Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राणा जगजितसिंह पाटील यांचा कार्यक्रम गावकऱ्यांनी उधळला
उस्मानाबाद, २६ जुलै/वार्ताहर

कळंब तालुक्यातील गौरव व उपळाई येथील साठवण तलावाच्या भूमिपूजनाचे राज्यमंत्री

 

राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणारे कार्यक्रम गावक ऱ्यांनी आज उधळून लावले. भूसंपादनाची प्रक्रिया न करताच भूमिपूजनाचा घातलेला घाट चुकीचा असल्याचे सांगत गावक ऱ्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना गावातून हाकलून लावले.
साठवण तलावाच्या भूमिपूजनासाठी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाची यंत्रणा वापरून कळंब तालुक्यातील गौर आणि उपळाई येथे साठवण तलाव करण्याचे ठरविले होते. गौर येथील साठवण तलावासाठी २०० शेतक ऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची आवश्यकता होती. काही शेतकऱ्यांना भूसंपादनाची नोटीस मिळाली नाही तर मावेजा न देताच होणारी भूसंपादनाची कार्यवाही अवैध असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. गौर परिसरात होणारा हा साठवण तलाव शेतकऱ्यांच्या सोयीचा भाग नाही तर धाराशिव या खासगी साखर कारखान्याला पाणी मिळावे म्हणून साठवण तलावाचा घाट घातला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. धाराशिव साखर कारखान्याची उभारणी राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती.
भूसंपादनाची कार्यवाही न करताच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत हा कार्यक्रम घेण्यात येणार होता. संतापलेल्या गावकऱ्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. उपळाई येथे काही महिलांनी निषेध नोंदविला.