Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

क्रीडा

संगकारा ‘ऑन टॉप’
आयसीसी क्रमावारीत गंभीरला मागे टाकून संगकारा अव्वल
दुबई, २५ जुलै/ पीटीआय

फक्त दहा दिवस आयसीसी क्रमवारीच्या अव्वल स्थानावर विराजमान झाल्यावर आज भारताचा सलामीवीर गौतम गंभीरला श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने पायउतार केले आहे.
पाकिस्तानविरूद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात संगकारा संघाचा तारणहार ठरला होता. त्याच्या नाबाद १३० धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेला सामना वाचविण्यात यश आले होते. या खेळीमुळे त्याला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला होता. पाकिस्तानची ‘रनमशिन’ ठरलेला युसूफ मोहम्महला मागे सारून गंभीरने कसोटी फलांदाजाचे अव्वल स्थान पटकाविले होते. पण म्फक्त दहा दिवसानंतरच संगकाराने त्याच्याकडून अव्वल स्थान हिरावून घेतले आहे.

गांगुली पुन्हा होऊ शकतो कोलकाता संघाचा कर्णधार
नवी दिल्ली, २५ जुलै/ वृत्तसंस्था

जॉन बुकॅनन यांच्या बहुकर्णधार ‘थिअरी’मुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या सत्रातून कोलकाता नाइट राडर्सचा कर्णधार सौरव गांगुलीला कर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले होते आणि त्याचा काहिसा फटका संघालाही बसला होता. पण गांगुलीसाठी ‘दुख भरे दिन’ बित गए है, असे वाटत आहे. कारण सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बुकॅनन यांची जागा न्यूझीलंडच्या जॉन राईट यांना देण्यात येणार असून गांगुलीला कर्णधारपद पुन्हा देण्यात येणार आहे.

गांगुलीबरोबर बीसीसीआयने कधीच भेदभाव केला नाही- शुक्ला
नवी दिल्ली, २५ जुलै/ वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)माझ्याबरोबर भेदभाव केला अशी टिका भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने काही दिवसांपूर्वी केली होती. पण आज मंडळाने त्याच्या टिकेला प्रत्यूत्तर दिले आहे. गांगुली बाबत कोणताही पूर्वग्रह नव्हता आणि त्यामुळे त्याच्याबरोबर कोणताही भेदभाव केला नाही, असे मत बीसीसीआयचे वित्त आणि प्रसारमाध्यम समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज मांडले आहे.

अ‍ॅशेस राऊंडअप
खेळपट्टीचे टेन्शन नाही- पॉन्टिंग
लंडन, २५ जुलै / पीटीआय

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी येथील एजबस्टन मैदानावर होणार असली तरी बर्मिगहॅम शहरात गेले १२ दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने मैदान जेलीप्रमाणे झाले आहे. अशा वातावरणात कसोटीसाठी खेळपट्टी तयार करणे शक्यच नसल्याचे मत ग्राऊंड्समन स्टीव्ह रोझ यांनी काल व्यक्त केले होते. पण खेळपट्टी कशीही असली तरी त्याचे टेन्शन घेणार नाही. कारण वेगवेगळ्या परिस्थीतीसाठी आमच्याकडे वेगवेगळी रणनिती असल्याचे आज ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग याने स्पष्ट केले आहे.

अ‍ॅशेस मालिका खेळण्याची लॅंगरची इच्छा
लंडन, २५ जुलै, वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टीन लॅंगर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन अ‍ॅशेस मालिकेत खेळण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विद्यमान सलामीवीर फिल ह्य़ुजेस याला आपल्या स्थानाची चिंता लागून राहिली आहे.
३८ वर्षीय जस्टीन लॅंगर याने दीड वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. लॅंगरची फलंदाजी शैलीदार नव्हती. मात्र तो खेळपट्टीवर नांगर टाकण्यासाठी प्रसिद्ध होता.

जॉन्सनने मनाचे ऐकावे- मॅग्रा
लंडन, २५ जुलै/ पीटीआय

‘टू मेनी कूक स्पॉईल द सूप’ अशी एक म्हण प्रचलित आहे आणि तेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. जॉन्सनला सध्या सल्ले देणारे भरपूर आहेत, पण जर त्याला पुढे जायचे असेल तर त्याने त्याचा मनाचे ऐकावे, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राने आज व्यक्त केले आहे. मॅग्रा हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलेला आहे. त्याच्या नावावर ५६३ विकेट्स आहेत.

