Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

आज प्रश्नत्यक्षिके दाखविणार
जागतिक ऑलिम्पिया स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांत येण्याची मनीषा -डेनिस वूल्फ
औरंगाबाद, २६ जुलै/खास प्रतिनिधी

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मि. ऑलिम्पियामध्ये पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंमध्ये मला स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी सध्या जोरदार तयारी चालू आहे, असे जागतिक दर्जाचा शरीरसौष्ठवपटू डेनिस वूल्फने पत्रकारांना सांगितले.

नदीवरील बंधाऱ्याचा लातूर पॅटर्न महाराष्ट्राला मार्गदर्शक - देशमुख
लातूर, २६ जुलै/वार्ताहर

एकेकाळी कोल्हापुरी बंधारा हा राज्यभर पथदर्शक होता. मात्र त्याच्या पुढे एक पाऊल टाकून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून लातूरमध्ये पूर्णत्वास आलेल्या उच्चपातळी बंधाऱ्यामुळे बंधाऱ्यातील लातूर पॅटर्न आता महाराष्ट्राने स्वीकारला असल्याचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले. मांजरा, रेणा नदीच्या संगमावर खुलगापूर येथे बांधण्यात आलेल्या उच्चपातळी बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दिलीपराव देशमुख, खा. जयवंत आवळे, विकास कारखान्याचे अध्यक्ष अमित देशमुख, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, जि. प. अध्यक्षा छाया चिगुरे उपस्थित होते.

बच्चेकंपनीचा ‘सुपर डान्सर’ रिअ‍ॅलिटी शो
‘आजची बच्चेकंपनी खूप हुशार आहे. ती टीव्हीवर किंवा चित्रपटातून एकदा पाहूनसुद्धा चटकन नृत्य करू शकतात. मी आणि शिल्पा दिल्लीत एक नृत्य स्पर्धा पाहायला गेलो होतो. त्यानंतर आम्ही ठरवले की आपल्या मराठी बच्चेकंपनीसाठी डान्स रिअ‍ॅलिटी शो करायचा. खरेतर आमच्या ‘ट्वेन्टी फाइव्ह फ्रेम्स’ या प्रश्नॅडक्शन कंपनीतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची स्क्रिप्ट आम्ही तयार केली होती. पण मग ई टीव्ही मराठीकडे गेल्यानंतर त्यांनी डान्स रिअ‍ॅलिटी शो करण्याबद्दल विचारले आणि आम्हालाही कल्पना आवडली.

डॉ. मुंदडांच्या कार्यक्रमात क्षीरसागर समर्थकांची तोडफोड
बीड राष्ट्रवादीमध्ये गटबाजीला उधाण
बीड, २६ जुलै/वार्ताहर
नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना निमंत्रित केले नसल्यावरून त्यांच्या समर्थकांनी सार्वजनिक उपक्रम बांधकाममंत्री डॉ. विमल मुंदडा यांचा आजचा कार्यक्रम उधळून लावला. या वेळी सभामंडप आणि कोनशिला उद्ध्वस्त करून काळे झेंडे दाखविले. त्यानंतरही डॉ. मुंदडा यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्ण करून क्षीरसागर यांनी आपल्या पिलावळांना आवरावे अन्यथा आपणही दोन हात करू, असा इशारा दिल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत क्षीरसागर-मुंदडा गटात संघर्ष पेटला आहे.

‘एमकेसीएल’सोबतची भागीदारी संपुष्टात आणण्याचा ‘स्वाराती’चा निर्णय
नांदेड, २६ जुलै/वार्ताहर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सावळागोंधळ वाढत चालल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) सोबत असलेली भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. दरम्यान परीक्षा विभागातील अनागोंदीसंदर्भात उद्या व्यापक बैठक होणार आहे.

