Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सौरऊर्जा प्रकल्प बारगळल्याची राणा जगजितसिंह यांची कबुली
उस्मानाबाद, २६ जुलै/वार्ताहर

सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीचा पाच हजार कोटी रुपयांचा येथे येणारा प्रकल्प

 

बारगळल्याचे उद्योग राज्यमंत्री राणा जगजीतसिंह पाटील यांनी शनिवारी (२५ जुलै) एका पत्रकार बैठकीत कबूल केले.
केंद्र सरकारने वीज खरेदी करण्याबाबतचे धोरण जाहीर केले नसल्याने या क्षेत्रात गुंतवणुकीस तयार असणारी मोजरबेअर ही कंपनी आता हा प्रकल्प सुरू करेल की नाही हे सांगता येत नाही अशा शब्दात श्री. पाटील यांनी सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकत नसल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्योग राज्यमंत्री राणा जगजीतसिंह पाटील यांनी सौर ऊर्जेच्या अनुषंगाने काही प्रकल्प हाती घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात जमीन संपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली होती. कौडगाव येथे नव्याने औद्योगिक वसाहतदेखील प्रस्तावीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला भाव देऊन काही ठिकाणी भूसंपादनाची कार्यवाहीही करण्यात आली.
सौरऊर्जा प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात जमिनीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीत पाच हजार कोटी रुपये तर वीज निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सुटे भाग निर्मितीस अतिरिक्त पाच हजार कोटी अशी दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या प्रकल्पातून किमान पाच हजार रुग्णांना रोजगार उपलब्ध होईल असेही उद्योग राज्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. आठ महिन्यानंतर या प्रकल्पाचे काय झाले असा प्रश्न बैठकीत विचारला गेला. उद्योग राज्यमंत्र्यांच्या उत्तराने सारे जण अवाक झाले. श्री. पाटील म्हणाले, ‘‘सौर ऊर्जेपासून निर्माण झालेली वीज फक्त पन्नास मेगाव्ॉटपर्यंतच तयार करण्यास परवानगी आहे. ही वीज निर्मिती झाल्यानंतर प्रतियुनिट बारा रुपये या दराने केंद्र सरकार वीज खरेदी करणार होते. त्यामुळे आता केंद्राच्या धोरणामुळे हा प्रकल्प रखडला आहे.’’
केंद्राचे वीज खरेदीचे धोरण न ठरल्याचे कारण पुढे करून सौर ऊर्जेचा प्रकल्प होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर इटालीतील उद्योजकांशी चर्चा करण्यात आली. आता हे उद्योजक भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. त्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जात असल्याने येत्या काही महिन्यात कौडगाव परिसरात पन्नास एकर जमिनीवर बूट तयार करण्याचा कारखाना उभारण्यात येणार आहे. तसेच या परिसरात टायरवर प्रक्रिया करणारा कारखानाही करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
इटालीतील उद्योजकांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची भाषा शिकविण्यासाठी काही अभ्यासक्रम विद्यापीठाच्या उपकेंद्रामार्फत लवकरच आखले जाणार आहेत. त्यामुळे या भागातील तरुणांना चांगल्या संधी असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले