Leading International Marathi News Daily

रविवार, २६ जुलै २००९

विविध

मुंबईवरील दहशतवादी हल्ला
पाच अतिरेक्यांवरील पाकमधील खटल्याची सुनावणी लांबणीवर
इस्लामाबाद, २५ जुलै/पीटीआय

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या लष्कर-ए-तैय्यबाच्या पाच अतिरेक्यांवरील खटल्याची सुनावणी दहशतवादविरोधी न्यायालयाने बचाव व फिर्यादी पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर २९ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकली. रावळपिंडीतील कडेकोट सुरक्षा असलेल्या अडिआला जेलमध्ये न्यायमूर्ती बाकिर अली राणा यांच्या न्यायालयात लष्कर-ए-तैय्यबाचा ऑपरेशन कमांडर झाकीऊर रहमान लखावी, झरार शहा, अबु अल कामा, हमाद अमिन सादिक, शहीद जमील रियाज यांच्यावर खटला सुरू आहे.

अल काईदा व तालिबान अण्वस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात
वॉशिंग्टन २५ जुलै/पीटीआय

अल काईदा व तालिबानचे दहशतवादी अण्वस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने आज येथे सांगितले. जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन माईक म्युलेन यांनी सांगितले की, अल काईदा व तालिबान या दहशतवादी संघटना अण्वस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत व त्यांचे हे प्रयत्न अतिशय खुलेआमपणे चालू आहेत. लोकांना धमकावण्यासाठी जास्तीत जास्त अमेरिकी व पाश्चिमात्य लोकांना ठार करणे हा त्यांचा हेतू आहे.

अमेरिकी लष्करी मदत पाकिस्तानने तालिबान व अल-काईदाविरोधातच वापरावी
अमेरिकेच्या स्पष्ट सूचना
वॉशिंग्टन, २५ जुलै /पी.टी.आय.

अमेरिकेच्या सीनेटने आपल्या सुरक्षा अर्थसंकल्पात ६८० अब्ज डॉलरची तरतूद पाकिस्तानला देणात येणाऱ्या मदतीसाठी केली आहे. मात्र ही लष्करी मदत केवळ अल-काईदा व तालिबान्यांविरोधात लढण्यासाठीच वापरावी, असेही सीनेटने स्पष्ट केले आहे. अमेरिकेकडून मिळणारी ही लष्करी मदत भारतविरोधात तयारीसाठी वापरली जाईल अशी भीती व्यक्त करण्यात येते, या पाश्र्वभूमीवर संबंधित विधेयक पारित करताना काल शुक्रवारी त्यात ही मदत पाकिस्तानने अल-काईदा व तालिबानींविरोधात युद्धासाठी वापरावी, अशी अटच टाकण्यात आली.

संयुक्त निवेदनातील मुद्दय़ांची आमच्याकडे योग्य उत्तरे आहेत - पंतप्रधान
नवी दिल्ली, २५ जुलै/पीटीआय

इजिप्तमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यातील चर्चेनंतर जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातील काही मुद्दय़ांमुळे भारतात बरेच वादळ उठले आहे. त्या निवेदनाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व शंकांची आमच्याकडे समर्पक उत्तरे असल्याचे पंतप्रधान डॉ. सिंग यांनी आज सांगितले. तसेच बुधवारी (२९ जुलै) याबाबत संसदेत निवेदन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मालमत्तेचे विवरण जाहीर न केल्यास न्यायमूर्तीच्या पदावर गदा येण्याची शक्यता’
चेन्नई, २५ जुलै/ पीटीआय

न्यायमूर्तीनी स्वत:च्या मालमत्तेचा तपशील सादर न करणे वा खोटा तपशील सादर करणे हे संबंधित न्यायमूर्तीचे गैरवर्तन समजून या कारणावरून त्यांना पदावरूनही हटवले जाऊ शकते असे भारताचे सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांनी सांगितले. चेन्नईत न्यायाधीश, न्यायमूर्तीसाठी बांधण्यात आलेल्या अतिथी भवनाचे उद्घाटन बालकृष्णन यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. न्यायमूर्तीच्या मालमत्तेसंदर्भातील प्रस्तावित विधेयकात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर करणे सक्तीचे आहे असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

स्वाईन फ्ल्यूचे ८०० बळी; ऑक्टोबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता
ह्य़ूस्टन, २५ जुलै/पीटीआय

जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूने जगभरात सुमारे ८०० जणांचा बळी घेतला आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या ‘ए(एच१एन१)’ या विषाणूची लागण झाल्याच्या पहिल्या नोंदी मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या विषाणूचा जगभर झपाटय़ाने प्रसार होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ग्रेगरी हर्टल यांनी असा इशारा दिला आहे की, उत्तर गोलार्धात या विषाणूचा प्रसार यंदाच्या हिवाळ्यात अधिक झपाटय़ाने होण्याची शक्यता आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशनच्या संचालक डॉ. अ‍ॅन शुचॅट यांनीही याला दुजोरा दिला आहे.आतापर्यंत १६० देशांमध्ये या विषाणूंचा प्रसार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४३,७७१ जणांना एच१एन१ विषाणूंची लागण झाल्याची आणि ३०२ जणांचा या रोगामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने लहान मुले आणि युवकांचा समावेश आहे. सध्या स्वाईन फ्ल्यूवरील लसीच्या ऑस्ट्रेलियामध्ये चाचण्या सुरू असून पुढील आठवडय़ापासून अमेरिकेतही चाचण्या सुरू होतील.