शिर्डी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग
जालना, २६ जुलै/वार्ताहर
जालना जिल्ह्य़ातील रांजणी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विशाखापट्टणम- शिर्डी एक्स्प्रेस गाडीच्या इंजिनास आग लागली. ही आग वेळीच विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही गाडी रांजणी स्थानकाजवळ आली असताना इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. या गाडीसाठी रांजणी हा थांबा नाही. परंतु आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ गाडी थांबविली आणि सोबत असणाऱ्या अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आग विझविली. इंजिनला लागलेली आग तात्काळ विझली त्यामुळे काही नुकसान झाले नसल्याने जालना येथील रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. आग विझल्यानंतर तातडीने दुसरे इंजिन रांजणीकडे पाठविण्यात आले. हे इंजिन जोडल्यानंतरपुढील प्रवासासाठी रवाना झाली.

‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांचे शिबिर
बीड, २६ जुलै/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे एकदिवसीय शिबिर उद्या (दि. २७) होत असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक डक यांनी दिली. शिबिराचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सकाळी १० वा. होणार आहे. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, पंडितराव दौड, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार उषा दराडे, माजी आमदार बदामराव पंडित, विनायक मेटे, सय्यद सलीम, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सुशीला मोराळे, सुदामती गुट्टे आदी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कृषीमंत्री म्हणून केलेले कार्य, समाजकार्य, कामगार, महिला नोकरदार, विद्यार्थी, युवकांसाठी व अल्पसंख्याकांसाठी आघाडी सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय यासंबंधी मार्गदर्शन होईल.

अजित पवार यांचा ३१ जुलैला धारूर दौरा
धारूर, २६ जुलै/वार्ताहर

राज्याचे जलसंपदामंत्री अजित पवार ३१ जुलैला प्रथमच धारूरमध्ये येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दौरापूर्व तयारीसाठी रविवारी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन, मोरफळी येथील साठवण कामाचा शुभारंभ, छत्रपती शिक्षण संस्था संचलित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. पवार यांच्या दौऱ्यापूर्वी तयारीसाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक येथील कृषी बाजार समितीत घेण्यात आली. याप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके, शिवाजी मायकर, अरुण सावंत, शेषेराव फावडे, रवींद्र सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

सापांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे - शेटे
बीड, २५ जुलै/वार्ताहर

सापाबाबत समाजात अनेक गैरसमज असून ज्यात साप दूध पितो, सापाच्या डोक्यावर मणी असतो, गारुडय़ाच्या पुंगीवर डोलतो, संपत्तीचे रक्षण करतो. त्यामुळे अंधश्रद्धा न बाळगता वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून साप हा मानवाचा शत्रू नसून मित्र असल्याने सर्पविज्ञान जाणून नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन प्रश्नचार्या सविता शेटे यांनी केले. बीड येथे कंकालेश्वर विद्यालयात विवेक वाहिनी व निरंतर शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने सर्पविज्ञान या विषयावर प्रश्नचार्या सविता शेटे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून साप या प्रश्नण्याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक उपस्थित होते.सापाकडे मित्र म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हरिओम मदत केंद्राच्या अन्नछत्राचे आज उद्घाटन
परभणी, २६ जुलै/वार्ताहर

येथील हरिओम मदत केंद्राच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (२७ जुलै) जिल्हा सरकारी दवाखान्यात मोफत अन्नछत्राचे उद्घाटन होणार आहे. दवाखान्यातील गरीब, गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था त्यानिमित्ताने दररोज होणार आहे. या अन्नछत्र उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे हे राहणार असून पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अ‍ॅड. अशोक सोनी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. वळवी, व्ही. बी. निलावाड, रेणुकादास चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी देवेंद्र अंधारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. बी. कुलकर्णी हे या प्रमुख पाहुणे असतील. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिन झांबरे, गजानन काळे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

अ‍ॅपे रिक्षा उलटून एक ठार
सिल्लोड, २६ जुलै/वार्ताहर

उंडणगाव ते गोळेगाव रस्त्यावर अ‍ॅपेरिक्षा उलटून अपघात झाल्याने एकजण ठार झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. गोळेगावहून उंडणगावकडे जाणारी अ‍ॅपेरिक्षा (क्र. एमएच-२०-एजी-६८४६) ही उंडणगावलगत उलटली. यामध्ये विश्वनाथ बाळुबा पाटील (वय ३३, रा. उंडणगाव) हे ठार झाले असून राधा आनंदा वाघ, भगवान सांडू सुरडक, लक्ष्मी कृष्णा गवळी, पुंजाबाई उखर्डु वाघ, राधा येडुबा सुरडक (सर्व रा. उंडणगाव) हे गंभीर जखमी झाले असून सर्वावर प्रश्नथमिक उपचार करण्यात आले असून यातील तीनजणांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे ऐन नागपंचमीच्या सणाच्या दिवशीच उंडणगावावर शोककळा पसरली.

