Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पोलिस पाटलाने धमकावल्याने भांगापूरमध्ये मुलीने जाळून घेतले
बोरी, २६ जुलै/वार्ताहर

बोरीजवळ असलेल्या भांगापूर (ता. सेलू) येथील एका पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच

 

एका मुलासोबत पळून जाण्यासाठी पोलीस पाटलासमवेत इतर दोघांनी धमकावण्याचा प्रयत्न करून पळून न गेल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या मुलीने बदनामीपोटी स्वत: जाळून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
भांगापूर येथील पोलीस पाटील बाबुराव गायकवाड, नानाभाऊ भागोजी कटारे, शिवाजी बाबुराव राऊत या तिघांनी मीनाक्षी ऊर्फ मीना भाऊराव काकडे (वय १५) हिला २३ जुलैला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास देशमाने यांच्या घरात बोलावून तू जगदीश नारायण कटारे याच्यासोबत पळून जा, असे धमकावले. जर तू असे नाही केले तर तुला जिवे मारू, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे तिने घाबरून बदनामीपोटी तिथून घरी आल्यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास स्वत:स जाळून घेतले, असे मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
तिला उपचारापोटी परभणी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात ती १०० टक्के जळाल्याने उपचारादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास ती मरण पावली, अशी तक्रार तिचे वडील भाऊराव व्यंकटराव काकडे यांनी आज बोरी पोलीस ठाण्यात दिली.
उपचारादरम्यान मात्र मीनाक्षी हिने पोलिसांना दिलेल्या जबानीत घरात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटण्यासाठी रॉकेल टाकत असताना उडालेल्या भडक्यामुळे अंगावरील कपडय़ाने पेट घेतला असे सांगितले. याच वेळी तिच्या वडिलांनीही मुलीसारखाच पोलिसांना जबाब दिला. बोरी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
घटनेच्या तीन दिवसानंतर आज २६ जुलैला सकाळी नऊच्या सुमारास मयत मीनाक्षीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी नानाभाऊ कटारे, शिवाजी राऊत यांना बेदम मारहाण करून बोरी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर जमादार शेख नसीर यांनी घटनास्थळास भेट देऊन माहिती घेतली असता या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस पाटील बाबुराव गायकवाड, जगदीश कटारे गावात नसल्याचे समजले.
मुलीच्या वडिलांच्या दोन वेळच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी फिर्यादीचा अर्ज चौकशीवर ठेवला. आहे. या प्रकरणी गावात उलट-सुलट चर्चा सुरू असून मीनाक्षीचा मृत्यू स्वयंपाक करताना उडालेल्या भडक्यामुळे झाला का तिने तिघांनी दिलेल्या पळून जाण्याच्या धमकीमुळे स्वत:स जाळून घेतले, हे पोलीस तपासात स्पष्ट होईल. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख नसीर करीत आहेत.