Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

डॉ. मुंदडांच्या कार्यक्रमात क्षीरसागर समर्थकांची तोडफोड
बीड राष्ट्रवादीमध्ये गटबाजीला उधाण
बीड, २६ जुलै/वार्ताहर

नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना निमंत्रित केले नसल्यावरून त्यांच्या समर्थकांनी सार्वजनिक उपक्रम बांधकाममंत्री डॉ. विमल

 

मुंदडा यांचा आजचा कार्यक्रम उधळून लावला. या वेळी सभामंडप आणि कोनशिला उद्ध्वस्त करून काळे झेंडे दाखविले. त्यानंतरही डॉ. मुंदडा यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्ण करून क्षीरसागर यांनी आपल्या पिलावळांना आवरावे अन्यथा आपणही दोन हात करू, असा इशारा दिल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत क्षीरसागर-मुंदडा गटात संघर्ष पेटला आहे.
केज तालुक्यातील नांदूरघाट येथे बांधण्यात आलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय इमारतीचे राष्ट्रवादीच्या मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार केशव आंधळे यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मात्र डावलण्यात आले. त्यामुळे क्षीरसागर समर्थक जिल्हा परिषद सदस्य संतोष हंगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण केल्यानंतरच उद्घाटन करावे, असा आग्रह धरीत सकाळी १० च्या सुमारास कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला सभामंडप उद्ध्वस्त केला. तर इमारतीच्या समोर उभारण्यात आलेल्या कोनशीलाही फोडण्यात आली. त्यामुळे गावात कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी १२ वा. डॉ. विमल मुंदडा, आमदार केशव आंधळे, रमेश आडसकर हे प्रमुख कार्यक्रम ठिकाणी दाखल झाले. त्यावेळी डॉ. मुंदडा यांच्या नावाने घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखविण्यात आले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात डॉ. मुंदडा यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला. यावेळी डॉ. मुंदडा यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा थेट उल्लेख करीत क्षीरसागरांनी आपल्या पिलावळांना आवरावे अन्यथा दोन हात करण्यास आम्हीही तयार आहोत. गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला.
आमदार केशव आंधळे यांनी, हा शासकीय कार्यक्रम आहे. त्यामुळे कोणाला निमंत्रित करायचे हा प्रशासनाचा विषय आहे, असे सांगत मंत्री असताना जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचा आम्ही हट्ट धरला का, असा सवाल करीत या भागाशी क्षीरसागरांचा संबंधच काय, असे बजावले. यावेळी भाजपचे मुरली ढाकणे, तालुका समन्वय ज्ञानेश्वर चौरे, सभापती उत्तरेश्वर स्वामी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य संतोष हंगे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत मंत्री डॉ. मुंदडा आणि दयदत्त क्षीरसागर समर्थकांत संघर्ष पेटला आहे.
डॉ. मुंदडांनी गावकऱ्यांचा अपमान केला - हंगे
या घटनेप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य संतोष हंगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम अर्धवट असताना निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून डॉ. मुंदडा यांनी उद्घाटनाचा घाट घातला. इमारतीची वीज, फर्निचर, फरशी ही कामे पूर्ण झाल्यानंतर व इमारत हस्तांतरित झाल्यानंतर उद्घाटन करावे, अशी आमची मागणी होती. यासाठी मारोतीच्या मंदिरात सर्व गावकरी जमले होते. डॉ. मुंदडा यांनी गावकऱ्यांशी चर्चा करण्याचे मान्य करूनही त्या आल्या नाहीत. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आपले म्हणणे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून गोंधळ झाला.
गुंडगिरी खपवून घेणार नाही - डॉ. मुंदडा
कार्यक्रमात डॉ. विमल मुंदडा यांनी थेट जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी आपल्या पिलावळींना आवरावे. आपण कधी कोणाविरुद्ध बोललो नाही. माचत्र गुंडगिरी यापुढे खपवून घेणार नाही. प्रसंगी दोन हातही करू, असा इशारा दिला.