दीड लाखाच्या सीडी जप्त
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

हिंदी, इंग्रजी चित्रपटांच्या बनावट सीडी विक्री करणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी छापा घातला. त्या ठिकाणी दीड लाख रुपये किमतीच्या सिडीज हस्तगत झाल्या. पैठण गेट भागातील शहनाई म्युझिक सेंटरवर गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री छापा घातला. सय्यद अजमद सय्यद इस्माईल (समतानगर) या आरोपीला याप्रकरणी जेरबंद करण्यात आले आहे. क्रांती चौक पोलिसात कॉपी राईट अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या छळाबद्दल गुन्हा
भोकरदन, २६ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील कोठा जहांगिर येथील लिला कृष्णा इंचे (वय २७) हिला मोटारसायकल घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल भोकरदन पोलिसांनी पती, सासू, सासरा, भाचा या चौघांविरुद्ध आज गुन्हा दाखल केला. जाफ्राबाद तालुक्यातील कोल्हापूर येथील लिलाचा कोठा जहांगिर येथील कृष्णा इंचे याच्याशी सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिला चार वर्षाची मुलगी असून तिचा सासरा शेनफड इंचे, सासू मनकर्णा इंचे, भाचा अशोक व पती कृष्णा यांनी, तू दिसायला चांगली नाही म्हणून नेहमीच शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच मोटारसायकलसाठी ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला. त्यामुळे तीन वर्षापासून लिला कोल्हापूरला माहेरी राहत आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून भोकरदन पोलिसात वरील चौघांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएमवरून ४० हजार काढले
हिंगोली, २६ जुलै/वार्ताहर

येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या वसाहतीमधील एका कर्मचाऱ्याचे एटीएम कार्ड चोरून ४० हजार रुपये काढले. राज्य राखीव दलाचे हवालदार भानुदास डोणवळकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल. पोलीस सूत्रांनुसार, राज्य राखीव दलाच्या बॅरेकमध्ये कर्मचाऱ्यांच्या पेटय़ा ठेवण्यात आल्या असताना आरोपी ए. आर. शिंदे, जी. एन. गायकवाड, व्ही. आर. कुंडगिर, ए. यू. खिल्लारे (सर्व रा. राज्य राखीव पोलीस बल वसाहत) यांनी बुधवारी रात्री एटीएम कार्ड चोरून ४० हजार रुपये काढले. खात्यात सुमारे ५८ हजार ४९२ रुपये होते. पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नितीन मगर तपास करीत आहेत.

तुरीच्या बिया खाल्ल्याने मृत्यू
भोकरदन, २६ जुलै/वार्ताहर

शेतात लागवड सुरू असलेल्या कीटकनाशक औषधी लावलेल्या तुरीच्या बिया खाल्ल्याने नळणीवाडी येथील युवराज विजयसिंग सिंघल या सात वर्षे वयाच्या बालकाचा काल शनिवारी मृत्यू झाला. भोकरदन पोलिसांनी यासंबंधी रविवारी आकस्मात मृत्यूची नोंद केली. युवराज यांच्या आईसह इतर महिला नळणीवाडी येथील त्यांच्या शेतात शनिवारी दुपारी तुरीची लागवड करीत असताना त्यांच्यासोबत असलेल्या युवराजने खेळताखेळता काही बिया खाल्ल्या. यामुळे दुपारी त्यास ढाळ-वांत्या होण्यास सुरुवात झाली. त्यास श्रीक्षेत्र राजूर येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत भोकरदन पोलिसांनी रविवारी दुपारी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास जमादार बी. एन. शिनगारे, संतोष सोनवणे, सरोज वाघमारे करीत आहेत.

