Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

पारंपरिक उत्साहात शिराळ्यात नागपंचमी
सागंली, २६ जुलै / प्रतिनिधी

लाखावर भाविकांच्या उपस्थितीत शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी मोठय़ा उत्साहात व परंपरेप्रमाणे साजरी झाली. राज्य शासनाने दिलेल्या सूचना व कायद्याचे पालन हे या यात्रेचे वैशिष्टय़ ठरले. गेल्या काही वर्षापासून कायद्याच्या बंधनात अडकलेली शिराळ्याची ऐतिहासिक नागपंचमी मोठय़ा उत्साहात बंधने पाळून साजरी करीत आहेत. प्रचंड उत्साह पण मनातील नाराजी चेहऱ्यावर न दाखविता शिराळकरांनी आज नागांची मोठय़ा भक्तिभावाने पूजा केली. पारंपरिक रीतीने पकडलेले सर्व नाग येथील ग्रामदेवता अंबामाता मंदिरात पूजनासाठी नेण्यात आले. त्यानंतर घरोघरी नाग पूजनासाठी नेण्यात आले. घरोघरी सर्व गृहिणींनी या आपल्या मानलेल्या भावास भक्तीने ओवाळले.

किशोरीताईंची स्वर्गीय स्वर बरसात
सोलापूर, २६ जुलै/प्रतिनिधी

सोलापूर परिसरात यंदा पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती असताना गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी रविवारी सकाळी स्वरांची बेधुंद बरसात केली. त्यात अवघे रसिक अक्षरश: न्हाऊन निघाले आणि तृप्त झाले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या नूतनीकरण केलेल्या अ‍ॅम्फी थिएटरचे उद््घाटन तसेच प्रश्न. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचा पु. ल. देशपांडे बहुरुपी सन्मान स्वीकारण्यासाठी किशोरीताई सोलापुरात आल्या होत्या.

बार्शीजवळ दुर्मिळ पाताळलिंग मंदिराचा शोध
सोलापूर, २६ जुलै/प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे जमिनीपासून तीन मीटरखाली दुर्मीळ पाताळलिंग मंदिराचा शोध लागला असून या प्रश्नचीन मंदिराचा कालखंड सुमारे ५५० वर्षापूर्वीचा असावा, असा अंदाज आहे. सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलामधील पुरातत्व विभागाच्या प्रश्न. डॉ. माया पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मंदिराचा शोध लावला आहे.

कॉम्रेड दत्ताजी देशमुख पॅनेल संपूर्णपणे विजयी
विद्युत पतसंस्था निवडणुकीत कुलकर्णी बंधूंच्या पॅनेलचा धुव्वा
सातारा, २६ जुलै/प्रतिनिधी
येथील विद्युत नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी जिल्हा सेवकांची सहकारी पतसंस्थेचे माजी सचिव, रेणुका प्रतिष्ठानचे संस्थापक वीज वितरण कंपनीचे माजी प्रशासक अधिकारी जयंत कुलकणी व त्यांचे बंधू अ‍ॅड. सतीश कुलकर्णी यांच्या पॅनेलचा धुव्वा करुन कॉम्रेड दत्ताजी देशमुख पॅनेल संपूर्णपणे विजयी झाल्याने गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला व हल्लाबोलच्या घोषणा देण्यात आल्या.

रेड्डी, विजयदुर्ग, मार्गोवा बंदरांचा परिपूर्ण विकास गरजेचा- मंडलिक
कोल्हापूर, २६ जुलै / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील रेड्डी, विजयदुर्ग आणि गोव्यातील मार्गोवा या तीन बंदरांच्या परिपूर्ण विकासासाठी कोल्हापूरहून जाणारे नवे रेल्वेमार्ग आणि मुख्य रस्ते व्हावेत, अशी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांच्याकडे संपर्क साधून आग्रहाची मागणी केली आहे. या बंदरांचा विकास झाल्यास तेथून देशातील आणि परदेशातील अन्य बंदरांकडे मालाची वाहतूक होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

‘सांगली जि.प.च्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निवड गुणवत्तेनुसारच’
सांगली, २६ जुलै / प्रतिनिधी