आयटीएफ टेनिस स्पर्धेत सानिया उपान्त्य फेरीत
नवी दिल्ली, २५ जुलै/पीटीआय

भारताची सानिया मिर्झा हिने आयटीएफ टेनिस स्पर्धेत आज एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. ही स्पर्धा लेक्झिंगटन (अमेरिका) येथे सुरु आहे. सानियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत लिंडसे ली-वॉटर्सने दुखापतीमुळे माघार घेतली, त्या वेळी द्वितीय मानांकित सानियाने पहिल्या सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेतली होती. सानियाने परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग करीत एक सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला होता. तसेच तिने वेगवान सव्‍‌र्हिसचा उपयोग केला. सानियाला उपांत्य फेरीत सहाव्या मानांकित मेग युहान (चीन) हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. युहान हिने उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकित मेडिसन ब्रेंगल हिच्यावर ६-३, ६-३ असा विजय नोंदविला. जागतिक क्रमवारीत युहानला १९५ वे स्थान आहे.

वरिष्ठ खेळाडूंना काढून टाकले पाहिजे- कादीर
कराची, २५ जुलै, वृत्तसंस्था

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागल्याबदद्ल पाकिस्तान संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना काढून टाकले पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया पाकिस्तान निवड समितीचा माजी अध्यक्ष अब्दुल कादीर याने व्यक्त केली आहे. जे खेळाडू चांगली कामगिरी करीत नाहीत त्यांच्या जागी स्थानिक स्पर्धात यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना तातडीने संधी दिली पाहिजे, असे कादीर याने एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्याने या मुलाखतीत सांगितले की, निवड समितीचा प्रमुख असताना आपण अपयशी ठरलेल्या वरिष्ठ खेळाडूंच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण आखले होते. मात्र पाकिस्तान मंडळ वरिष्ठ खेळाडूंना हात लावण्याचे धैर्य दाखवू शकले नाही.

फूटप्रिंट्सचा अनोखा उपक्रम
मुबंई, २५ जुलै/ क्री. प्र.

गरजू खेळडूंना चांगले शूज मिळवेत यासाठी फूटप्रिंट्स या संस्थेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी तुमच्याकडे जर तुम्हाला नको असलेले शूज असतील तर ते फूटप्रिन्टस या संस्थेकडे जमा करा. ते शूज ही संस्था दुरूस्त करून गरजू खेळाडूंना देते. उद्या (२६ जुलै) जुहु, शिवाजी पार्क, फाईव्ह गार्डन आणि मरीन ड्राईव्ह येथे तुम्ही तुमचे शूज देऊ शकता. त्याचबरोबर पुढच्या रविवारीसुद्धा (२ ऑगस्ट) तुम्ही तुमचे शूज देऊ शकता. अधिक माहितीसाठी करिश्मा गुप्ते यांच्याशी ९८२००४२०९८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

आज कांगा लीग नाही
मुंबई, २५ जुलै/ क्री. प्र.

पावसामुळे उद्या होणारी कांगा लीग रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या ( एमसीए) डॉ. एच. डी. कांगा लीगच्या सहसमितीचे सचिव विनोद देशपांडे यांनी दिली आहे. पावसामुळे खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य नसल्याचे एमसीएने पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भारतीय तिरंदाज परतले स्वाईन फ्लू घेऊनच
नवी दिल्ली २५ जुलै/पीटीआय

सिंगापूर येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ गट धनुर्विद्या स्पर्धेहून परतलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकातील चार खेळाडूंना स्वाईन फ्लू झाले असल्याचे आज येथे सांगण्यात आले. या स्पर्धेत भारतीय संघात ३० हून अधिक खेळाडूंचा समावेश होता. २२ जुलै रोजी रात्री हे खेळाडू येथे परतल्यानंतर विमानतळावरच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या वेळी संघातील चार खेळाडूंना स्वाईन फ्लूची बाधा झाली असल्याचे दिसून आले. त्यांना तत्परतेने राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडले जाईल अशी माहिती भारतीय धनुर्विद्या महासंघाचे सरचिटणीस अरुणकुमार विज यांनी दिली.