Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वळणरस्त्यांबरोबर चांगल्या वाहतूक सवयींचे ‘वळण’ही गरजेचे - विलासराव देशमुख
लातूर, २६ जुलै/वार्ताहर

लातूरचे नाव आता राष्ट्रीय नकाशावर आले आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन वळणरस्ते

 

तयार झाले आहेत. आता वाढत्या शहरात आपल्याबरोबर सार्वजनिक आरोग्य ठीक राहण्यासाठी सर्वानी स्वत:ला चांगले वळण लावून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील १०० कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संपर्कमंत्री दिलीप देशमुख, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष त्रिंबकदास झंवर, खासदार जयवंत आवळे, जिल्हा परिषद अध्यक्षा छाया चिगुरे, आमदार विक्रम काळे, अमित देशमुख, नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. ए. आर. थेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता चं. प्र. जोशी उपस्थित होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले, शहरातील विविध भागांतील १०० कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली. त्याचा लोकार्पण सोहळा आज होतो आहे. नेमके सरकारने लोकांसाठी काय केले, याचा आढावा अशानिमित्ताने घेता येतो. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन आहे. शहरातील वाढती रहदारी, वाढती वाहने लक्षात घेऊन वळणरस्ते निर्माण केले गेले. वळणरस्त्याभोवतीच वस्ती वाढत असल्यामुळे आता दुसरे वळणरस्ते घेण्याची निकड तयार झाली. त्याचाही आराखडा बांधकाम विभागाने तयार केला आहे. रस्ते तयार झाल्यानंतर ते सुरक्षित व सुंदर राहतील, याची काळजी घेतली गेली पाहिजे. वळणरस्त्यावर तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर म्हशी बांधणे, धूणे धुणे व लहान मुलांना शौचालयास बसविणे अशी जर कामे होणार असतील तर आता ज्याप्रमाणे रोडरोमियोंसाठी पोलिसांनी दक्षता पथक तयार तसेच रस्त्याच्या वापरासाठी लोकजागृती निर्माण करण्यासाठी वेगळे निर्माण करावे लागेल, अशी सूचना त्यांनी मांडली.
पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील मुलांच्या नवीन वसतिगृहाचे व ग्रंथालयाचे उद्घाटनही याप्रसंगी झाले. मराठवाडय़ात तंत्रशिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रशिक्षण विभागातर्फे ग्रामीण भागातील शाळांपर्यंत पोहोचून तंत्रशिक्षणाच्या संधी सांगितल्या जात आहेत. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.
प्रश्नरंभी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता चं. प्र. जोशी यांनी विभागामार्फत लोकार्पण करण्यात आलेल्या चार रस्त्यांच्या कामांची माहिती दिली. पु. ला. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पूर्ण झालेल्या दोन कामांची व सुरू असलेल्या चार कामांची माहिती दिली. तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. ए. आर. थिटे यांनी मराठवाडय़ात तंत्रशिक्षणाचे जाळे चांगले पसरले आहे. केंद्र सरकारच्या कम्युनिटी क ॉलेजेस संकल्पनेतील तीन महाविद्यालये लातूर, नांदेड व औरंगाबाद येथे सुरू होत आहेत. महाराष्ट्रात प्रथमच हा मान मराठवाडय़ाला मिळाला असल्याचे व तेही पूर्णपणे गुणवत्तेच्या निकषावरच असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार विक्रम काळे यांनी लातूरमध्ये मुलींसाठी स्वतंत्र अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज असल्याचे नमूद केले.
संपर्कमंत्री दिलीप देशमुख यांनी, मराठवाडय़ात रस्ते विकासासाठी १९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. टेंभुर्णीपासून एडशीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच हाती घेतले जाणार आहे. रस्ते विकासात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे ते म्हणाले. तंत्रनिकेतनमध्ये ग्रंथालय सुरू झाले आहे. याचा लाभ सर्वानी घ्यायला हवा. विदेशी शिक्षण संस्था शिकण्यावर भर दिला जातो, तर आपल्या देशात केवळ शिकवण्यावर भर दिला जातो. ही तफावत भरून काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. खासदार जयवंत आवळे यांनी समयोचित भाषण केले.
खिशातील पैशाचा वापर
१२ वी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलीच्या घरी जाऊन स्वत:च्या खिशातील पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस खासदार जयवंत आवळे यांनी दिल्याचे सांगितले. याचा संदर्भ देत विलासराव म्हणाले, लातूरसाठी हा नवा सुखद अनुभव आहे. त्यांचे खिसे असेच मोठे होवोत व त्यांनी आपल्या खिशात असाच हात यापुढेही घालावा, अशी शुभेच्छा त्यांना देतो, असे म्हणताच उपस्थितांत खसखस पिकली.
गुंतवणुकीचा नवीन प्रकल्प विचारार्थ
लातूरमध्ये नऊ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा विद्युतनिर्मिती प्रकल्प केंद्रीय अवजड उद्योग खात्यामार्फत सुरू केला जाणार आहे. महाजनको व भेल यांच्यातील करारावर सह्य़ा होणे बाकी आहे. ते १५ दिवसांत पूर्ण होईल. तीन वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित होऊन यात सुमारे एक हजारजणांना रोजगार उपलब्ध होईल. या प्रकल्पाबरोबरच विदेशी गुंतवणुकीचा आणखीन एखादा मोठा प्रकल्प लातूरमध्ये सुरू करण्याच्या हालचाली चालू असल्याचे त्यांनी सांगितले.