सांगली जिल्हा परिषदेकडील वर्ग चार पदांची निवड ही गुणवत्तेनुसार होणार असून, उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला व भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नवाळे यांनी केले आहे. उमेदवारांनी परीक्षा कंेद्रावर एक तास अगोदर उपास्थित राहावे. ज्या उमेदवारांनी दोन फोटो ऐवजी एकच फोटो दिला आहे अशा उमेदवारांनी आपणास पाठविलेल्या ओळखपत्रावर फोटो लावून रिसीट घेऊन जाणे. या परीक्षेस तोतया विद्यार्थी बसलेचे आढळून आल्यास त्याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल व या पुढील सर्वपरीक्षेस बसण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात येईल याची दखल घ्यावी.

गोपाळपूरमधील महाविद्यालयास ‘गेट’ परीक्षेसाठी केंद्र म्हणून मान्यता
पंढरपूर, २६ जुलै/वार्ताहर
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयास फेब्रुवारी २०१० मध्ये होणाऱ्या गेट (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून निवड झाल्याचे पत्र नुकतेच प्रश्नप्त झाले आहे. श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च इन्स्टिटय़ूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेल्याच महिन्यात आयआयटी (मुंबई) गेट परीक्षा केंद्राचे माजी अध्यक्ष प्रश्न. एम. के. मिश्रा व सचिव एस. पी. शिंदे या द्विसदस्य समितीने भेट देऊन विविध विभागांची गेट परीक्षेच्या दृष्टीने सखोल पाहणी केली. त्यांना शिस्त, अभ्यासमय वातावरण, उपलब्ध साधनसामग्री, परीक्षार्थ्यांची सुरक्षितता, बैठक व्यवस्था, वाहन व्यवस्था इ. संबंधित बाबींवर परीक्षा मंडळातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर केला. त्यास आयआयटी मुंबईच्या संचालकांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार रविवार, १४ फेब्रुवारी २०१० रोजी ९.३० ते १२.३० पर्यंत होणाऱ्या गेट-२०१० परीक्षेसाठी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची गेट परीक्षा केंद्र म्हणून निवड झाली आहे.

कोयना धरणात ८१ टीएमसी पाणी
सातारा, २६ जुलै / प्रतिनिधी

१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत ८०.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी ६५२.८०५ मीटर (२१४१.९ फूट) एवढी झाली असून, पायथा विद्युतगृहामार्फत दोन हजार १११ क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री आठपर्यंत कोयनेत ३१, नवजात ३३ व महाबळेश्वरात ३६ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. धोम धरण ५३.७४ टक्के भरले आहे. पाण्याची पातळी ७४०.१३ मीटर आहे (८.०९ टीएमसी).कण्हेर ७५.०४ टक्के भरले आहे. पाणीसाठा ७.७० टीएमसी तर पाण्याची पातळी ६८६.८१ मीटर आहे. उरमोडी ४.५८ टीएमसी शंभर टक्के भरले आहे. पाण्याची पातळी ६८४.७४ मीटर एवढी आहे.

