकोने ३०-३५ वर्षापूर्वी टाकलेल्या या वाहिन्या गंजून गेल्याने बहुतांश वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, सांडपाण्याच्या टाक्या तुंबणे अशा तक्रारी नित्याच्या बनल्या होत्या. ही कामे करण्यास आवश्यक असा निधीही या वसाहतींमधील रहिवासी संघटनांकडे नव्हता.

पांडवकडय़ाचे महाभारत!
अनिरुद्ध भातखंडे

अवचित भुरभुरणाऱ्या सरी आणि ऊनसा वलीचा अजब खेळ दाखविणारा श्रावण नुकताच दाखल झाला आहे. रिमझिम, सुखावणारा पाऊस हे या महिन्याचे वैशिष्टय़; परंतु निसर्गचक्रच फिरल्याने श्रावणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पर्यावरणाच्या समतोलाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असली तरी या पावसामुळे पाणीकपातीचे संकट दूर होणार असल्याने तो स्वागतार्हच आहे. मेघदूताच्या वर्षावामुळे धुंद झालेल्या निसर्गराजाची श्रीमंती वाढली आहे. निसर्गाची विविध रूपे अनुभवण्यासाठी तरुणांची टोळकी डोंगरदऱ्यांमध्ये फिरून, धबधब्यांखाली मनसोक्त भिजून मौज लुटतात.

नवी मुंबईत आता सागरी आतिथ्य अभ्यासक्रम
मधुकर ठाकूर

जहाज उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्यांना आता चांगल्या संधी उपलब्ध आहेत. सागरी क्षेत्रात देशातील १०० वर्षे जुनी असलेली ट्रेनिंग शिप रेहमान (टीएस रेहमान) या संस्थेने मुंबई विद्यापीठांतर्गत सागरी आतिथ्य अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे. येत्या ऑगस्ट २००९ पासून या अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. जागतिक स्तरावर सागरी क्षेत्रात अनेक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत, मात्र देशातील अग्रेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई क्षेत्रातील या संस्थेने सर्वप्रथम अभ्यासक्रम सुरू करण्याचा बहुमान पटकावला आहे.

तुर्भेकर भोगतात नरकयातना
विजय भोर

नवी मुंबईतील तुर्भे विभाग म्हटले की, शहरातील अन्य नगरांपेक्षा कमी दर्जा असलेला विभाग म्हणूनच याकडे पाहिले जाते. तुर्भे म्हणजे स्लम असे जणू सूत्रच बनून गेले आहे. त्यामुळे नेहमीच या विभागाला अन्य विभागांपेक्षा सोयी-सुविधांबाबत सापत्नभावाची वागणूक दिली जाते. या विभागातील झोपडपट्टी भाग ठाणे-बेलापूर रस्त्याच्या पूर्वेला असून, पश्चिमेला सिडकोने बांधलेली अल्प उत्पन्न गटांसाठीची घरे आहेत; मात्र या दोन्ही ठिकाणी फेरफटका मारला असता सिडकोची गृहनिर्माण योजनाच जणू काही २१व्या शतकातील आधुनिक झोपडपट्टी असावी, असा भास निर्माण होतो. १९७२ला सिडकोच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये तुर्भे सेक्टर २०, २१, २४ निर्माण करून या ठिकाणी चार भिंती व त्यावर पत्रा अशा स्थितीत गृहप्रकल्प साकारले गेले. त्याकाळी सहा हजारांत ही घरे मिळाली होती. यापैकी से. २१ व से. २० हा भाग समुद्रसपाटीपासून खाली वसविण्यात आला आहे. या ठिकाणी रस्ते व गटारांपेक्षा दोन ते चार फूट खाली फेज-१ व २ यांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरांचे शिल्पकार म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चुकीचे नियोजन (आराखडे) करून तुर्भे नोडची बांधणी केल्याचा साक्षात्कार त्यांना केव्हाचाच झाला आहे. आता या चुकीची शिक्षा भोगत आहेत येथील रहिवासी. गेल्या २८ वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात या क्षेत्राला झोपडपट्टीपेक्षाही वेगळे रूप येते. थोडा वेळ पाऊस पडला तरी या वसाहतीमध्ये जमिनीखालून पाणी घरात येते. तसेच रस्ते उंचावर असल्याने त्यावरील सर्व पाणी सखल भागात म्हणजेच थेट येथील रहिवाशांच्या घरात शिरते. असा एकही पावसाळा गेला नाही की, त्यातील काही दिवस व रात्री घरात पाणी शिरते म्हणून येथील रहिवाशांनी रात्र जागून काढली नाही. प्रत्येक पावसाळ्यात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी येऊन स्थानिकांच्या घरातील वापराच्या वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. म्हणजे मुंबईकरांनी अनुभवलेला २६ जुलै २००६चा पावसाळा तुर्भेकरांच्या नेहमीच पाचवीला पूजलेला आहे. गेल्या २८ वर्षात येथील रहिवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊनही भरपाईपोटी शासनाकडून फुटकी कवडीही या स्थानिकांच्या पदरी पडलेली नाही. तुर्भेकरांची ही शोकांतिका म्हणावी की, राजकारण्यांची अकार्यक्षमता, हा शोधाचा विषय ठरेल. थोडय़ाशा पावसामुळे सुद्धा येथील सखल भागात पाणी साचून जनजीवन किमान दोन ते तीन दिवस पूर्णपणे विस्कळीत होते.असे असतानाही नवी मुंबई महापालिकेमार्फत येथील रहिवाशांच्या जखमेवर जणू काही मीठ चोळण्याचा प्रकार प्रशासनाकडून केला जात आहे. पालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन पुस्तिकेत सखल भागात पाणी साचण्याच्या यादीत मात्र सेक्टर २० व २१ या क्षेत्राचा उल्लेखच करण्यात आलेला नाही.
(पूर्वार्ध)