Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबाद-जालना रस्ता चौपदरीकरणाचे आज उद्घाटन
औरंगाबाद, २६ जुलै/खास प्रतिनिधी

१९० कोटी रुपयांच्या ६५.८ किलोमीटर अंतराच्या औरंगाबाद-जालना रस्ता चौपदरीकरणाचे

 

उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी दुपारी दोन वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री राजेश टोपे हे राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री डॉ. विमल मुंदडा, राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, गृहनिर्माण राज्यमंत्री अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या कामाला १ फेब्रुवारी २००७ ला प्रश्नरंभ झाला होता. अवघ्या ३० महिन्यांत या चौपदरीकरणाचे काम झाले. चिकलठाणा गावातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भूसंपादन करण्यात येऊन रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. चिकलठाणा गावातील नागरिकांच्या सहकार्यामुळे मंदिर व दर्गा स्थलांतरित करून हे काम बहुतांशी पूर्ण करण्यात आले आहे. लाडगाव, करमाड आणि शेलगाव येथील नागरिकांच्या सहकार्यामुळे या गावातील लांबीमध्ये रस्ता सहा पदरी करण्यात आला आहे.
औरंगाबाद - जालना रस्त्याच्या लांबीमध्ये रस्त्याच्या मध्य रेषेपासून ५० फूट अंतरावर बांधीव गटार बांधावयाची आहे. बदनापूरकरांचे सहकार्य न मिळाल्यामुळे या गटारचे काम अपूर्ण राहिले आहे. पुढील दोन महिन्यांत बदनापूर येथील बांधीव गटाराचे काम पूर्ण करण्यात येऊन तेथील रस्ता रुंदीकरण पूर्ण केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले आहे. लहुकी टोलनाका बंद करून लाडगाव आणि नागेवाडी येथे नवीन टोलनाका सुरू करण्यात येणार आहे.
बीड बायपास, झाल्टा बायपास आणि विमानतळापासून जालन्यापर्यंत असा एकूण ६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. सहा मोठे पूल, नऊ छोटे पूल, अकरा छोटय़ा पुलांचे, ७९ नळकांडी पुलांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. दोन रेल्वे ओलांडणी पूल बांधण्यात आले आहे.