कवी आझाद यांना यंदाचा ‘कृष्णा साहित्यरत्न’ पुरस्कार
सांगली, २६ जुलै / प्रतिनिधी
कृष्णा काव्य गुंजन मंचच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय कृष्णा साहित्यरत्न पुरस्कार यंदा हिंदी राष्ट्रीय साहित्यिक व कवी कै. कैलाशचंद्र ओमकारदत्त त्रिपाठी (आझाद) यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष प्रश्न. नंदकुमार सुर्वे यांनी दिली. कृष्णा काव्य गुंजन मंचच्या वर्धापनदिनानिमित्त साहित्य व कला क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कैलाशचंद्र त्रिपाठी यांच्या हयातीत संस्थेच्या दि. १९ जून रोजीच्या विशेष सभेत हा पुरस्कार त्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि, दि. १ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेला हा निर्णय अमलात आणता आला नाही. तरीही संस्थेने एका विशेष सभेत त्यांनाच हा मरणोत्तर पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी संस्थेच्या वर्धापनदिन सोहळय़ात हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘वारणा’ काठच्या लोकांना सावध राहण्याचा इशारा
सांगली, २६ जुलै / प्रतिनिधी
वारणा धरण ७६.६२ टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस चालू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारणा काठच्या लोकांनी सावध राहावे, असा इशारा वारणा विभागाचे कार्यकारी अभियंता कै. म. चिल्ले यांनी दिला आहे.
वारणा धरण ७६.६२ टक्के भरले असून धरणाचे पाणलोट क्षेत्रात सध्या जोराचा पाऊस पडत असल्याने धारणात जादा जमा होणारे पाणी विद्युत निर्मित करून सांडव्यावरून पाणी कोणत्याही क्षणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे. तेव्हा यापुढे वारणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी सावध राहावे, योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन वारणा विभागाचे कार्यकारी अभियंता कै. म. चिल्ले यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्य़ात ५९ हजार नव्या मतदारांची नोंदणी
सांगली, २६ जुलै / प्रतिनिधी
राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्य़ात ५९ हजार पाच मतदारांनी नव्याने नावे नोंदविली तर एक लाख ९२ हजार ७१ जणांनी मतदार ओळखपत्रासाठी छायाचित्रे पुरविली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी दिली. मतदारसंघनिहाय नवीन मतदार नोंदणीसाठी प्रश्नप्त अर्ज व प्रश्नप्त छायाचित्रांची माहिती मिरज - ११ हजार ३६२ (३३ हजार ७५३), सांगली - ११ हजार १२१ (३६ हजार सहा), इस्लामपूर - पाच हजार ५०० (२६ हजार ४००), शिराळा - सात हजार २२० (१५ हजार ९४५), पलूस-कडेगाव - पाच हजार ६९८ (२९ हजार ५४५), खानाकू - सात हजार ३५३ (२० हजार ३३९), तासगाव-कवठेमहांकाळ - दोन हजार ९१८ (१६ हजार २४७) आणि जत - सहा हजार ८३३ (१३ हजार ८३६).

‘एमपीएससी’चे अर्जच इस्लामपूर पोस्टात नाहीत!
इस्लामपूर, २६ जुलै / वार्ताहर

इस्लामपूर शहर पोस्ट कार्यालयात सध्या एमपीएससी परीक्षेचा एकही परीक्षा फॉर्म उपलब्ध नसल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दि. बा. पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली असून येत्या दोन दिवसात परीक्षा फॉर्म उपलब्ध न झाल्यास तहसील कार्यालयासमोर सोमवार दि. २७ जुलै रोजी शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एमपीएससीसाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. २९ जुलै आहे व इस्लामपूर शहर पोस्ट कार्यालयात मात्र या परीक्षेचे फॉर्मच शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. परीक्षा फॉर्मच उपलब्ध न झाल्यास ग्रामीण भागातील इच्छुक पदवीधर तरूणांना या परीक्षेलाच बसता येणार नाही. परिणामी त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होणार आहे. एमपीएससीच्या परीक्षा फॉर्मची तातडीने उपलब्धता करून देऊन ग्रामीण भागातील होतकरू पदवीधरांना न्याय द्यावा, अशी मागणी करणारे लेखी निवेदन दि. बा. पाटील यांनी तहसीलदारांना दिले आहे. मात्र दोन दिवसात फॉर्म उपलब्ध करून न दिल्यास तहसील कार्यालयासमोर सोमवारी शिवसेनेच्यावतीने शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दुकान फोडले
मिरज, २६ जुलै / वार्ताहर
सांगली महापालिकेच्या गणेश मार्केटमधील दुकान फोडून चोरटय़ाने नऊ हजार रुपयांच्या साबणांची चोरी केली आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. सचिन शेटे यांचे अनंत परफ्युमस् नावाचे दुकान महापालिकेच्या गणेश मार्केटमध्ये आहे. शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यास ते गेले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. दुकानात ठेवण्यात आलेले विविध कंपन्यांचे साबण व धुलाई पावडर असा एकूण आठ हजार ७०० रुपयांचा माल चोरी झाला. याबाबत पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.