Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन
पुणे, २६ जुलै/ खास प्रतिनिधी

श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’सारखी अजरामर नाटय़कृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक पं. भास्कर मंगेश चंदावरकर यांचे काल रात्री उशिरा कर्करोगाने

 

निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
पहाटे दोनच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय व अत्यंत मोजकेच निकटवर्तीय उपस्थितीत होते. त्यांच्या मागे पत्नी शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर, मुलगा पत्रकार रोहित चंदावरकर व सून गायत्री असा परिवार आहे. पं. चंदावरकर यांना त्वचेशी संबंधित कर्करोग झाला असल्याचे २००७ मध्ये निष्पन्न झाले होते. तथापि, त्यावरील शस्त्रक्रिया व महिनाभराच्या उपचारानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरूवात केली होती. दिल्ली, गोवा, भोपाळपर्यंत प्रवास करून संगीतविषयक अध्यापनाचे काम त्यांनी सुरू ठेवले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांना पुन्हा थोडासा त्रास जाणवू लागला. तो वाढल्याने गेल्या शनिवारी त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना पाच दिवसांपासून श्वसनाचाही त्रास होऊ लागला. काल सायंकाळनंतर त्यांची प्रकृती आणखीनच ढासळली व रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी सर्वत्र पसरले. त्यानंतर संगीत, कला, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी गणेशनगर येथील शैलेश सोसायटीत त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.