Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘एमकेसीएल’सोबतची भागीदारी संपुष्टात आणण्याचा ‘स्वाराती’चा निर्णय
नांदेड, २६ जुलै/वार्ताहर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सावळागोंधळ वाढत

 

चालल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) सोबत असलेली भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. दरम्यान परीक्षा विभागातील अनागोंदीसंदर्भात उद्या व्यापक बैठक होणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेच्या निकालाची जबाबदारी एमकेसीएलवर सोपविली होती. निकाल वेळेवर न लागणे, परीक्षेचे हॉलतिकिट वेळेवर न मिळणे, प्रश्नपत्रिका हस्तलिखित देणे, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न टाकणे, अपात्र प्रश्नध्यापकांकडून पेपर तपासणी करून घेणे, पेपर तपासणीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक करणे आदी प्रकारांत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे, उपस्थित विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखविणे असे प्रकार वाढल्याने विद्यापीठातल्या परीक्षा विभागावर सर्वच क्षेत्रातून नाराजीचा सुरू उमटत होता. या प्रकारामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे तसेच विद्यार्थी संघटना संतप्त आहेत, असे लक्षात आल्यानंतर कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांनी एमकेसीएलसोबत असलेली भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना चुका झालेल्या परीक्षांतील निकाल दुरुस्त करण्यात येतील व विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी हमी कुलगुरुंनी दिली आहे. निकालपत्रासाठी पन्नास रुपये घेतले जात होते. तसेच गुणपत्रिकेच्या रचनेत बदल करण्याचा प्रताप एमकेसीएलने केला होता, अशी अप्रत्यक्ष कबुली विद्यापीठाने दिली आहे. ज्या परीक्षांच्या निकालात चुका झाल्या त्यात सुधारणा करण्यात येईल तसेच शिल्लक राहिलेले निकालही लवकर लावण्यात येतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले.
परीक्षा विभागातील अनागोंदी रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. परीक्षा विभागाचे प्रमुख मेजर नारायण चव्हाण यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या विभागातील अनागोंदी वाढली आहे, असा आरोप करत यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रवीण जेठेवाड यांच्या नेतृत्वाखाली आज विद्यार्थी संघटनांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा निकालांमधील चुकीचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला त्यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. वारंवार सूचना करूनही, तक्रारी करूनही विद्यापीठाने त्याची दखल न घेतल्याने आता पुढील दिशा ठरविण्यासाठी विद्यापीठात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.