Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बच्चेकंपनीचा ‘सुपर डान्सर’ रिअ‍ॅलिटी शो
‘आजची बच्चेकंपनी खूप हुशार आहे. ती टीव्हीवर किंवा चित्रपटातून एकदा पाहूनसुद्धा चटकन

 

नृत्य करू शकतात. मी आणि शिल्पा दिल्लीत एक नृत्य स्पर्धा पाहायला गेलो होतो. त्यानंतर आम्ही ठरवले की आपल्या मराठी बच्चेकंपनीसाठी डान्स रिअ‍ॅलिटी शो करायचा. खरेतर आमच्या ‘ट्वेन्टी फाइव्ह फ्रेम्स’ या प्रश्नॅडक्शन कंपनीतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची स्क्रिप्ट आम्ही तयार केली होती. पण मग ई टीव्ही मराठीकडे गेल्यानंतर त्यांनी डान्स रिअ‍ॅलिटी शो करण्याबद्दल विचारले आणि आम्हालाही कल्पना आवडली. म्हणून आम्ही ‘सुपर डान्सर’ असा नवीन रिअ‍ॅलिटी शो २७ जुलैपासून दर सोमवार व मंगळवारी रात्री ९ वाजता दाखविणार आहोत’, अशी माहिती अभिनेत्री नम्रता शिरोडकरने दिली.
या शोमध्ये अन्य कार्यक्रमांपेक्षा वेगळेपण कोणते आहे या प्रश्नावर ती म्हणाली की, मराठी चॅनल्सवर अनेक मालिका, रिअ‍ॅलिटी शो आहेत. परंतु त्याचा दर्जा, सादरीकरण हिंदी चॅनल्सवरील डान्स किंवा म्युझिक रिअ‍ॅलिटी शोच्या तोडीचे नसते असे जाणवते. मात्र ‘सुपर डान्सर’ हा डान्स रिअ‍ॅलिटी शो नक्कीच त्या तोडीचा असेल, असा दावा नम्रताने केला. यासंदर्भात ‘वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना ती म्हणाली की, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, डोंबिवली, कळवा, नालासोपारा, जळगाव, यवतमाळ, अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली ८ ते १३ वयोगटातील २४ मुले-मुली आम्ही निवडली आहेत. आपल्या मराठी मुलांना एक उत्तम व्यासपीठ या कार्यक्रमामुळे उपलब्ध झाले आहे, असेही ती म्हणाली.
सिनेमातून तू हल्ली काम करत नाहीस असे विचारल्यावर ती म्हणाली की, आता माझी स्वत:ची प्रश्नॅडक्शन कंपनी असल्यामुळे सिनेमात काम करण्यापेक्षा आपल्या संकल्पनेतून कार्यक्रम करावेत असे मला वाटले. मी आणि शिल्पा या कार्यक्रमाचे परीक्षक असलो आणि आमच्याच बॅनरची निर्मिती असली तरी संकल्पना मात्र आम्ही दोघी, आमचे दिग्दर्शक विभोर रत्न आणि टीव्ही अभिनेता व ‘सुपर डान्सर’चा सूत्रसंचालक आशुतोष कुलकर्णी अशा सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा कार्यक्रम तयार झाला आहे, असेही नम्रताने आवर्जून सांगितले. आमचे २४ स्पर्धक हे मुळातच ‘हीरो’ आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही ते नक्कीच आवडतील, असा विश्वास व्यक्त करून नम्रता म्हणाली की, हा एक धमाल, मस्तीचा कार्यक्रम असेल हे नक्की. ‘सुपर डान्सर’चे २६ एपिसोड दाखविण्यात येणार असून ग्रॅण्ड फिनालेच्या वेळी आम्ही मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलावंत, दिग्दर्शकांना बोलावणार आहोत, असेही ती म्हणाली.
प्रतिनिधी