Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नदीवरील बंधाऱ्याचा लातूर पॅटर्न महाराष्ट्राला मार्गदर्शक - देशमुख
लातूर, २६ जुलै/वार्ताहर

एकेकाळी कोल्हापुरी बंधारा हा राज्यभर पथदर्शक होता. मात्र त्याच्या पुढे एक पाऊल टाकून

 

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून लातूरमध्ये पूर्णत्वास आलेल्या उच्चपातळी बंधाऱ्यामुळे बंधाऱ्यातील लातूर पॅटर्न आता महाराष्ट्राने स्वीकारला असल्याचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले.
मांजरा, रेणा नदीच्या संगमावर खुलगापूर येथे बांधण्यात आलेल्या उच्चपातळी बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दिलीपराव देशमुख, खा. जयवंत आवळे, विकास कारखान्याचे अध्यक्ष अमित देशमुख, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, जि. प. अध्यक्षा छाया चिगुरे उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित पंचक्रोशीतील गर्दी पाहून विलासरावांनी उपस्थित श्रोत्यांना थेट ३५ वर्षे मागे नेले व त्यावेळी भातांगळी जिल्हा परिषद सर्कलमधील लढविलेल्या निवडणुकीतील आठवणी, गावात सुरू केलेल्या बसेसचा बसमध्ये बसून सव्‍‌र्हे, पुलावरील बांधकामासाठी पावसात छत्री घेऊन उभे राहणे, गावाला वीज मिळण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या गाडीतून विजेचे पोल घेऊन येणे अशा अनेक आठवणी सांगितल्या. आमदार असताना भातखेडय़ाचा पूल फिजिबल नाही, असा अहवाल सिंचन विभागामार्फत आला होता. मंत्री झाल्यानंतर तो अहवाल रद्द होऊन पूल फिजिबल झाला. फिजिबल व नॉन फिजिबल हे कसे फ्लेग्जिबल असते हे तेव्हा आपण अनुभवल्याचे देशमुख म्हणाले. ३५ वर्षाच्या वाटचालीत जिल्हा परिषदेपासून दिल्लीपर्यंतचे राजकारण आपण केले. आज हवाईपाहणी होते. ३३ केव्ही सबस्टेशनचे बटन दाबून उद्घाटन होते व पुलाऐवजी बॅरेजेसचे उद्घाटन झाले. मात्र त्याकाळचा आनंद काही और होता. त्याकाळी आपण छोटय़ा छोटय़ा प्रश्नात लक्ष घालून ते प्रश्न सोडवले. त्यामुळेच आपण राजकारणात दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो, असे ते म्हणाले. ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी अशा सुविधा आल्या आहेत. सिंचनाचे क्षेत्र वाढल्यामुळे आर्थिक क्षमता वाढली व ही आथिक क्रांतीच आज अधिक गरजेची आहे. पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे आगामी काळात आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक प्र. चं. झपके यांनी केले. आपल्या प्रश्नस्ताविकात अत्यंत अल्प कालावधीत खुलगापूरचे काम गुणवत्तेत पूर्ण केल्याचे ते म्हणाले. महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी, ज्या ठिकाणी उच्चपातळीचे बंधारे जिल्ह्य़ात होतील तेथे नवीन ३३ केव्ही सबस्टेशन केले जाईल व शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कमी पडू दिली जाणार नाही, असे सांगितले. अमित देशमुख यांनी पाणी व वीज हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खरी गरज आहे. जिल्ह्य़ात १४६ किलोमीटर नदीच्या पात्रात बारमाही पाणी थांबण्याची योजना लवकरच पूर्णत्वास येईल व यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडेल असे सांगितले. राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांनी कोल्हापुरी बंधाऱ्याची संकल्पना कै. वसंतदादा पाटील यांनी मांडली होती. त्यामुळे त्या बंधाऱ्यांना वसंत बंधारा म्हटले जायचे. लातूरमध्ये बॅरेजेसची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास आणण्याचे काम विलासराव देशमुखांनी केल्यामुळे या बंधाऱ्याची ओळख विलास बंधारा अशी व्हावी असे मत मांडले. जिल्ह्य़ातील सर्व नद्या एकत्र जोडल्या तर जिल्ह्य़ातील सिंचनक्षेत्र अधिक वाढेल असे ते म्हणाले. पालकमंत्री दिलीपराव देशमुख यांनी नियोजित सात बंधाऱ्याबरोबरच जिल्ह्य़ातील नदीच्या पात्रातील उर्वरित चार कोल्हापुरी बंधाऱ्याचेही बॅरेजेसमध्ये रूपांतर केले जाणार असल्याचे सांगितले. राज्यात शंभर टक्के ठिबक व तुषारचा वापर करणारा कारखाना म्हणून मांजरा साखर कारखान्याची लवकरच नोंद होईल व ती ऐतिहासिक असेल असे सांगितले. खासदार जयवंत आवळे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले. या बंधाऱ्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या व हे काम वेगाने करण्यास प्रश्नेत्साहन देणाऱ्या सिंचन विभागाच्या अभियंत्यांचा सत्कार विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
महावितरण ग्राहकांच्या दारी हे अजब
महावितरणचे अधिकारी इतके नम्र बोलू शकतात हे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांचे भाषण ऐकल्यानंतर कळाले. त्यांनी महावितरण ग्राहकांच्या दारी ही संकल्पना अमलात आणली. नाही तर ग्राहक विजेसाठी दारोदारी भटकतो आहे हाच अनुभव यापूर्वी लोकांना होता. महावितरणमध्ये झालेला बदल हा स्तुत्य असल्याचे देशमुख म्हणाले.