झोका बांधताना पडून मुलीचा मृत्यू
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

झोका बांधताना उंचावरून पडल्यामुळे ११ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत रांजणगाव येथे घडली. वर्षा विश्वनाथ करटोहे असे या मुलीचे नाव आहे. नागपंचमीनिमित्त ती घरातच लोखंडी अँगलला झोका बांधत होती. त्यासाठी ती अँगलवर चढली होती. तोल गेल्याने ती खाली फरशीवर पडली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला.

विवाहित महिला भाजली
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मस्तपुरा येथे एक विवाहित महिला गंभीररित्या भाजली. फयमाबेगम महंमद मोसीन (वय २८) असे या महिलेचे नाव आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तिच्या घरातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर शेजारी राहणाऱ्यांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ती महिला जळालेल्या अवस्थेत होती. शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

युवक काँग्रेसचे काम वाढविणार - मुंढे
जालना, २६ जुलै/वार्ताहर

गटातटाच्या राजकारण न करता युवक काँग्रेसचे काम प्रभावीपणे वाढविण्यात येईल, असे जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्याने नियुक्ती झालेले प्रश्न. सत्संग मुंढे यांनी सांगितले. प्रश्न. मुंढे म्हणाले, आपण जालना जिल्ह्य़ात एनएसयूआयच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांमध्ये गेल्या काही वर्षापासून भरीव कामगिरी केली. त्याची दखल घेऊन युवक काँग्रेसच्या अखिल भारतीय आणि महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आपली जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता संपूर्ण जालना जिल्ह्य़ात युवक काँग्रेसच्या गावोगावी शाखा उघडण्यात येतील.

होकरणा येथे आज पुरस्कारांचे वितरण
जळकोट, २६ जुलै/वार्ताहर

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती होकरणा (ता. जळकोट)च्या वतीने गेल्या वर्षीच्या उपक्रमांतील यशस्वी गावातील लाभार्थ्यांना सोमवार, २७ जुलैला सायंकाळी ४ वाजता समितीतर्फे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जळकोटचे तहसीलदार आर. बी. कदम असतील. पोलीस निरीक्षक संजय जाधव, गटविकास अधिकारी आर. व्ही. मुक्कावार, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चावरे हे प्रमुख पाहुणे आहेत. या मोहिमेअंतर्गत २००७-०८ मध्ये होकरणा हे गाव तंटामुक्त झाले. पुरस्काराच्या रक्कमेतून गावात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माधव भुरे, ग्रामसेवक ए. बी. दुधाटे व समिती पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सव्वा दोन लाखांचा ऐवज अंबाजोगाईत चोरीस
अंबाजोगाई, २६ जुलै/वार्ताहर

अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या जोगाईवाडी हद्दीतील भगवानदास शिवकरण सारडा या व्यापाऱ्याच्या घरी अज्ञात चोरटय़ांनी प्रवेश करून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. शहरालगत असणाऱ्या रिंग रोड परिसरात व जोगाईवाडी हद्दीतील व्यापारी भगवानदास सारडा यांच्या छत्रपतीनगर येथील घरातून अज्ञात चोरटय़ांनी सोन्या-चांदीचे दागिने, ८५ हजार रोख रक्कम असा एकूण दोन लाख २६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरी झाल्याप्रकरणी श्री. सारडा यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर अज्ञात चोरटय़ांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

‘औसा’साठी भाजपचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार
औसा, २६ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत मतभेद विकोपाला गेले असून विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ औसा विधानसभेची जागा मागण्यासाठी सक्रिय झाले आहेत. यामुळे राज्यात असलेली युती निवडणुकीच्या उंबरठय़ावर औसा तालुक्यात फारकत घेणार काय? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात भाजप-शिवसेनेची युतीच्या तडजोडीत औसा विधानसभेची जागा शिवसेनेला मिळाली. शिवसेनेच्या उमेदवारीवर प्रश्न. सूर्यभान जाधव यांना अपयश आले. परंतु १९९९ व २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार दिनकर माने यांनी युतीला विजय मिळवून दिला. तालुक्यात भाजपची भक्कम स्थिती असल्याने तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सक्रिय झाले असून लवकरच औसा विधानसभेच्या मागणीसाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे.

