Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

लोकमानस

जागो, ग्राहकराजा जागो
महागाई कशी कणाकणाने वाढते हे बघण्यासारखे आहे. वनदेवी छाप हिंग पावडर (५० ग्रॅम) डबीची रु. २८/- किंमत होती ती वाढवून आता त्यावर रु. २९ किंमत छापलेली आहे. हा १

 

रुपया कंपनीने का वाढविला? त्यांना विचारणार कोण? यातली आतली गोष्ट सांगतो- या हिंग डबीच्या किंमतीवर रु. ३ कमी होऊ शकतात. अर्थात हे ज्याला माहिती आहे तोच घासाघीस करून हे करू शकतो. बाकीचे एमआरपी छापील किंमत असेल ती देतात, (किंमत कमी होते हे त्यांना माहितीच नाही) अशा अनेक वस्तू, जिनसा आहेत ज्यांची किंमत एम.आर.पी.पेक्षा कमी होऊ शकते. काहीची मात्र किंमत अजिबात कमी होत नाही. खरं तर ग्राहक पंचायतीने अशा वस्तूंची यादी (व किंमत) बनवून ती प्रसृत केली पाहिजे. १५ रु.च्या चुरमुऱ्याचे पाकिट रु. १२/- ला मिळते. (छापील किंमतीपेक्षा ३ रु. कमी) खाद्यतेलांमध्ये तर किंमतीत (छापील किंमत व प्रत्यक्ष ग्राहकाला मिळणाऱ्या किंमतीत) प्रचंड तफावत आढळते, म्हणजेच यात खूपच नफा कमाविण्याची संधी उत्पादकांना असते. जेमिनी सूर्यफूल तेल- ५ लिटर डबा- पूर्वी त्यावर रु. ४५०/- एम.आर.पी. छापलेले होते. तो मला रु. ३७०/- ला इथल्या वाण्याने दिला. आता त्याची रु. ४००/- एम.आर.पी. आहे तर तो रु. ३५०/- पर्यंत मिळू शकतो. मग असा प्रश्न पडतो- ही अवाच्या सव्वा किंमत आपल्या उत्पादनावर उत्पादक का छापतात? त्यामुळे एम.आर.पी. हा फसवा शब्द आहे, त्याऐवजी मूळ किंमत (\exact price) उत्पादनावर लिहावी (स्थानिक कर धरून) त्यात काहीही घासाघीस होऊ नये.
ही वानगीदाखल तीन उदाहरणे दिली.
याशिवाय असंख्य सुटे जिन्नस- गूळ, साखर, डाळी, गहू, तांदूळ वगैरे- आहेत, ज्यावर किंमती लिहिता येत नाहीत, त्यांच्या किंमती वाणी सांगेल त्या घेतल्या व दिल्या जातात.
आठ, पंधरा दिवसांनी जावं तर तीच वस्तू (जी आधी कमी किंमतीला होती) दोन-तीन रुपयांनी महाग झाल्याचे दिसते. यावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही. (देरे वाण्या, घेरे वाण्या)
ग्राहकाला ग्राहकराजा संबोधन त्याची पद्धतशीर लुबाडणूक केली जाते. किंमती वाढवून मग त्यावर सूट (\discount) दिली जाते. \रआए लावले जातात. या भूलभूलय्यात ग्राहक फसतात. (‘एकावर एक फ्री’ हे त्याचे भावंडं) मॉलवाले सांगतात- आम्ही थेट शेतकऱ्याकडून, उत्पादकांकडून माल खरेदी करीत असल्याने स्वस्त देऊ शकतो. परंतु विजेचा झगमगाट, जागा, नोकरवर्ग यापायी प्रचंड खर्च होतो तो शेवटी ग्राहकाकडूनच वसूल केला जातो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तेव्हा ‘ग्राहकराजा, जागा राहा आपले हक्क जाणून घ्या, मालाची पावती घ्या व जपून ठेवा’ अशा पोकळ घोषणांनी ग्राहकाचा फायदा न होता वरील बाबतीत सुचविलेली उपाययोजना सरकार व ग्राहक पंचायतींनी अंमलात आणल्यास ग्राहकास न्याय मिळू शकेल.
अरविंद करंदीकर, तळेगाव-दाभाडे

अर्धवट किमतींचे कारण काय?
बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू अशा किमतीमध्ये उपलब्ध असावयास हव्यात की सदर किंमत प्रचलित नोटा-नाण्यांमध्ये देता आली पाहिजे. परवा घरगुती गॅस सिलेंडर घेतला व पावतीवर रु. ३१०.३६ अशी किंमत छापलेली पाहिली. वास्तविक माझी रु. ३१०.३६ द्यावयाची इच्छा होती; परंतु मी तसे करू शकत नव्हतो. कारण सुटे ३६ पैसे देण्यासाठी चलनामध्ये नाणीच उपलब्ध नाहीत. परिणामी मी रु. ३११/- दिले. तेव्हा मनात विचार आला की अशा प्रकारची किंमत छापणे योग्य व कायदेशीर आहे का? शिवाय मी नकळत काळ्या पैशांमध्ये ६४ पैशांची भर घातलीच. दररोज अशा प्रकारे लक्षावधी सिलेंडर्सचा व्यवहार होतो, किती काळा पैसा निर्माण होत असणार? अशाच प्रकारच्या किमती काही औषधे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींवर तसेच पंपावर पेट्रोल, डिझेलच्या किमतीही अशाच प्रकारच्या असतात. जी छापील किंमत प्रचलित नाण्यांमध्ये देणे शक्य नाही ती तशी छापणे योग्य व कायदेशीर आहे का?
कृष्णा केतकर, ठाणे

