Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पांढऱ्या वाघांचा मुक्काम आता बंगाली वाघांसोबत!
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

पिंजऱ्याची भिंत आणि छतही कोसळल्यामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या प्रश्नणिसंग्रहालयातील पांढरे वाघ

 

शुक्रवारपासून बंगाली वाघांसोबत मुक्कामी आहेत. नवीन पिंजरा उभारण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर कोसळलेला पिंजरा पूर्ववत करण्यासाठी किमान तीन दिवस लागणार आहेत.
सिद्धार्थ उद्यानात सात पांढरे वाघ आहेत. यांच्यासाठी असलेल्या पिंजऱ्याची भिंत शुक्रवारी कोसळली आणि यामुळे राणी नावाची वाघीण बाहेर पडल्यावर खळबळ उडाली होती. या वाघिणीला चार तासांच्या प्रयत्नांनंतर पुन्हा पिंजऱ्यात बंद करण्यात आले होते.
महापौर विजया रहाटकर, आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घटनेनंतर तातडीने बैठक घेऊन लगेच पिंजरा उभारण्याचे आदेश संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना दिले होते. मात्र नवा पिंजरा उभारायचा कोठे, असा प्रश्न समोर आला होता. त्यावर निर्णय घेणे तसेच त्याचा आराखडा तयार करण्यास वेळ लागणार असल्यामुळे तूर्तात कोसळलेल्या पिंजरा व्यवस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नव्या पिंजऱ्याचा आराखडा आणि अन्य मंजुरी घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पिंजऱ्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांनी या पिंजऱ्याचे काम केले होते. येत्या दोन-तीन दिवसांत पिंजरा उभा राहील आणि सध्या बंगाली वाघांच्या पिंजऱ्यात स्थलांतरीत झालेले पांढरे वाघ पुन्हा त्यांच्या घरात जातील, असे सांगण्यात आले आहे.
वाघांनी आपसात भांडणे करू नये म्हणून एक पिंजरा मध्ये सोडून वाघांना ठेवण्यात येते. मात्र सध्या जागाच नसल्यामुळे लगतच्या पिंजऱ्यांमध्ये या वाघांना ठेवण्यात आले आहे. वाघांना नेहमी असे जवळजवळ ठेवणे धोकेदायक असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यांत मृत्यू झालेल्या वाघिणीला दुसऱ्या वाघिणीबरोबर ठेवल्यावर त्यांचात वाद होऊन झालेल्या जखमेमुळे शेपटी कापण्यात आली होती.
इमारत बांधकामाची चौकशी नाहीच!
दरम्यान पिंजऱ्याची इमारत का कोसळली याची चौकशी करण्याकडे प्रशासनाने हेतुपुरस्सर दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चारच वर्षापूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. इमारतीला लागून असलेल्या इमारती २५ वर्षापेक्षीही अधिक जुन्या आहेत. त्या इमारतींना अद्यापि काहीही झालेले नाही. मात्र चारच वर्षापूर्वी बांधण्यात आलेली पिंजऱ्याची ही इमारत का पडली, याची चौकशी करण्याची गरज प्रशासनाला वाटली नाही. पलीकडून नाला असल्यामुळे पिंजऱ्याची ही इमारत पडली असल्याचा युक्तिवाद करण्यात येत आहे. मात्र इमारतीचे बांधकाम हे कच्चे असल्याचे दिसून येत आहे.