Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

अग्रलेख

संगीत-भास्कर
अपर्णा सेन या बंगाली दिग्दर्शिकेने ‘परोमा’ या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले, तेव्हा तिने सत्यजित राय यांना चित्रपटाचे संगीत करण्याचा आग्रह केला. त्यावर राय म्हणाले, ‘मी तुला

 

माझ्यापेक्षा चांगल्या संगीतकाराचे नाव सुचवतो- भास्कर चंदावरकर. पूर्ण लांबीच्या अशा पन्नासहून अधिक चित्रपटांना संगीत दिलेल्या भास्कर चंदावरकर यांनी भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताच्या अभ्यासकांमध्ये स्वत:ची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती, हे भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील रसिकांना विशेष माहिती नाही. मराठी, तेलुगू, कन्नड, उडिया, हिंदी आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमधील या चित्रपटांच्या संगीत-दिग्दर्शनाबद्दल त्यांना अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. चंदावरकर हे केरळबाहेरील दुसरे असे संगीतकार आहेत, की ज्यांना त्या शासनाचा सवरेत्कृष्ट संगीतकाराचा सन्मान प्राप्त झाला. मराठी लोकांसाठी त्यांचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आणि ‘सामना’ हा चित्रपट एवढी त्यांची ओळख आहे. पण भारतीय लोकसंगीत, लोकप्रिय संगीत आणि अभिजात संगीत यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या या संगीतकाराने जगातील अनेक संगीत परंपरांचा काळजीपूर्वक अभ्यास केला आणि त्याद्वारे आपले नवे सिद्धान्त मांडले. भास्कर चंदावरकर यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक मोठा अभ्यासक आणि व्यासंगी काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय संगीतकारांच्या स्पर्धामय जगात रमणारे कलावंत ते नसल्यामुळे त्यांनी जे संगीत केले, ते मुख्यत: स्वान्तसुखाय असे होते. सतार हे त्यांच्या हृदयाशी सर्वात जवळ असणारे वाद्य होते. त्या वाद्यामुळेच ऐन विशीत त्यांचे गुरू रविशंकर यांच्याकडे ते अमेरिकेत गेले खरे. पण तेथे त्यांच्या हातून पहिली मोठी कामगिरी झाली. स्टॅनली गार्डनर यांच्या ‘नाइन अवर्स टू राम’ या हॉलिवूडपटाचे संगीतरचनाकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या चित्रपटावर भारतात बंदी असल्याने तो येथे प्रदर्शित झालाच नाही. घरात संगीतमय वातावरण असल्यामुळे भास्कर चंदावरकर यांना संगीत शिकण्यासाठी घरात फारसे भांडण वगैरे करावेच लागले नाही. उलट त्यांच्या संगीताच्या प्रेमाला घरात सतत प्रोत्साहनच मिळत गेल्याने सतारवादनात आपण काहीतरी करायचे, या उमेदीने ते पंडित रविशंकर यांच्यापाशी गेले. रविशंकर यांनी त्यांना दिलेले संगीताचे ज्ञान त्यांना जेवढे मोलाचे वाटत असे, त्याहूनही त्यांनी संगीताची जी नजर दिली, ती त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची होती. गाण्यात भावना आणि बुद्धी यांचा जो अपूर्व संगम असावा लागतो, तो रविशंकर यांच्या सतारवादनात आहे, असे त्यांना वाटत असे. गुरू म्हणून त्यांनी कलेतील आध्यात्मिक प्रत (स्पिरिच्युअल क्वालिटी) शोधण्याचा जो प्रयत्न केला, तो चंदावरकर यांना नेहमी आकर्षित करणारा वाटत आला. सतारवादक म्हणून मैफली करत राहण्यापेक्षा संगीतात रचना करण्यात त्यांना विशेष रस होता. (संगीत- दिग्दर्शक आणि संगीत-रचनाकार या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत, असे ते नेहमी सांगत असत.) आपण संगीत-रचनाकार होणे हे आपल्या स्वभावधर्माशी आणि आपल्या कलात्मक अभिव्यक्तीशी अधिक जुळणारे आहे, यावर त्यांचा विश्वास होता. प्रत्येकाच्या आयुष्यात जशा त्याला वळण देणाऱ्या घटना घडत असतात, तशाच त्या चंदावरकर यांच्याही बाबतीत घडल्या आणि ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या छोटय़ा चित्रपटांचे संगीतकार म्हणून काम करू लागले. पुढे याच संस्थेत संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. ऋत्विक घटक यांच्यासारख्या ज्येष्ठ बंगाली दिग्दर्शकाच्या सहवासाने त्यांच्या कला-जीवनात जे बदल झाले, त्यांचा आवर्जून उल्लेख करणाऱ्या चंदावरकर यांनी संगीत हा आपल्या अभ्यासाचा विषय केला. लोकप्रिय संगीत हा तर त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय! आपले