Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अफजल, कसाबला फासावर लटकवा
दुसऱ्या कारगिलच्या तयारीत पाकिस्तान - मनजीतसिंग बिट्टा
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

कारगिल युद्धानंतर देशात अक्षरधाम, जयपूर, मुंबई, बंगळूर अशा कितीतरी ठिकाणी दहशतवादी

 

हल्ले झाले. या सर्व घटनांतून आपण काय शिकलो? काहीच नाही. त्यामुळे कारगिलसारख्या घटना पुन्हा पुन्हा होत राहतील आणि सध्यादेखील पाकिस्तान दुसऱ्या कारगिल युद्धाच्या तयारीत आहे, असा खळबळजनक दावा ऑल इंडिया अ‍ॅण्टीटेरिरिझम फ्रंटचे अध्यक्ष मनजीतसिंग बिट्टी यांनी केला.
कारगिल विजय दिनानिमित्त रॅलीसाठी शहरात आलेल्या मनजीतसिंग बिट्टा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला. त्याच्या दोन वर्षं आधी आपण पंजाबमध्ये पत्रकारांशी संवाद साधून अतिरेकी समुद्रमार्गे येऊ शकतात, असा अंदाज वर्तविला होता. तरीही आपली गुप्तचर आणि पोलीस यंत्रणा जागी झाली नाही. कारगिल युद्धात शहीदांना श्रद्धांजली व त्या कुटुंबांना आधार देण्याचे काम वेळोवेळी मीडियाने केले. मात्र या सरकारला कधी जागा येईल? अकराशे बंकर्स, असंख्य टॉवर्स आणि ट्रेनिंग कॅम्प, पाकिस्तानने सीमेलगत लावले आहेत. आता तर त्यांनी चीनचीसुद्धा मदत घ्यायला सुरुवात केली आहे. चीन, नेपाळ, बांगलादेश अशा शेजारी राष्ट्रातून भारताला घेरण्याची योजना पाक राबवित आहे. संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू असो की, मुंबईवर हल्ला करणारा कसाब या दोघांनासुद्धा फाशी द्यायला पाहिजे तीसुद्धा तात्काळ. मात्र, मुस्लिम मते आपल्यापासून दूर होतील, अशी भीती सरकारला आहे. प्रत्येकजण आपल्या व्होटबँकेसाठी धडपडत आहे. एवढे हल्ले होऊनही भारताने पाकशी चर्चाच चालविली आहे. वास्तविक पाकला एकाकी पाडून दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला पाहिजे, असाही सल्ला मनजीतसिंग बिट्टा यांनी दिला.
महाराष्ट्राचे रक्त गरम आहे. देशभक्तांवर प्रेम करणाऱ्या या भूमीतील तरुणांना सैन्यात तसेच पोलीस खात्यात सर्वाधिक स्थान मिळावे, अशी सार्थ अपेक्षा बिट्टा यांनी व्यक्त केली. मुंबईवर झालेले हल्ले आगामी काळातही सुरूच राहतील. त्यासाठी आयएसआय तयारीत आहे. आपल्या यंत्रणेने तसे हल्ले रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणे अत्यंत गरजेचे असले तरीही आपले राजकारणी कोणत्याही थराला जात आहेत. लालुप्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादवसारखे लोक ‘सिमी’सारख्या संघटनांना पाठीशी घालत आहेत. दिल्लीतील कोटला इन्काऊंटरमध्ये शहीद झालेल्या शर्मा या पोलीस अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहायची सोडून मुलायमसिंग यांनी दहशतवाद्यांची बाजू उचलली. तिकडे वरुण गांधी जातिवाचक विधाने करून प्रसिद्धीझोतात येत आहेत. ही परिस्थिती वाईट असून सर्वानी त्याचा मुकाबला करणे आवश्यक आहे, असेही श्री. बिट्टी यांनी यावेळी नमूद केले.