Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

निलंगा तालुक्यात गॅस्ट्रोचे थैमान
निलंगा, २६ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील शिवणीकोतल येथे सार्वजनिक पाणीपुरवठा दूषित झाल्याने सुमारे १०० लोकांना

 

गॅस्ट्रोची लागण झाली असून अत्यवस्थ रुग्णांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने उपचारासाठी विशेष मोहीम सुरू करून गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार निंबाळकर यांनी दिली आहे.
शिवणीकोतल (ता. निलंगा) येथील काही लोकांना अतिसाराचा त्रास झाल्याने गुरुवारी दुपारी येतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी आणखी काही लोकांना गॅस्ट्रोची साथ झाल्याने त्यांना नजीकच्या पानचिंचोली प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरोग्य विभागास माहिती देऊन तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निंबाळकर व डॉ. वायस सोनवणे यांच्यासह शिवणीकोतल गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे व उपचार सुरू केले आहेत.
दरम्यान, गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा दूषित झाल्याने गॅस्ट्रोची लागणी झाली असल्याचे प्रशासनाच्या व आरोग्य विभागाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पाणीपुरवठय़ाची टाकी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद आरोग्य सभापती अमरसिंह भोसले, मनसे उपजिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, निलंगाचे उपविभागीय अधिकारी मंदार वैद्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघमारे, गटविकास अधिकारी व्ही. डी. वाघमारे यांनी गावास भेट दिली.
दरम्यान, शुक्रवार, २४ जुलैला माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवणीकोतल गावास भेट देऊन तेथील परिस्थिती पाहणी केली व येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आरोग्य विभागास योग्य त्या सूचना केल्या. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निंबाळकर म्हणाले, गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आली असून कोणताही अनर्थ घडू नये म्हणून स्वच्छता विभाग सतर्क असल्याचे सांगितले.