हरीण, रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त
परतूर, २६ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारात हरणांसह रानडुकरांचा मोठय़ा प्रमाणात सुळसुळाट झाला असून हे प्रश्नणी उभ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्रश्नण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
तालुक्यात सातोना, वाटूर, श्रीष्टी व आष्टी या चारही गटांतील अनेक गावांच्या शिवारात हरीण, रानडुकरे व वानरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील आठवडय़ात झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोपासली आहेत. परंतु हरणांचे, रानडुकरांचे व वानरांचे कळप पिकांची नासाडी करत आहेत.

ग्रामसभा न घेतल्याबद्दल गिरवलीचे सरपंच अपात्र
अंबाजोगाई, २६ जुलै/वार्ताहर

बावणे गिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच लताबाई जोगदंड यांनी ग्रामसभा न बोलविल्याप्रकरणी त्यांच्या पदावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळली आहे. श्रीमती लताबाई जोगदंड यांनी २००८ मध्ये एप्रिल, जुलै, ऑगस्ट या महिन्यांत त्यांनी सभा बोलावली नाही. या प्रकरणी सदस्य दत्तात्रेय आपेट व सखाराम शिंदे यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशी करून अप्पर जिल्हाधिकारी डी. एन. वानोळे यांनी सरपंच लताबाई जोगदंड यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना सरपंचपदावरून अपात्र ठरविले आहे.

दारू विक्री दुकानाचा परवाना रद्द
औसा, २६ जुलै/वार्ताहर

शहराच्या मध्यवस्तीत देशी दारू विक्री दुकानासाठी देण्यात आलेल्या परवाना शिवसेना नगरसेवक आणि नागरिकांनी रद्द करण्याची मागणी केली. उद्या (दि. २७) होणाऱ्या न.प.च्या विशेष बैठकीत हा विषय ठेवण्यात आल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी ना-हरकत परवाना शनिवारी उशिरा रद्द केला आहे. शहरातील मुख्य वेस व हनुमान मंदिराजवळ देशी दारू विक्री दुकानासाठी ना-हरकत परवाना नगर परिषदने रितसर दिला. नगरसेवक बंडू कोद्रे व जयश्री उटगे यांनी प्रमाणपत्रास आक्षेप घेतला. नगराध्यक्ष अफसर शेख यांच्यासह नगर परिषदेत तक्रार दाखल केली होती.

‘आनंदी जीवनासाठी इष्टिलिंग योग साधनेची गरज’
निलंगा, २६ जुलै/वार्ताहर

भौतिक सुखसोयीच्या आहारी गेलेल्या मानव जातीला निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या इष्टिलिंग योग साधनेची गरज असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमर सोलपुरे यांनी केले. निलंगा येथे म. बसवेश्वर मंगल कार्यालयात वीरशैव समाज, महिला अनुभव मंटप, म. बसवेश्वर प्रतिष्ठान, शिवा संघटना, बसवेश्वर युवक मंडळ, संगणबसव ट्रस्ट, मडिवाळेश्वर ट्रस्ट आदींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इष्टिलिंग योग साधना’ शिबिरात डॉ. सोलपुरे बोलत होते.

जळकोट शहरात एम.एड.चा अभ्यासक्रम सुरू
जळकोट, २६ जुलै/वार्ताहर
येथील महात्मा फुले अध्यापक महाविद्यालयात एम. एड्.चा उच्चस्तरीय अभ्यासक्रम सुरू करण्यास भोपाळमधील एन.सी.टी.ई.ने जुलै २००९ पासून मान्यता दिली आहे. त्यामुळे जळकोट तालुका व परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांची एम. एड्. करण्यासाठी सोय झाली आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्याबद्दल तालुक्यातील पदवीधर युवकांतून समाधान व्यक्त होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयाबाबत वसमतमध्ये तक्रारी
वसमत, २६ जुलै/वार्ताहर

येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची तक्रार होत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर योग्यरितीने उपचार होत नसल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्चून रुग्णांना चांगली मोफत उपचार सेवा मिळावी अशी अपेक्षा रूग्णांकडून व्यक्त केली जात आहे. तरी याबाबत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष घालावेत अशी मागणी होत आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष घालावेत अशी मागणी होत आहे.

