Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘लशींची काळजी न घेतल्याने मेंदूज्वराची बाधा’
गेवराई, २६ जुलै/वार्ताहर

मेंदूज्वराच्या लशीच्या औषधांचा साठा व्यवस्थित केला नाही. किमान तापमान न राखताच मुलांना

 

लशी टोचण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचा प्रश्नथमिक अंदाज केंद्रीय औषध निरीक्षक डॉ. संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे. उपजिल्हा रुग्णालय, गेवराई व प्रश्नथमिक आरोग्य केंद्र, तलवाडा व जातेगाव येथे भेटी देऊन तेथील औषधसाठय़ाची पाहणी या पथकाने केली.
मेंदूज्वराच्या लशी टोचल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘रिअ‍ॅक्शन’ होण्याचे प्रकार गेवराई तालुक्यात मोठय़ा प्रमाणात घडले. मालेगाव येथील राहणारा व गेवराई येथे शिकणारा धनंजय बने (वय ८), अर्धमसला येथील रहिवासी व सिरसदेवी येथे शिकणारी भाग्यश्री भिंगारे (वय १४) ही दोन मुले या लशीनंतर प्रकृतीत बिघाड झाल्याने मृत्युमुखी पडली. यासंबंधी वृत्तपत्रात बातम्या येताच आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. प्रथम सारवासारव करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने करून जबाबदारी झटकण्याचा असंवेदनशीलपणा दाखवला. परंतु उच्चस्तरावरून याची गंभीर नोंद घेऊन चौकशी सुरू झाल्यामुळे स्थानिक प्रशासन उघडे पडले आहे. मागील तीन दिवसांपासून गेवराई येथे जागतिक बँक, केंद्रीय व राज्यस्तरीय पथकांनी भेटी देऊन झाल्या प्रकाराची चौकशी केली आहे. आज, २६ जुलैला केंद्रीय औषध निरीक्षक यांनी अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांसह या घटनेची गेवराई, तलवाडा व जातेगाव येथे जाऊन चौकशी केली. पथकामध्ये केंद्रीय निरीक्षक डॉ. संजय कुमार व डॉ. विलास दुसाने यांचा समावेश होता.
मेंदूज्वराच्या लशीसाठी वापरण्यात आलेल्या लशीच्या साठय़ाची त्यांनी पाहणी केली. यामध्ये गेवराई उपजिल्हा रुग्णालयात लस ठेवलेल्या फ्रीजला स्टॅबिलायझर नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास फ्रीज बंद राहत असल्याचे आढळले. लस देण्यासाठी औषधाचे तापमान २.८ दशांश डिग्री सेल्सियस असणे आवश्यक आहे. परंतु फ्रीज बंद राहिल्याने तापमान वाढलेली औषधे वापरण्यात आली असण्याची शक्यता व्यक्त केली गेली. लशीच्या औषधाचे आठ नमुने पथकाने पुढील परीक्षणासाठी घेतले आहेत, अशी माहिती डॉ. संजय कुमार यांनी दिली.
जातेगाव प्रश्नथमिक आरोग्य केंद्रातील जनरेटरला इंधन नसल्याने ते कायम बंद असते. तलवाडा येथे तर रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केलेला असून सध्या आकडे टाकून वीज घेण्यात आलेली असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. लशीच्या औषधांचा साठा व्यवस्थित नसल्यामुळेच मुलांना बाधा झाल्याचा तसेच नियमित औषधांचा साठाही योग्यप्रकारे होत नसल्याचा अहवाल शासनाला देणार असल्याचेही डॉ. संजय कुमार यांनी
सांगितले.