Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

दुसऱ्या प्रवेशयादीतही ‘पहिले पाढे पंचावन्न’
मुंबई, २६ जुलै / प्रतिनिधी

अकरावीच्या पहिल्या प्रवेशयादीत झालेल्या असंख्य चुकांची पुनरावृत्ती दुसऱ्या प्रवेशयादीत होणार नाही, याची हमी शालेय शिक्षण विभागाने दिल्यानंतरही आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही ‘पहिले पाढे पंचावन्न’ असेच चित्र दिसले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी न मागितलेले महाविद्यालय दुसऱ्या यादीत देण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रवेशयादीनंतरही अनेक विद्यार्थी व पालक

 

प्रवेशाबाबत हवालदिल झाले आहेत.
दुसऱ्या प्रवेशयादीत १ लाख ३० हजार १७८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. यापैकी ५९ हजार ९४ विद्यार्थी पहिल्या यादीतील असून दुसऱ्या यादीत त्यांना पसंतीचे महाविद्यालय निवडण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या यादीत ७१ हजार ८४ नवीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वानी महाविद्यालयांत प्रवेश घेतला तर ३५ हजार १० विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शिल्लक राहील. तिसऱ्या प्रवेशयादीत त्यांचा समावेश केला जाईल. पहिल्या प्रवेशयादीत १ लाख २३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या यादीबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार केंद्रांत लेखी निवेदन द्यावे, असे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
वरळी येथील क्षीरसागर नावाच्या विद्यार्थ्यांला प्राधान्यक्रम यादीत नमूद न केलेले शीव येथील महाविद्यालय देण्यात आले आहे. शीव हा भाग त्याच्या झोनमध्ये येत नाही. तर गोरेगाव येथील पवार नावाच्या विद्यार्थिनीला ८५ टक्के मिळूनही विज्ञान शाखेसाठी दिलेल्या प्राधान्यक्रमातील महाविद्यालय देण्यात आले नाही. मात्र झोनचा निकष लावून ती वास्तव्यास असलेल्या झोनममध्ये अलीकडेच सुरू झालेले दुय्यम दर्जाचे महाविद्यालय देण्यात आल्याची तक्रार तिने केली आहे.
आज सायंकाळी सहा वाजता दुसरी यादी जाहीर होणार होती. मात्र ती सात वाजल्यानंतर जाहीर झाली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक संतप्त पालकांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात दूरध्वनी करून प्रवेशप्रक्रियेबाबत संताप व्यक्त केला. शिक्षण विभागाने दुसरी यादी करण्याच्या तारखेत दोन वेळा मुदतवाढ केली होती. असे असूनही निर्दोष प्रवेशयादी जाहीर करण्यात शिक्षणविभागाला अपयश आले.
दरम्यान, काही महाविद्यालांमध्ये वीस टक्के जागा वाढविण्याचा निर्णय शिक्षणविभागातर्फे घेण्यात आला आहे. दुसऱ्या यादीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक राहणार आहेत, त्या ठिकाणी या जागा वाढविण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाचे उपसंचालक व्ही. के. वानखेडे यांनी सांगितले की, दुसऱ्या प्रवेशयादीच्या प्रवेशप्रक्रियेनंतर काही महाविद्यालांमध्ये जागा शिल्लक राहतील. त्या महाविद्यालयांना १० ऐवजी १२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.