Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

खताच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांना घेराव
हिंगोली, २६ जुलै/वार्ताहर

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे खताच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून

 

केलेल्या गदारोळामुळे काही वेळ वातावरण तंग झाले होते. अखेर जि.प.चे कृषी विकास अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी लवकरच २०० मे. टन खत उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर चिडलेले शेतकरी शांत झाले व घेराव मागे घेतला.
कुरुंदा येथे शेतकऱ्यासाठी रविवारी खत उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी खत घेऊन जाण्याचे आवाहन कृषी विभागाने केल्यामुळे खत घेण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी कुरुंदा येथे हजर झाले. सुमारे ५०० शेतकऱ्यांना कुपन वाटले होते व त्या ठिकाणी सुमारे एक हजार खताच्या बॅगा उपलब्ध होत्या. खतासाठी जमलेली गर्दी व उपलब्ध खताचा साठा लक्षात घेता प्रत्येक शेतकरी खत मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याने मंडळ अधिकारी भालेराव व तालुका कृषी अधिकारी डी. जी. काळे गोंधळून गेले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे वरिष्ठांना कळविले.
यानंतर तहसीलदार अनिल माचेवार, जि.प.चे कृषी विकास अधिकारी बी. एस. कच्छवे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. एस. बरदाळे कुरुंदा येथे पोहोचले असता शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे एक न ऐकता त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. काही काळ येथील वातावरण तंग झाले होते. शेतकरी चांगलेच संतापले होते. खत उपलब्ध करून द्या अशी एकच मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. अखेर बी. एस. कच्छवे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २०० मे. टन खत उपलब्ध करून देतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. आता कृषी अधिकारी शेतकऱ्यांना २०० मे. टन कधी उपलब्ध करून देणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष आहे.