‘तू मारल्यासारखे कर..’
निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मिटला. ‘मार्ड’ने विद्यावेतनातील वाढीसहित आपल्या इतर बहुतांश मागण्या शासनाकडून मान्य करून घेतल्या. मात्र आठ दिवस गरीब रुग्णांना वेठीस धरून ‘मार्ड’ने काय साधले? विद्यावेतनात वाढ द्यायचीच होती तर सरकारने आठ दिवसांचा कालावधी का घेतला? डॉक्टरांना नोटिसा देणे, निलंबनाची कारवाई, पदव्युत्तर प्रवेश रद्द करणे, रजिस्ट्रेशन रद्द करणे हा कारवाईचा देखावा करण्याची काय गरज होती? ‘मार्ड’ने आपल्या मागण्यांसाठी संप करायचा, शासनाने कारवाईचे नाटक करायचे, दहा-बारा दिवस रुग्णांचे हाल झाले की शासनाने संपकरी डॉक्टरांपुढे लोटांगण घालायचे, हे नेहमीचेच झाले आहे. पत्रकार परिषदेत संबंधित खात्याचे मंत्री व मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी संप मिटल्याची घोषणा केली. त्याच वेळी ‘मार्ड’ने पुढील संप केव्हा करणार याचे वेळापत्रक जाहीर केले असते तर बरे झाले असते, म्हणजे यापुढे संप कालावधीत उपचारांच्या इतर पर्यायांचा विचार करता येईल व नियोजन करता येईल.
पद्माकर कांबळे, मुलुंड, मुंबई

सुरक्षाव्यवस्थेची गरजच काय?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे वगैरे नेत्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षाव्यवस्थेसंबंधातील खर्चाची त्यांच्याकडून वसुली करावी अशी सूचना लोकसभेत केली जाताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका यांच्याकडूनसुद्धा त्या संबंधातील खर्चाची वसुली केली जावी असा मुद्दा उपस्थित केला. लोकशाही राज्यव्यवस्थेत पंतप्रधान, मंत्री, खासदार, मुख्यमंत्री, आमदार तसेच विरोधी पक्षनेते स्वत:ला लोकनेते, जनतेचे सेवक म्हणवतात. जर ते जनतेचे सेवक, सर्वसामान्य जनतेचे नेते असतील तर त्यांना लोकांकडून कसला धोका संभवतो? हे नेते स्वत:साठी संरक्षणाची व्यवस्था करून जनतेला वाऱ्यावर सोडत असतात. जनतेचे रक्षक पोलीस या नेत्यांच्या संरक्षणव्यवस्थेत व्यस्त असल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची संख्या कमी पडते. त्यामुळेच दहशतवादी हल्ले होतात व त्यात सामान्य जनतेलाच जीव गमवावा लागतो. यासाठी लोकशाही राज्यव्यवस्थेत सर्वच राजकीय नेत्यांची सुरक्षाव्यवस्था रद्द करून संपूर्ण देशाच्या संरक्षणाची व्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे.
रमेश वेदक, घाटकोपर, मुंबई

दीर्घ आनंदाचा हेतू
‘लय’ या विश्वव्यापी विषयावर इतक्या साक्षेपी भाषेत लिहिणे व त्याचबरोबर या सूक्ष्म विषयावर इतक्या विस्तृतपणे लिहिणे हे दोन्हीही अवघड होते. ते मुकुंद संगोराम यांनी ‘लय’या लेखात उत्तमरीत्या साधले आहे. लयदार व्यक्तिमत्त्वे बोलायला लागली की ती सर्वाना आकर्षित करतात. त्यातही ती जर शब्दप्रभू असतील तर मग काय विचारता? भारतीय रागदारी संगीतात ‘ठाय’ किंवा ‘विलंबित’ लयीची विलक्षण व अद्वितीय कल्पना आहे. लांबवलेल्या दीर्घ आनंदाचा हेतू त्यामागे आहे. वेगातून अस्थैर्य, अस्थैर्यातून चंचलपणा असा प्रवास करणाऱ्यांना कुठेतरी स्थिरपणे आनंद मिळावा असा वाटतो. त्या आनंदाची सोय ‘विलंबित’ लयीमध्ये आहे. सूर लयीवर आरूढ होऊन येतात म्हणून त्यांना ‘चाल’ मिळते. ते सूर सुरेल, स्वयंभू व आस्वादक असतील तर ती ‘चाल’ अप्रतिमच होईल. ‘बे-लय’ यावरही संगोराम यांनी लिहिले आहे. प्रस्थापिताहून विपरीत करण्यात आनंद मिळवणारे काहीजण असतात. खरे म्हणजे लय हे कालाचे मोजमाप. हे मोजमाप समजून उमजून जर बे-लयीचे प्रयोग होत असतील तर ते प्रयोग म्हणून समजून घेता येतात. अन्यथा वाद्यावर किंवा गळ्यातून सलग १२ सूर काढणारे जसे काही विक्षिप्त असतात तशांमध्ये या बे-लयकारांची गणना करता येऊ शकते.
सदाशिव बाक्रे, ठाणे