Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘आयएनएस अरिहंत’ आण्विक पाणबुडीचे जलावतरण
विशाखापट्टणम, २६ जुलै/पी.टी.आय.

हवेतून तसेच भूपृष्ठावरून अण्वस्त्रे डागण्याचे सामथ्र्य भारताने आगोदरच मिळविलेले आहे. आता पाण्यातूनही (खरे तर पाण्याखालून!) अण्वस्त्रे सोडण्याची क्षमता प्राप्त करून भारताने आज अशी क्षमता असलेल्या मुठभर देशांच्या यादीत स्थान मिळविले. देशी बांधणीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या पहिल्या आण्विक पाणबुडीचे जलावतरण पंतप्रधानांच्या पत्नी गुरुशरणकौर यांच्या हस्ते पार पडल्यानंतर ही पाणबुडी मोठय़ा दिमाखात बंगालच्या उपसागरात शिरली आणि भारताने एक

 

महत्त्वाचा टप्पा सर केला.
अरिहंत ही भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी. या पाणबुडीतून थेट ७०० कि.मी. अंतरावर पोहोचू शकणारे अण्वस्त्र डागता येणार आहे. गुरुशरण कौर यांनी नारळ फोडून आणि पूजा करून या पाणबुडीचे जलावतरण केले. आता पुढील सुमारे दीड वर्ष या पाणबुडीच्या पाण्यात आणि बंदरात विविध चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर अधिकृतपणे ही पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. आज अरिहंतचे जलावतरण झाल्याने गेली तब्बल तीन-साडेतीन दशके संरक्षण व अणुशास्त्रज्ञ करीत असलेले प्रयत्न अखेरीस साकार झाले आहेत.
अर्थात ही मारक क्षमता भारताने प्राप्त केली असली तरी अन्य देशांवर आक्रमण करण्याची अथवा कोणाला धमकाविण्याची आमची मुळीच इच्छा नाही. आमचा विकास शांततामय वातावरणात आम्हाला करता यावा आणि आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी आमच्या विभागात तसेच त्याबाहेर अनुकूल वातावरण राहील एवढीच काळजी आम्ही घेऊ इच्छितो, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या जलावतरणाच्या सोहळ्यात केले.
११२ मीटर लांब आणि २५ मीटर रुंदीच्या आण्विक पाणबुडीला ‘अरिहंत’ हे नाव जाणीवपूर्वक देण्यात आले आहे. ‘शत्रूचा नाश करणारी’ असा अरिहंतचा अर्थ आहे. या पाणबुडीवर २३ अधिकारी आणि ७२ नौसैनिक असणार आहेत. या पाणबुडीवर ८५ मे.व्ॉ. क्षमतेची अणुभट्टी बसविण्यात आली आहे. या अणुभट्टीतील इंधन सतत १० वर्षे पाणबुडी कार्यरत ठेवेल एवढे आहे.