Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

राज्य

वायूगळतीमुळे काटई ग्रामस्थांचा उद्रेक
खा. टावरे यांना घेराव तीन गावांत बंद
भिवंडी, २५ जुलै/वार्ताहर

काटई ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडला विरोध करीत काटई, खोणी व तळवलीच्या गावकऱ्यांनी महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडय़ा अडवून कडकडीत बंद पाळला. काटई येथील महानगरपालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात क्लोरीन वायूची गळती होऊन १६ जणांना लागण झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेकडे पालिका लोकप्रतिनिधी आणि शासनाने पाठ फिरवल्याने त्याचा आज उद्रेक झाला. मलनिस्सारण केंद्राच्या उर्वरित १२ एकर जागेवर महापालिकेने गेल्या आठ वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंड सुरू केले आहे. या डम्पिंग ग्राऊंडला विरोध करीत काटई, खोणी, तळवली येथील गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. या डम्पिंग ग्राऊंडवरील दरुगधी आजूबाजूच्या परिसरात पसरून रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे.

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना लोकमान्य टिळक पारितोषिक
पुणे, २५ जुलै/प्रतिनिधी

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे लोकमान्य टिळक पारितोषिक केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. लोकमान्य टिळक यांच्या ८९व्या पुण्यतिथीनिमित्त येत्या १ ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या समारंभात हे पारितोषिक दिले जाणार आहे. समाज आणि राष्ट्रासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तीला हे पारितोषिक देऊन गौरविले जाते. सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नऊ गोदामांतून जप्त केलेली सुमारे ६२ कोटी रुपयांची साखर बेकायदा
कोल्हापूर, २५ जुलै / विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गतसप्ताहात ९ गोदामांतून जप्त केलेली सुमारे ६२ कोटी रुपयांची साखर बेकायदा ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे ही साखर विकून संबंधित रक्कम न्यायालयात जमा करण्याच्या हालचालींना वेग आला असून येत्या सप्ताहातच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘सिमी’ कार्यकर्त्यांजवळ सापडले महत्त्वपूर्ण नकाशे?
अकोला, २५ जुलै / वार्ताहर

कार्यकर्त्यांजवळ विदर्भ व मराठवाडय़ातील काही महत्त्वाच्या ठिकाणांचे भौगोलिक नकाशे सापडल्याची माहिती दिली. घातपात घडवून आणण्याचा कट, संघटनाच्या कार्यकर्त्यांकडून रचल्या जात असल्याच्या संशयाला यामुळे बळकटी मिळाली आहे. माना येथील सिमी संघटनेच्या बैठकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपैकी ८ कार्यकर्ते पोलिसांनी पकडले आहेत. बैठकीत ३० ते ३५ कार्यकर्ते सहभागी झाले असावेत, अशी पोलिसांची माहिती आहे. माना येथील सिमीच्या बैठकीची चौकशी करण्यासाठी ‘एटीएस’चे पथकही परिसरात दाखल झाले आहे.

‘त्या’ निर्णयाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकरवी निषेध
नाशिक, २५ जुलै / खास प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाच्या नाशिकमुक्कामी झालेल्या बैठकीत वाइन विकास धोरणाच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय नव्हता. तथापि, काही उत्साही नेत्यांनी जाहिरातबाजी करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याची दिशाभूल केली. वास्तवत: सदर निर्णयामुळे शेतकऱ्यांची फसवणूकच झाली असून त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे पत्रक अनेक शेतकऱ्यांनी येथे प्रसिद्धीस दिले आहे.

मनोहर जोशींच्या वक्तव्यामुळे शेकापमध्ये खळबळ
उरण, २५ जुलै/वार्ताहर

रायगडमध्ये शिवसेना-भाजप-शेकाप अशी युती असताना शेकापने उरण विधानसभेसाठी परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नसल्याची टीका शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शनिवारी उरण येथे आयोजित सेनेच्या मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी पत्रकार परिषदेतून केली. जोशी यांच्या टीकेमुळे शेकापमध्ये खळबळ माजली आहे. जेएनपीटी टाऊनशिपमधील सभागृहात शिवसेनेचे उरण विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मेळाव्यास खासदार गजानन बाबर, जिल्हाप्रमुख बबन पाटील, आमदार देवेंद्र साटम तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

अपक्ष आमदार कॉंग्रेसकडून लढण्यास तयार- हर्षवर्धन पाटील
पुणे, २५ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील आघाडी सरकारमध्ये असलेल्या अपक्ष आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून लढण्यास तयार असून, पक्षातील काही नेत्यांनीही त्यास तयारी दर्शविली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिली. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सध्या अपक्ष आमदारांच्या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसकडे १२ अपक्ष आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सात अपक्ष आमदार आहेत. पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने या अपक्ष आमदारांना पक्षाकडून निवडणुकीत उभे करण्याच्या जोरदार हालचाली सध्या सुरू आहेत. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, पक्षाकडून निवडणूक लढविण्याबाबत अपक्ष आमदारांचा कल आहे.

मंत्रिमंडळ बैठकीसमोर आत्मदहन करणाऱ्या सुरेश शेजवळचे अखेर निधन
नाशिकरोड, २५ जुलै / वार्ताहर

पोलिसांकरवी अन्याय झाल्याच्या निषेधार्थ मंत्रीमंडळ बैठकीप्रसंगी स्वत पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील सुरेश प्रल्हाद शेजवळ या तरूणाचे आज सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करावे अशी मागणी करून मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. राज्य मंत्रीमंडळाची बैठक गेल्या गुरूवारी गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असताना या परिस्थतीत शेजवळने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो सुमारे ३५ टक्के भाजला होता. बंदोबस्तावरील उपस्थित पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. या प्रकारास कारणीभूत असलेल्या नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुदाम वाळके यांना त्वरित निलंबित करावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.