खळखळ वाहणारे ना झरे, ना उंच जाणारे झोके..
लोहा, २६ जुलै/वार्ताहर

पाऊसमान कमी झाला. नागपंचमीच्या काळात खळखळ वाहणारे झरे.. नदी, ओहोळातून वाहणारे पाणी.. सगळीकडे हिरवीगार सृष्टी. पाऊस इतका असायचा की खडक फुटायचा, पाय टाकाल तिथं पाणी अशी गत.. त्यातच सणानिमित्त नवविवाहिता माहेरला आलेल्या. उंचच उंच झोका.. तर काही ठिकाणी तरुण-वृद्ध पुरुष मंडळी सिडीचा (भूईझोका) चढविण्याचा कसोशीने प्रयत्न करायचे. ही आज परिस्थिती पाहायला मिळत नाही. पर्यावरणातही मोठी स्थित्यंतरे पहायला मिळत आहे. नागपंचमीच्या काळात गावालगत नदीतून पाणी वहायचे. माळरानातून झरे खळखळ वाहत.. सगळ्या जणी मिळून गावालगतच्या नारुळाला पुजायला जायच्या. आज पाऊस कमी पडतोय. खेडय़ापाडय़ात पाण्याची भीषण टंचाई आहे. नागपंचमीच्या गतकाळातील आठवणी सद्य परिस्थिती पाहून कालची नागपंचमी अन् आजची नागपंचमी अशी तुलना केली जात आहे.

वसुलीअभावी सोयगावमध्ये सेवासंस्था तोटय़ात
सोयगाव, २६ जुलै/वार्ताहर
सहकारी सेवा संस्थांना वैद्यनाथन पॅकेज न मिळाल्याने त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. खरीप हंगामात पीककर्जाच्या रूपाने शेतकऱ्यांसाठी सेवासंस्थेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. मात्र वसुलीअभावी या सेवासंस्था तोटय़ात गेल्या. तालुक्यातील ३६ पैकी १५ सेवा संस्था अजूनही तोटय़ात आहेत. सेवा संस्थेला संजीवनी देण्यासाठी शासनाने वैद्यनाथन समिती गठीत केली. या समितीने सेवा संस्थेला पॅकेज दिले. मात्र मदतीचा हात त्या संस्थांपर्यंत पोहोचला नाही. अनेक वर्षापासून सेवा संस्थांची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ३१ मार्च २००७ च्या ऑडिट दर्जामध्ये ‘अ’ वर्गात एकही संस्था नाही. ‘ब’ वर्गात दोन, ‘क’ वर्गात ८, तर ‘ड’ वर्गात २६ संस्था आहे.

श्रीबालाजी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे यश
अंबाजोगाई, २६ जुलै/वार्ताहर
श्रीबालाजी शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंनी नुकत्याच झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. प्रथम वर्ष प्रवेशातील विद्यार्थ्यांंपैकी बळीराम मुसळे याने ८२.६३, दत्ता मुळे याने ८१.५६ आणि अश्विनी महाजन हिने ७७.९ टक्के मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच द्वितीय वर्षातील तेजस्वी चव्हाण हिने ८३, महंमद असद याने ७७.३ आणि सय्यद सलाउद्दीन याने ७६.६० टक्के गुण मिळविले. या महाविद्यालयाची ही दुसरी बॅच आहे.

परतूर शहरातील रस्त्यांची दूरवस्था
परतूर, २६ जुलै/वार्ताहर
शहरातील मुख्य रस्त्यासह सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्डेयुक्त रस्त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्त्याची दैना झाली. सिमेंट रस्ते किती निकृष्ट दर्जाचे आहेत हे पहिल्याच पावसाने दाखवून दिले. रेल्वे स्टेशनजवळील बसथांबा, मध्यवर्ती बँकेसमोर, पोलीस स्टेशन चौक तसेच गाव भागातीलही रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.

