Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

राजसाहेब..
गुणवंतांचा असा अपमान करू नका!

माननीय राजसाहेब,

बोर्डाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या पुण्यातील शेकडो मुला-मुलींना गेल्या आठवडय़ामध्ये सुखद धक्काच बसला. त्यांच्या घरचा दूरध्वनी खणखणला.. बोर्डाच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. आमचे नेते राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते तुमचा खास सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती करणाऱ्या दूरध्वनीने सारेच हुरळून गेले. युवावर्गामध्ये आपली लोकप्रियता आधीच वाढलेली. त्यातच आता आपल्या हस्ते दहावी-बारावीच्या यशाचे बक्षीस मिळणार होते!प्रत्यक्ष सत्काराच्या दिवशीची धांदल तर विचारूच नका. आई-बाबांनी खास सुटी घेतलेली. सारे कुटुंबच तय्यार होऊन आपल्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले होते. कोल्हापूर, मुंबई, सोलापूरहून आमचे आजी-आजोबा नि इतर नातलगही मोठय़ा उत्साहाने हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पुण्याला आले होते.

संक्रमण बोर्डाच्या परीक्षांचे
बोर्डाच्या परीक्षांमध्ये ८५-९० टक्क्यांची खैरात करण्याचे (छुपे) धोरण राबवून समस्त विद्यार्थिवर्गामध्ये ‘फीलगुड’ निर्माण करण्यात येत आहे. दुसरीकडे, बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ‘गोपनीय’ नसल्याचा निर्णय माहिती आयुक्तांनी दिल्यानंतर आता विद्यार्थी आणि तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधील आडपडदाही दूर होत आहे. अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षांचा ‘अहंभाव’ गळून पडणे स्वाभाविकच आहे. खरंच.. बोर्डाच्या परीक्षांचा बागूलबुवा दूर होतोय? गोपनीयतेची भिंत पडणे स्वागतार्ह असले, तरी गुणवत्तेचे होणारे अवमूल्यन दीर्घकालीन तोटय़ाचेच आहे. बोर्डाच्या या संक्रमणाविषयी.. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, म्हणजेच बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकण्याचा मान मिळाला, तरी कॉलर किती ताठ व्हायची!

‘ओपन बुक एक्झाम’
वाचकांचा शेरा

महाराष्ट्रात शालेय परीक्षा ‘ओपन बुक एक्झाम’पद्धतीप्रमाणे घ्याव्यात. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये सध्या ‘ओपन बुक एक्झाम’पद्धती प्रचलित आहे. या पद्धतीत विद्यार्थी परीक्षा कक्षात आपल्यास आवश्यक वाटेल ते पुस्तक व गाईड नेऊ शकतो. या पद्धतीमुळे परीक्षेसाठी संपूर्णपणे पाठय़पुस्तक पाठ करण्याची गरज भासत नाही. कुठल्याही परीक्षेचा मूळ हेतू विद्यार्थ्यांस पास वा नापास करण्याचा नसून, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे असा असतो. भारतात १० वी, १२ वी इयत्ता व त्यातील परीक्षा, त्यासाठी आवश्यक भासणारे कोचिंग क्लासेस व त्यानंतर कॉलेज अ‍ॅडमिशन या सर्वाचे महत्त्व अनावश्यक प्रमाणात वाढले आहे.

आरक्षणच जबाबदार का?
‘लोकसत्ता’मधील सदरामध्ये नेहा सोमाणी यांचे सीईटीच्या नावाखाली शिक्षणाचा बाजार नको, हे पत्र वाचले. सुरुवातीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यानंतर शेवटी त्या आरक्षणाच्या मुद्दय़ावर घसरल्याच. प्रत्येक अपयशासाठी आरक्षणाला दोष देण्याची जणू सवयच झाली आहे आणि जणू काही आरक्षण दिल्यामुळेच संपूर्ण शिक्षण क्षेत्राचा किंवा नोकऱ्यांचा दर्जा घसरला आहे, असा सूर यातून दिसतो. आरक्षणाबाबत ऊठसूट बोलणाऱ्यांना असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की, त्यांना खरोखर निश्चित माहिती आहे का, की आरक्षणामुळे कुणाला किती लाभ झाला आहे? कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसणारे व सामाजिक जाणीव नसणारेच आरक्षणाच्या विरोधात बोलत असतात असा अनुभव आहे. कुठलीही अधिकृत आणि संपूर्ण आकडेवारी न देता केवळ ऐकीव माहितीच्या आधारे अथवा एक-दोन अपवादात्मक उदाहरणे देऊन आरक्षणामुळे इतर समाजाचे किती नुकसान होत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. स्पर्धा ही बुद्धिमत्तेचीच असावी परंतु एक-दोन टक्क्यांचा फरक असला म्हणजे बुद्धिमत्ता ही खूप उच्च दर्जाची आहे किंवा खूप ढासळली आहे असा याचा अर्थ होतो का? मुळातच आरक्षित जागांसाठीही स्पर्धा इतकी तीव्र आहे की कमी टक्केवारी अथवा बुद्धिमत्ता असणाऱ्यांना स्थान मिळूच शकत नाही. त्यामुळे आरक्षण विरोधात जी काही उदाहरणे दिली जातात तीच मुळी चुकीच्या माहितीवर आधारित असतात असे मला वाटते. अपवाद असू शकतील. परंतु त्यामुळे कुठल्याही क्षेत्राचा दर्जाच कमी होतो असा नाही. दुसरा मुद्दा असा की, आरक्षणाचे कवच काढून घेतले तर केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर मागास अथवा आरक्षित जातीतील उमेदवारांची निवड मनापासून प्रामाणिकपणे केली जाईल का हा प्रश्न आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी केवळ स्वत:ला विचारावा. याच वेळी डोनेशन भरून अथवा पैशाचा वापर करून प्रवेश घेणाऱ्यांबद्दल कोणी काही बोलत नाही. भरमसाट डोनेशन देऊन प्रवेश घेणारे नंतर अचानक बुद्धिवान होतात का? त्यांच्यामुळे दर्जा खालावत नाही का? आरक्षण विरोध ही केवळ समाजाची नाही तर स्वत:ची फसवणूक आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी एक सहज सोपे हत्यार म्हणून आरक्षणाचा मुद्दा वापरला जातो.
राज ओहोळ , आशर इस्टेट, नाशिक रोड