Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नलिनी पंडित यांचे देहावसान
मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी

मार्क्‍सवाद-गांधीवाद याच्या अभ्यासक, पुरोगामी चळवळीच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ विचारवंत नलिनी पंडित यांचे आज दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मधुभाई पंडित, पुत्र मिलींद पंडित, कन्या शमा दलवाई असा परिवार आहे. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार

 

करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या असाध्य रोगाशी झुंज देत असलेल्या नलिनी पंडित यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. पंडित यांच्या निधनाचे वृत्त पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरताच त्यांच्यावर शोककळा पसरली. न्या. हेमंत गोखले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे आदींनी नलिनी पंडित यांच्या निधनाबद्दल तीव्र शोकभावना व्यक्त केल्या असून पंडित यांनी सामाजिक बांधिलकीची शिकवण दिल्याचे सांगितले.
समाजवादी संघटना, दलित संघटना, युवक क्रांती दल अशा असंख्य पुरोगामी चळवळींना नलिनी पंडित यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या चळवळीला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. १९५५ साली नलिनी पंडित यांनी ‘महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास’ हा ग्रंथ लिहिला. समाजवादी चळवळीतील राष्ट्रवादाच्या भाबडय़ा कल्पनांना छेद देणाऱ्या या लेखनाने पुरोगामी चळवळीत उलथापालथ झाली. समाजवादी तरुणांचा जहाल पुरोगामी चळवळीकडील ओढा वाढविण्यास पंडित यांच्या सडेतोड लेखनाने हातभार लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जात आणि वर्ग या दोन्हीचे परस्पर संबंध आणि भारतीय परिप्रेक्षातील महत्व पंडित यांनी ‘जातीवाद आणि वर्गवाद’ या ग्रंथातून विशद केले. १९९१ साली भारताने तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. मात्र हे धोरण भविष्यात गरीबांचे शोषण करणारे, बेकारीचे थैमान घालणारे आणि सामाजिक विषमता वाढविणारे ठरणार असल्याचे भाकित पंडित यांनी ‘जागतिकीकरण आणि भारत’ या ग्रंथातून व्यक्त केले होते.