तांडय़ांच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी
लोहा, २६ जुलै/वार्ताहर
सावरगाव येथील अंतर्गत रस्ते, समाजमंदिर दुरुस्ती, केसू तांडय़ावर सांस्कृतिक सभागृह व सकरू तांडय़ावर विकासासाठी पाच लाख रुपयांचा निधी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केला. श्री. पाटील यांच्या हस्ते केसू तांडा येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती बालाजी पाटील, नगरसेवक वसंत पवार, कृउबा संचालक किरण वट्टमवार आदी उपस्थित होते. केसू तांडय़ावरील सांस्कृतिक सभागृहाचे आज आमदारांनी भूमिपूजन केले.

पोलीस क्रीडा स्पर्धाचे आज उद्घाटन
हिंगोली, २६ जुलै/वार्ताहर
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचे हिंगोलीत आयोजन जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. चार दिवस होणाऱ्या या स्पर्धाचे उद्घाटन सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश माज्रीकर यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेतील विजयी संघ व स्पर्धकांना गुरुवारी जिल्हाधिकारी शैला रॉय यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांनी दिली. या स्पर्धा येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सोमवारी सुरू होणार असून व्हॉलिबॉल सामन्याच्या उद्घाटनाने स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

वसमतमध्ये सोयाबीन अनुदानाचे वाटप
वसमत, २६ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील सात गावांच्या शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाचे वाटप सध्या सुरू झाले आहे. या सात गावांतील अडीच हजार शेतकऱ्यांना २७ लाख ५७ हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील सात गावांचा शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर गेल्या वर्षी लष्करी अळी पडल्यामुळे त्यांचे पीक वाया गेले. त्याचे अनुदानाचे वाटप सध्या सुरू आहे, अशी माहिती निरीक्षक पी. आर. पतंगे, शाखा व्यवस्थापक एस. टी. नादरे यांनी सांगितले.

डाव्या लोकशाही आघाडीची स्थापना
जालना, २६ जुलै/वार्ताहर
येथील सीटू भवनमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत डाव्या लोकशाही आघाडीची स्थापना करण्यात आली. कॉ. अण्णा सावंत यांनी ही बैठक बोलाविली होती. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतमजूर युनियन, किसान सभा, सीटू इत्यादी पक्ष संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभा निवडणूक जिल्ह्य़ात डाव्या लोकशाही आघाडीने एकत्रित लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ज्ञानेश मातेकर यांना पुरस्कार
अंबाजोगाई, २६ जुलै/वार्ताहर
अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचा या वर्षीचा राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक पुरस्कार अंबाजोगाई येथील शिक्षक ज्ञानेश मातेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १ ऑगस्टला अहमदनगर येथील स्व. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारकचे अध्यक्ष बाबूलाल कासट, प्रश्न. सतीश पत्की आदींनी मातेकर यांचे अभिनंदन केले आहे.

जळकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
जळकोट, २६ जुलै/वार्ताहर

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग महाराज अहमदपूरकर यांचे जळकोट शहरात ७३ वे तपोनुष्ठान आयोजित करण्यात आले असून हा सोहळा २६ जुलैपासून सुरू झाला आहे. तत्पूर्वी २५ जुलैला डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यात रुद्र पशुपती कोळेकर महाराज, सिद्धदयाळ बेटमोगेरकर महाराज, वीरूपाक्ष गणाचार्य महाराज, हावगीस्वामी महाराज सहभागी झाले होते. पहाटे ४ ते ६ शिवपाठ, सकाळी ७ ते ८ अभिषेक, ८ ते १० पारायण, १० ते ११ प्रवचन, ११ ते १२ माउलींचे दर्शन, दुपारी १२ ते २ भोजन, २ ते ३ गाथा भजन, ३ ते ५ शिवकथा, सायंकाळी ५ ते ६ शिवपाठ, ६ ते ७ सद्गुरुचे दर्शन, ७ ते ८.३० प्रसाद, ८.३० ते ११ शिवकीर्तन, रात्री ११ ते ४ शिवजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.