Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन
पुणे, २६ जुलै/ खास प्रतिनिधी

श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’सारखी अजरामर नाटय़कृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक पं. भास्कर मंगेश चंदावरकर यांचे काल रात्री उशिरा कर्करोगाने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. पहाटे दोनच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय व अत्यंत मोजकेच निकटवर्तीय उपस्थितीत होते. त्यांच्या मागे पत्नी शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर, मुलगा पत्रकार रोहित चंदावरकर व सून गायत्री असा परिवार आहे. पं. चंदावरकर यांना त्वचेशी संबंधित कर्करोग झाला असल्याचे २००७ मध्ये निष्पन्न झाले होते.

नलिनी पंडित यांचे देहावसान
मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी

मार्क्‍सवाद-गांधीवाद याच्या अभ्यासक, पुरोगामी चळवळीच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ विचारवंत नलिनी पंडित यांचे आज दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मधुभाई पंडित, पुत्र मिलींद पंडित, कन्या शमा दलवाई असा परिवार आहे. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या असाध्य रोगाशी झुंज देत असलेल्या नलिनी पंडित यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. पंडित यांच्या निधनाचे वृत्त पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरताच त्यांच्यावर शोककळा पसरली.

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून येणाऱ्यांच्या मार्गात शासकीय ‘गतिरोधक’
संदीप प्रधान, मुंबई, २६ जुलै

भरभक्कम टोलची रक्कम भरून वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून काही मिनिटांत वरळी गाठले तरी पुढे वाहतूक कोंडी तुमची पाठ सोडत नाही. मुंबई महापालिकेच्या विकास आराखडय़ात दाखविलेला डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड आणि ना. म. जोशी मार्ग यांना जोडणारा ४० मीटर रुंदीचा रस्ता झोपडपट्टी पुनर्विकास योजनेकरिता जेमतेम १२ मीटर रुंदीचा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हेच सागरी सेतूनंतरही वरळी येथील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यापूर्वी विलासराव देशमुख यांनी सागरी सेतूवरून येणाऱ्यांच्या वाटेत हा ‘गतीरोधक’ उभा केला आहे. वरळी येथील हा रस्ता पूर्ण झाला असता तर वरळी डेअरीच्या बाजूने उजवीकडून नरिमन पॉइंटच्या दिशेने जाता आले असते तर डावीकडून परळ, लालबागच्या दिशेने जाणे सोपे झाले असते. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून वरळी गाठणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये याकरिता जी/दक्षिण विभागाच्या विकास आराखडय़ात ३९.५५ मीटर रुंदीचा रस्ता दाखविण्यात आला होता.

नोकरशहांच्या ‘गृहस्वप्ना’ने केला कोटय़वधींचा एफएसआय गिळंकृत
निशांत सरवणकर, मुंबई, २६ जुलै

शासनाकडून अत्यल्प दराने भूखंड घेऊन जुहूत फ्लॅटचे स्वप्न पूर्ण झाल्यावर म्हाडातील उच्चपदस्थांच्या सोसायटीने बेकायदा एफएसआय घेऊन केलेला घोटाळा उघड झाल्यानंतरही कारवाईचे भिजत घोंगडे पडले आहे. अशा आणखी १४ सोसायटय़ांना नगरविकास खात्याने बेकायदा एफएसआय वाटल्याचे प्रकरण शासनानेच नेमलेल्या अग्रवाल समितीने उघड केले. समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला आणि त्यावर गृहनिर्माण विभागाने कारवाई अहवालही तयार केला. मात्र तरीही या घोटाळ्यातील नोकरशहांचा बालही बाका झालेला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही या घोटाळ्यात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली असली तरी ती फाईल गृहखात्यात धूळ खात पडली आहे. उपनगरात एक एफएसआय आणि एक टीडीआर असा दोन एफएसआय घेता येतो. मात्र म्हाडा वसाहतींना १.२ इतका एफएसआय आणि तेवढाच १.२ असा एकूण २.४ एफएसआय घेता येत होता. त्यासाठी डीसी रूल ३३ (५) हा लागू होता.

‘आयएनएस अरिहंत’ आण्विक पाणबुडीचे जलावतरण
विशाखापट्टणम, २६ जुलै/पी.टी.आय.

हवेतून तसेच भूपृष्ठावरून अण्वस्त्रे डागण्याचे सामथ्र्य भारताने आगोदरच मिळविलेले आहे. आता पाण्यातूनही (खरे तर पाण्याखालून!) अण्वस्त्रे सोडण्याची क्षमता प्राप्त करून भारताने आज अशी क्षमता असलेल्या मुठभर देशांच्या यादीत स्थान मिळविले. देशी बांधणीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या पहिल्या आण्विक पाणबुडीचे जलावतरण पंतप्रधानांच्या पत्नी गुरुशरणकौर यांच्या हस्ते पार पडल्यानंतर ही पाणबुडी मोठय़ा दिमाखात बंगालच्या उपसागरात शिरली आणि भारताने एक महत्त्वाचा टप्पा सर केला. अरिहंत ही भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी. या पाणबुडीतून थेट ७०० कि.मी. अंतरावर पोहोचू शकणारे अण्वस्त्र डागता येणार आहे. गुरुशरण कौर यांनी नारळ फोडून आणि पूजा करून या पाणबुडीचे जलावतरण केले. आता पुढील सुमारे दीड वर्ष या पाणबुडीच्या पाण्यात आणि बंदरात विविध चाचण्या घेण्यात येणार आहेत.

दुसऱ्या प्रवेशयादीतही ‘पहिले पाढे पंचावन्न’
मुंबई, २६ जुलै / प्रतिनिधी

अकरावीच्या पहिल्या प्रवेशयादीत झालेल्या असंख्य चुकांची पुनरावृत्ती दुसऱ्या प्रवेशयादीत होणार नाही, याची हमी शालेय शिक्षण विभागाने दिल्यानंतरही आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही ‘पहिले पाढे पंचावन्न’ असेच चित्र दिसले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी न मागितलेले महाविद्यालय दुसऱ्या यादीत देण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रवेशयादीनंतरही अनेक विद्यार्थी व पालक प्रवेशाबाबत हवालदिल झाले आहेत. दुसऱ्या प्रवेशयादीत १ लाख ३० हजार १७८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. यापैकी ५९ हजार ९४ विद्यार्थी पहिल्या यादीतील असून दुसऱ्या यादीत त्यांना पसंतीचे महाविद्यालय निवडण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या यादीत ७१ हजार ८४ नवीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वानी महाविद्यालयांत प्रवेश घेतला तर ३५ हजार १० विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शिल्लक राहील. तिसऱ्या प्रवेशयादीत त्यांचा समावेश केला जाईल. पहिल्या प्रवेशयादीत १ लाख २३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या यादीबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार केंद्रांत लेखी निवेदन द्यावे, असे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

 

प्रत्येक शुक्रवारी