लोकसंगीत हे आपल्या शास्त्रीय संगीतापेक्षा फार वेगळे नसते. उलट शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांच्यामध्ये सतत काही देवाणघेवाण सुरू असते, त्यामुळे लोकसंगीतातून शास्त्रीय संगीतात आणि पुन्हा लोकसंगीतात असे सांगीतिक चक्र सुरू राहते. आपले आजचे लोकप्रिय चित्रपट संगीत शास्त्रीय संगीतातून चक्राकार फिरत फिरत आलेले आहे, असे त्यांचे म्हणणे असे. इतर कोणत्याही क्षेत्रात होणाऱ्या बदलांची गती संगीतातील बदलांपेक्षा अधिक असते. परंतु हे बदल समजून घेणे आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे हे काम संगीत सादर करणाऱ्या कलावंतांना आवडणारे नसते. जे कलावंत असे बदल घडून येण्यास कारणीभूत असतात, त्यांनाही त्याची फारशी कल्पना नसते. परंतु संगीताचा खरा अभ्यासक आपल्या विचक्षण नजरेने हे बदल टिपत असतो आणि त्याच्या परिणामांची चर्चा करत असतो. केवळ पुस्तकी संगीत येणाऱ्यापेक्षा संगीतातील कलात्मक सत्य शोधताना त्यातील सांगीतिक मन जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा चंदावरकर यांच्यासारखा कलावंत जेव्हा या सगळय़ा विचारांची आणि घडामोडींची उकल करू लागतो, तेव्हा संगीत ही केवळ रंजनात्मक गोष्ट नाही, याचे भान येते आणि कोणत्याही संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे, याची जाणीव होते. जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी केलेले सतारवादनाचे कार्यक्रम हे केवळ रंजन करण्यासाठी नव्हते, तर संगीताची परिभाषा उलगडून दाखवणारे होते. रविशंकर यांनी पाश्चात्त्य देशांतील संस्कृतीत सतार हे वाद्य लोकप्रिय केले, परंतु त्याचे संगीतातील स्थान आणि महत्त्व सांगण्याचे काम चंदावरकर यांनी केले. त्यामुळेच बांगलादेशच्या सांस्कृतिक धोरणाचा भाग म्हणून तेथील प्रयोगजीवी कलांबद्दलचा संपूर्ण आराखडा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. सुमारे सात वर्षे त्यांनी हे काम केले. तेथील रोमांचकारी अनुभव सांगताना त्यांनी एके ठिकाणी सांगितले होते, की तेथील रंगभूमीने तेथील लष्करी सत्ता उलथवून टाकण्यात फार मोठी कामगिरी बजावली होती. लष्करशहा एच. एम. इर्शाद सार्कसाठी कोलंबोला गेले, तेव्हा बांगलादेशातील रंगकर्मीनी तेथे अक्षरश: धुमाकूळ घातला. परिणामी इर्शाद मायदेशी परतले तेव्हा त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली. या सगळय़ा घटनांचे साक्षीदार असलेल्या चंदावरकर यांनी सांस्कृतिक जगाची खऱ्या अर्थाने वैश्विक सफर केली होती. संगीत ही एक गंभीर गोष्ट आहे आणि तिच्याकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर सतत चिंतन करून ही भूमिका मांडली. संगीतरचनाकार म्हणून केवळ नाटक आणि चित्रपट यांना संगीत देणे त्यांच्यातील प्रयोगशील कलावंताला पटणारे नव्हते. संगीत हे केवळ स्वरांच्या संदर्भातच ऐकायचे नसते, तर त्याला साहित्य, नाटक, नृत्य, लोकपरंपरा, या सगळय़ाचा संदर्भ असतो, असे त्यांचे मत होते. त्यामुळेच आरती प्रभू यांचे निधन झाल्यानंतर भास्कर आणि मीना चंदावरकर यांनी सादर केलेला ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम सत्तरच्या दशकात एक वेगळा प्रयोग म्हणून मानला गेला. भारतीय संगीत ऐकण्यासाठी श्रोत्यांची प्राथमिक तयारी असावी लागते, त्यामुळेच जगात भारतीय संगीताच्या प्रसारात अडथळे येतात, ही कोंडी फोडण्यासाठी चंदावरकर यांनी हे आव्हान स्वीकारून निर्माण केलेल्या सीडीच्या दहा लाख प्रती जगभर विकल्या गेल्या. त्यानंतरच्या आणखी एका अल्बमचा खपही तेवढाच झाला. भास्कर चंदावरकर यांचे निधन ही संगीतविष्टद्धr(२२४)वातच नव्हे, तर संपूर्ण कलाविश्वासाठी हळहळ वाटणारी घटना आहे. ‘माया दर्पण’, ‘अरविंद देसाई की अजीब दास्ताँ’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘थोडासा रूमानी हो जाय’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी दिलेले संगीत त्यांच्या नावावर असले तरी संगीताच्या दुनियेत त्यांची ओळख अभ्यासक संगीतकार अशीच राहिली. भारतीय संगीताबद्दल सखोल अभ्यास करून, त्यातील प्रयोगशीलतेच्या स्वानुभवावर इंग्रजी आणि हिंदीत उत्तम व्याख्यान देणाऱ्या फार मोजक्या संगीततज्ज्ञांमध्ये चंदावरकर यांचे स्थान फार वरचे होते.